शुक्रवार, ७ जून, २०१९

Vikram Bhagwat to नुक्कड कथा विश्व
वर्षाने अलीकडे लघुकथेच्या माध्यमावर आपले पक्कड जमवायला सुरुवात केली आहे. छान वर्षा!
वावटळ – वर्षा थोटे-पतके
अंधाऱ्या रात्री किर्रर्र किर्रर्र किड्यांच्या आवाजात चर्रर्र चर्रर्र आवाज करत एक गाडी गावातल्या चौकात येऊन थांबली त्याबरोबरच अख्ख गाव हादरून गेलं. गाव कसलं दोनशे-तीनशे लोकांची वस्ती होती. दुर्गम भागात असल्यामुळे जगाशी फारसा संबंध येत नसला तरी रमाचा बाप पोलिसांना सगळ्या खबऱ्या पुरवायचा. आपल्या भागातील, लहान्या राजाला जन्म दिल्यावर काही महिन्यातच रमाच्या आईने घरादाराच्या खटल्यातून कायमची सुटका करून घेतली होती.
बापाचाच काय तो आधार होता. तोही निकराने आपलं फाटक कुटुंब राखत होता. पण काही कळायच्या आत तो, गाडी गावात आली त्यादिवसापासून गायब झाला. या गोष्टीला आठ-एक दिवस झाले असतील. दुपारच्या स्मशानशांतता असलेल्या उन्हात पोलिसांची गाडी आली आणि कोणकोण गायब आहे विचारपूस करू लागली तेवढ्यात पोलिसांचा शर्ट मागून ओढला गेल्यामुळे तो मागे पाहू लागला.
तेलाचा स्पर्श न झालेल्या, धूळ वाऱ्याने तार-तार केसांची रमा आपल्या फ्रॉकच्या पांच कान्ज्यामध्ये कशीबशी दोन बटन अडकवून एका हाताने डोक्यावरच्या बारक्या काटक्यांची मोळी सांभाळत उभी होती. दुसऱ्या हाताने तिने अडीच-तीन वर्षाच्या फक्त मळकट फाटका शर्ट अडकवलेल्या भावाला धरलं होत. मागे तिची पाच वर्षाची बहीण नाकातला शेंबूड कोपराच्या बाहीने पुसत उभी होती. उण्या-पुऱ्या नऊ-दहा वर्षाची रमा थकलेल्या डोळ्यांनी सुकलेल्या ओठांवरून जीभ फिरवत रमा पुन्हापुन्हा पोलिसाला विचारात होती, "दाजी कव्हा येतील जी?"
तीन पोरक्या जीवांना वाऱ्यावर फिरकावणाऱ्या वावटळीत पोलीस मात्र सोंगाड्या बनून आपलाच ढोल पिटत होता .
विचार

एक विचार हरवलाय
अविचारांच्या गर्दीत
कुणी मिळेल का ?
त्याचे सारथ्य करायला सारथी 
विचार अविचारा सोबतच्या
शर्यतीत ढेंचकाळतोय ,रक्तबंबाळ होतोय
मागे पडतोय
तो पर्यंत अविचार अख्ख
गाव हुंदडतोय
कधी पर्यंत चालणार हि शर्यत
हा प्रश्न विचाराला सतावतोय ?
सत्य भेटेपर्यंत का ?
विचार असाच तळमळतोय ?
वर्षा थोटे /पतके 😓
राधा 

कृष्णाची राधा राधा करता करता
मीरेलाही घातली त्याने साद
तुला ओळखती का सांग कुणी
कृष्णाच्या राधेशिवाय?
राधे स्मरून स्वतःला जगलीस का कधी?
कृष्ण मीरेलाही भुरळ घालतो कधी कधी
राधे स्वतःला कधी आंजारून गोंजारून
केले का शांत ?
की मीरेवानी तुही विसरलीस स्वतःची भ्रांत
कृष्ण जगाचा करता करविता
तु झालीस का जगाची रचयिता ?
कृष्णाची राधा होण्यातच का तुझ्या जीवनाचे सार?
का स्वतःचा तुला पडला विसर पार ?
वर्षा थोटे /पतके
डर
बदली हुयी हवाओं का रुख देख कर
जर्रा जर्रा काँप उठता है
हवाएँ भी वही है ,फिजाये भी वही है 
क्यू मुस्कुराना भूल गयी कलियाँ
जर्रा जर्रा काँप उठता है
बदली हुयी हवाओं का रुख देख कर
क्यू सोंचता है मन, मन का मन से मिलना
सबका मन सरीका तो ही लगता है
जर्रा जर्रा काँप उठता है
बदली हुयी हवाओं का रुख देख कर
क्यू रुख मोड़ रही है राहे
किसी अपनेसे मिलनेसे पहले
जर्रा जर्रा काँप उठता है
बदली हुयी हवाओं का रुख देख कर
क्यू अपनासा नहीं लगता कोई दुनिया में आजकल
इस बदले हुए ज़माने का रुख देखकर
जर्रा जर्रा काँप उठता है
बदली हुयी हवाओं का रुख देख कर
वर्षा थोटे /पतके
Vikram Bhagwat to नुक्कड कथा विश्व
वर्षाने खूप चांगला क्षण पकडला आहे. समृद्ध क्षण आहे तो.
जगणं – वर्षा थोटे-पतके
थकलेल्या मनाने आणि थकलेल्या शरीराने गाडीवरून जाताना एक दृश्य डोळ्यांनी टिपलं .एका रिकाम्या जागेमध्ये २-३- कुटुंब वस्ती करून होते. ५-६ वाचताची वेळ , कुणाच्या चुली पेटल्या , कुणाच्या बाकी , काही पोरं-बाळ मस्ती करण्यात दंग, काही बाप्या माणसं झोपडी सावरण्याचे काम करीत होते. पाळीव प्राणी बाजूला दावणीला बांधून असल्यामुळे मधूनच आवाज काढीत होते .
मी माझ्या गाडीचा वेग कमी करून हे सगळं दृश्य न्याहाळीत असताना ,माझं लक्ष एका झोपडीकडे गेलं. त्या झोपडीतली सुंदरशी बाई भाकरी बडवता-बडवता मधूनच चोरट्या नजरेने तिच्या जवळ बसलेल्या माणसाकडे पाहायची आणि तो माणूसही काहीतरी लाड-लाड बोलत असावा असं त्याच्या हावभावावरून वाटायला लागलं. दोघे नवरा -बायको असावीत असं मन सांगून गेलं. पण त्याचक्षणी दुसरं मन म्हणायला लागलं काय सुख शोधत असेल ही बाई किंवा बाप्या या पालवावरील जीवनावर? हा विचार चालू असतानाच त्यांच्या जवळील रेडिओवरच गाणं ऐकू आलं
तुझ्या माझ्या संसाराला
आणि काय हवं
दिस जातील ,दिस येतील ...............
आणि मी पुन्हा विचारात पडले खरं जगणं नेमकं कुणाला कळलं ?
पालवाला की....................
वर्षा थोटे /पतके
तू हवा होतास मला

कृष्णाचे मोरपीस अलवार न्याहाळताना
रोजच्या जगण्याचे संदर्भ शोधताना
तू हवा होतास मला
पहाटेच्या समयी अर्ध्य देताना 
दुपारच्या टळटळीत उन्हात घामाच्या धारा टिपताना
तू हवा होतास मला
तुटक्या तुटक्या कातरवेळी
अशांत समयी शांत करायला
तू हवा होतास मला
चंद्राच्या साक्षीने चांदण्यात फिरताना
रात्रीच्या वेळेस शांत तलावातील तरंग पाहताना
तू हवा होतास मला
फाटकी झोपडी सावरताना
मनाची मनाशी ओळख करायला
तू हवा होतास मला
असलेली शिवण घालायला
फाटलेल्या परिस्थितीला सावरायला
तू हवा होतास मला
मनाच्या खिळखिळ्या पानांना वेचायला
मनातील साबूत वाळवीला काढायला
तू हवा होतास मला
अश्रू पिण्याचे व्यसन थांबवायला
संपलेल्या अश्रुना आळवायला
तू हवा होतास मला
मृत्यूच्या अधिरतेला रोखायला
मृत्यू नंतरच्या राखेला सावळायला
तू हवा होतास मला
वर्षा थोटे /पतके
मी मला सावराया लागली
पून्हा नव्याने जगाया लागली
मतलबी दुनियेत थोड़ी थोड़ी स्वार्थी होऊ लागली
मी मलाच नव्याने ओळखू लागली
भुतकाळातील खूणा विसरून
वर्तमानाच्या चाहूलीला ओळखाया लागली
मंदीरातील देवाला कोनाड़्यात बसवून
माणसाच्या आत्म्यातील देव शोधाया लागली
जाणीवेच्या या जगण्याने छळले होते
नेणीवेने जगणे पार कराया लागली
अश्वाश्वतेच्या जगण्यामध्ये
मी जगणे शोधू लागली
दुःख पचवता पचवता अश्रू पिऊ लागली
स्वच्छ पांढ-या ड़ोळ्याने सुख शोधू लागली
रोज मरण्याच्या या जगण्यात
रोज नव्याने थोड़ी थोड़ी जगू लागली
मी मला ओळखता ओळखता
कविता,गझल वैगरे कराया लागली
तुमच्या ड़ोळ्यात माझी कविता,गझल वाचू लागली
वर्षा थोटे/पतके
आई
आई तू नवनिर्मीतीची शिल्पकार
आई तू सृजनशील कलाकार
आई देवाचे कार्य चोख पाड़तीस पार
आई तू ह्रद्याची,मनाची शिलेदार
आई तुझ्या रक्तात ताकद असे
तुझ्या मनगटात भार
आई तू अशक्य ही शक्य करून
अटकेपार झेंड़े रोवतीस पार
आई तू जगाची रचयती
तरीही तू जगातून दुर्लक्षती
आई तुझी व्यथा,तुझी काळजी
तुला कधीच न उमजे आपल्या लहानग्यासमोर
आई तू कधी बदलनार नाही
हा विश्वासही देशील नियंत्यासमोर.
वर्षा पतके-थोटे
ती
का अजूनही जगावं तीन परंपरेच्या बंधनात ?
किती युगे आली किती युगे गेली
पण तिच्या साठी मात्र 
एकच नियम प्रत्येक युगात
तिनेही मग स्वतःला सामावून घेतलं
तरीही ती अबला या कठोर जगात
कधी कधी तिच्यातली तीच
तिला मागे खेचतेय पाहून जगाची चालढाल
स्वतंत्र व्यक्तिमत्व असून हि
पारतंत्र्य असे तिला या स्वतंत्र देशात
का गरज भासावी तिला अधिकारांची
या आधुनिक जगात ?
उठ जागी हो स्वतःला शोध
कुठे हरवलीस या जगाच्या मोहपाशात ?
स्वतःची कधीही पर्वा न करता
कुणी जाणिली का कधी तुझी रोजच्या जगण्यातील व्यथा ?
किती सिद्ध करशील तू प्रत्येक युगात स्वतःला ?
आधीच तुझी कर्तव्य कमी होती कि काय ?
नवीन जबाबदारी पेलायला निघालीस या आधुनिक जगात
वर्षा थोटे /पतके
गगनाला इंद्रधनुषी वेढा
नभ भासतोय आज वेड़ा
रंगाचे दान इंद्रधनू देत असे
अवनीही नभाला नवरी भासे
रंगबिरंगी नभी रंग पसरले असे
की,अवनीही नभाच्या मनी वसे
अवनीला का वाटे पावसाचा भास
नभ जाहला पावसाचा दुतावास
किती हा नजारा देखणा असे
नभाच्याही गाली लालीमा दिसे.
वर्षा पतके /थोटे
5/7/2018
एक पहिलाच प्रयत्न
जगी मुक्त संचारण्याचा इरादा
तुला जीवना जींकण्याचा इरादा
जरी ओढ नाही मला खेळण्याची
तुझा सोंगट्या मांडण्याचा इरादा
उरी भावनांची उठे लाट मोठी
तुझा सागरा बुड़विण्याचा इरादा
दिसे ना मला दूरचे फार काही
अनंता तुला पाहण्याचा इरादा
नसे आस आता मला पण,तरीही
तुझाही कुठे भेटण्याचा इरादा
वर्षा पतके-थोटे
18-7-2018
मजेत जगायचं, मजेत जगायचं
आनंदाचं देणं मनसोक्त उधळायचं
अंतरंगातील आनंदाला स्मरून
स्वःताशी प्रामाणीक राहायचं
मजेत जगायचं, मजेत जगायचं 
आनंदाचं देणं मनसोक्त उधळायचं
नित्य बदलत्या आयुष्याला सामोरी जाऊन
दुःखातून ,अपयशातून प्रगल्भ व्हायचं
स्वःताची क्षमता वाढवित सतत शिकत राहायचं
मजेत जगायचं, मजेत जगायचं
आनंदाचं देणं मनसोक्त उधळायचं
शांती व समाधान न गमावता
आयुष्यात हवं ते मिळवायचं
स्वःताच्या क्षमतांचा पूरेपूर वापर करायचं
मजेत जगायचं, मजेत जगायचं
या जगण्यावर भरभरून प्रेम करायचं
तनमनानं स्वस्थ ,चिरतरूण राहायचा प्रयत्न करायचं
भोवतालच जगही थोड अधिक सुंदर करायचा प्रयत्न करायचं
मजेत जगायचं, मजेत जगायचं
आनंदाचं देणं मनसोक्त उधळायचं
वर्षा पतके-थोटे
19-7-2018
भक्ताचं आणी माऊलींचे अद्वैताचे नाते😊
सांजेला होई टाळमृंदूगाची भेंट
विठोबा मलाही दिसशील का तू थेट .
तुझ्या वारीत असे अश्वासोबत वारक-यांचा रिंगण सोहळा 
मीही पाहीन म्हणते तुझा साक्षात्कार याची ड़ोळा
विठोबा का रे असा रूखमाईवर रूसतो
तुझाच आदर्श ठेऊन माणूस जगतो
माऊली म्हणती तुला माणसात
मलाही असे तुझी सावली या जगात
भक्तांना मिळते तुझ्यासोबत अद्वैताच सुख
माझीही भागवशील ना प्रेमाची भुक ?
किती सुंदर ,सावळे मनोहारी रूप दिसे
माणसामध्येही असेच रूप दिसेल का सावळ्या तुझे?
वर्षा पतके-थोटे
23-7-2018
मनातला पाऊस.....💗
मनातला पाऊस मनातच बोलतो
मनातल्या रानात शिळ घालता -घालता
बासरीतूनच राधेशी खूप काही बोलतो
मनातला पाऊस मनातच बोलतो
वृंदावनाशी दिव्यांची ओंजळ धरता-धरता
विष्णूही तूळशीच्या अंगणी फेर धरून नाचू लागतो
मनातला पाऊस मनातच बोलतो
आठवांचे मन सांभाळता-सांभाळता
मिरेलाही वेदनेचे थवे देत फिरतो
मनातला पाऊस मनातच बोलतो
असा कसा रे तू प्रत्येकाच्या मनात घर करतोस
तू नाकारले जरी-तरी प्रत्येक श्वासातच तू आम्हाला दिसतोस.
वर्षा पतके-थोटे
30-7-2018
*उगाच💕*
मनातली वेदना ओठावर
सहज कधीच येत नाही
वेदनेच्या माळरानावर
मोर उगाच नाचत नाही ।
मनातलं उगाच ओठांवर येत नाही ।।
त्सूनामी मूळे समूद्र
कधी आटत नाही
वेदना लपवून कुणी
उगाच हसत नाही ।
मनातलं ओठावर उगाच येत नाही ।।
आयुष्याशी तड़जोड़ कधी
सच्चा माणूस करत नाही ।
वादळे भिरभिरतात
उद्वेल्लीत मनात दाटून
येतं आभाळ
पण ते नेहमीच कागदावर
उतरत नाही ।
मनातलं ओठावर उगाच येत नाही ।।
जन्मभर अश्रूंची
संततधार पेलवत नाही ।
आसवांना कुठे पूर्णविराम द्यावा
कधीच कुणाला कळत नाही ।
मनातलं ओठावर उगाच येत नाही ।।
- *वर्षा पतके -थोटे😊*
16-07-2018
स्वप्न
एक अर्धमेलं स्वप्न
घेऊन जगतोय एक अणू
एका विशाल परीघाच्या आकाशाचं।
गर्द धूक्यान माखलं तरीही
अस्तित्वाच्या खूणा शोधतोय जन्मोजन्मी ।
आकाशाच्या त्रिज्येला हात लावू पाहतोय
अंतःप्रवाहात उंच उड़ी
घेवून ।
अनाकलनीय असं अणूचं वागणं
नेईल त्याला त्याच्या दिशान्तापर्यंत की
मधेच उंचावरून पडून मातीच सख्य करेल?
.........................काळच ठरवेल ............
वर्षा पतके -थोटे
21-08-2018
पिंपळपानं 💕
हिरवकंच हळवं नाजूक
पिंपळपान जाळीदार बनताना ।
आयुष्यावर शेकड़ो ताण झाले
आकांक्षाचे दान झाले।
काळजाचे रान झाले
वेदना अनिवार झाली।
आठवांचे तर्पण देऊन
वेदना विरक्त झाली ।
पिंपळपान बुध्दमय् होऊन
जाळीदार झाले ।
मनाच्या पुस्तकात जपलयं
💕पिंपळपान💕
वर्षा पतके -थोटे
28-08-2018
वाचन 💕
एखादा कोरा चेहरा
वाचायला फारच कठीण #
एक पान ही वाचता ना यावं?
आपलाच सवाल आपल्याच
ओठी विरून जावा
कानाच्या कोठडीत भयान
अंधारातली शांतता
अशावेळी..............
आपल्याच मनात चाललेली
विचारांची लढाई#
का?हा एवढा कोरा चेहरा
की कुणीच वाचू नये म्हणून
ओढवून घेतलेला मूखवटा?
की जन्मानेच कोरा?
कूणीतरी येऊन आपल्याला
सांगाव की नेमकं काय?
मग ........अशावेळी#
आपलेच आपल्याला प्रश्न आणी उत्तर
दोन्ही सोबत 😊
एकतर चेहरे वाचायचे नाही.
आणी वाचले तर संदर्भ लावायचे नाहीत
.......त्यापेक्षा पूस्तके वाचलेली केव्हाही उत्तम ..
आजच्या अनूभवातून😊
©वर्षा पतके थोटे
12-10-2018
कविता😊
मी💕
माझी व्यथा रड़ते 
कुणाची कथा जगते।
विचारांची गीता कळता कळता
अश्रूंची चिता छळते।
वाटेत एकटीच चालतांना
ओल्याच जखमा झेलते।
नकोशा असलेल्या वाटेतही
मन मारून विसावते।
पापणीचा श्वास थांबल्यानंतर
मीच माझे खांदे शोधते।
चितेची राख विझल्यानंतरही
स्मशानातले तुळशीपत्र
कुणाच्या तरी कथेत गवसते।
वर्षा पतके-थोटे😊
19-10-2018
सत्याभास💕
मनाचा उबंरा ओलाड़तांना
सत्य की आभास तूच जाणतोस
मनास माझ्या नवे क्षण
देण्यासाठी तूच रोज जगतोस
आंधळ्या पाऊलवाटेला चालतांना
सुर्यास झाकण्याचा ही प्रयास तुझाच असतो
काळजामध्ये फिरून तूच
पालवांची आस दाखवत असतोस
कोंरटीला आलेला बहर बघून
फुलबाग फुललीय हेच सांगत असतोस
येतीलही खूप आड़वळणे जीवनात
पण आताशा रस्ता सहज संपायला तूच झटतोस
पहाट स्वप्नांमध्येही तू अचानक येऊन
वास्तवात शिरता शिरता माघारी जातोस
या सगळ्यांच्या पल्याड जाता जाता
दुनियादारीही जोख बजावतोस
मनाचा उबंरा ओलांड़ताना
सत्य की आभास तूच जाणतोस.
©वर्षा पतके थोटे
25-10-2018
गुलाबी सकाळ💕
भाद्रपद संपतो आणी आश्विनाची कोवळी पावलं अंगणात पड़तात.सकाळ उगवते तीच मुळी गुलाबी थंडी पांघरून. या थंड़ीला एक बोचरी किनार असते.ती मोठीच सुखद अन् हवीहवीशी वाटणारी .
प्राजक्ताला नवा बहर येऊन केशरी सड़ा अंगणभर पसरलेला असतो.प्राजक्ताच्या सुंगधाने सारा आसमंत धुंद होतो.
सकाळी सकाळी दारासमोर सुंदरशी रांगोळी,सगळचं कसं ताजं टवटवीत अन् प्रसन्न वाटतं .वातावरणाला एका हळव्या गुलाबी कांतीचं देखणं व आल्हादकारक स्वरूप प्राप्त होतं.उत्साह मनाला नुसता गुदगुल्या करतो.
रात्रभर सुन्न पडलेलं आभाळ कसं मोकळं माकळं अन् दिलखुलास हसू लागतं आभाळ आणी सृष्टी याचं नातंही आता निःसंदिग्ध जुळलेलं असतं.
बागेतील वातावरण हिरव्याकंच रंगाने नुसतं न्हाऊन निघालेलं असतं .नानाविध फुलांच्या रंगाची उधळण झालेली असते.त्यात रंगीबेरंगी फुलपाखरही बेहोशपणे रूंजी घालू लागतात.
हे सर्व दृश्य मोठं मनोहारी असतं .अशी ही उगवत्या गुलाबी थंड़ीतील सकाळ मोठी प्रसन्न असते.तिच्या आगमनाने मन ताजतवानं होतं.अंतर्मनाच्या तारा हळुवारपणे छेड़ल्या जातात.अशी ही उगवत्या गुलाबी थंड़ीतील प्रसन्न सकाळ कधी संपूच नये असं वाटतं.
©वर्षा पतके थोटे
मनातला 
शब्दातून उतरलास तू मनात
शब्दांची ताकद तूझ्या विचारातून
लिखाणात येतचं होती.
हे माहीती होतं तूला पहिल्यापासूनच
तूझा पुरूषी स्वभाव बाजूला सारून
खोल मनाच्या गाभ्यात तूझ्या शब्दांनी
कधी प्रवेश केला ,तूला कळलं ही नसेल कदाचीत
तू शब्दातून दिलेल्या स्वप्नांच्या मोरपीसांना कवटाळून जगण्याचे संदर्भ शोधतेय.
तूझ्या शब्दातून तिच्या अस्तित्वाचा कण न् कण
प्रेमाने काठोकाठ भरायचा प्रयत्न करतोय.
तूझ्या शब्दांना कळली तहान तिच्या अतृप्त मनाची
मनावरील ओरखड़्याची .तसेच हेही कळले कशी असते स्त्री प्रेमार्ताची.
तूझ्या शब्दातून तू समजून घेतोस,सावरून घेतोस.
कधी न पूर्ण होणा-या स्वप्नासाठीही तू आपल्या शब्दातूनच काळजाचं घर करतोस.
कधी कधी शब्दातूनही पूरूष उलगडतो.
©वर्षा पतके थोटे
22-11-2018
गोंदण💕
तुझ्या नावाचे गोंदण
मनावर कोरून घेतले
धुळ माखल्या वाटांनी 
क्षणात जगून घेतले
आठवणींच्या क्षणांनी तुला
पून्हा एकदा स्मरूण घेतले
रखरखत्या या मनानी
मृगजळाला जवळी घेतले
अवनीवर उतरलेल्या चांदण्यांना
फुले म्हणूनी हाती घेतले
वांझोट्या या स्वप्नांना
लेखणीच्या हुंदक्यांनी जवळी घेतले
©वर्षा पतके थोटे
29-11-2018
रंगमंच
या रंगमंचावर कुठली भुमिका वठवतोय आपण .
तुझं अन् माझं रंगमंचावरचं पदार्पण खरयं का?
तुझे वास्तवात असणे की कल्पनेच्या
झालरीतून तुझे रंगमंचावर अवतरणे खरे
आपण रंगमंचावर एकमेकांशी संवादू की
कायमच रंगमंचावर संवाद फेकत राहू
तुझ्या माझ्या श्वासाला एक गती मिळेल की? प्रेक्षकांमध्ये कायमच श्वास
गुदमरला जाईल ?
रंगमंचावरील काळाच्या या नाटकात मनाची परिक्रमा पूर्ण होईल की? युगानूयुगे भळभळती जखम घेवून फिरावे लागेल?
हे ही काळचं ठरवेल ............
©वर्षा पतके थोटे
29-11-2018
बाकी
सायंकाळच्या शांत सावल्या पूढे पूढे सरकत आहेत.
अनासक्त तारे वारे यांचे मार्ग आखलेले आहेत
कधीतरी उमललेले फूल शांततेत पहूड़ले आहे
झाड़ेही हळूहळू निद्रिस्ततेच्या बाहूपाशात जायला तयार आहेत
अशातच त्यांच्या तळाशी साचत आहे काळोखाचा ड़ोह
जिणे तिथेच थांबल्याचा भास होतोय
जगण्याचे फक्त भासआभास जाणवतायेत
अजून थोडे जगणे बाकी आहे
अशावेळी रक्ताचे पाणी करणे आवश्यक आहे.
©वर्षा पतके थोटे
2-12-2018
माणसे 💕
सगळीकड़े माणसेच माणसे
इतक्या गर्दीतही एकटेच असती माणसे
रोज जगती,रोज मरती
रोज नवीन आशा करती माणसे
काही खास ,काही फास
दुःखातच कायम उमगती माणसे
काही पिंपळपानासारखी जाळीदार
मनात कायम जपून ठेवावीसी वाटतात माणसे
जीवनभर तीळ तीळ तूटूनही
शेवटपर्यंत जगणे शोधतच राहती माणसे
©वर्षा पतके थोटे
2-12-2018
काळजी नसावी
काही घटना आठवणींच्या पल्याड जात नाहीत.विस्मरणाचा स्पर्शही त्यांना स्पर्शून जात नाही.अशा या आठवणींमध्ये कुणीतरी मायेच्या सलगीने , बापाच्या काळजीने ,भावाच्या -बहिणीच्या मायेने,जिवलगाच्या प्रेमाने किंवा अव्यक्त नात्याने कूणी मनोमन आधार देत म्हणत असेल काळजी नसावी .या वाक्यासारखी वाक्य ही शब्दांचा गुच्छ न राहता जीवाचं अंतरंग बनतं.
अशा या आठवणी धुक्यातील दव ज्याप्रमाणे फुलावरं बसून एकरूप होऊन फुलांच्या अस्तित्वाचा हिस्सा बनून राहते. अगदी अशाच मनाच्या आतल्या कप्प्यात हट्ट करून बसलेली ही वाक्यातली आठवण ..................काळजी नसावी.
आधी पत्रव्यवहार असायचा .त्यामध्ये हट्टाने खाली हे वाक्य लिहीलेलं असायचं......काळजी नसावी
हे वाक्य वाचतांना ड़ोळ्यात आपसूकच पाणी यायचं.आणी मन त्या लिहीणा-या व्यक्तीच्या आठवणीत रमून यायचं .
अगदी असचं बोलताना हे वाक्य आपल्या बाबतीत जर कूणी म्हणत असेल तर आपल्या सारखे आपणच नशीबवान .
या दोन शब्दाच्या वाक्यात अवघी नाती समाविष्ट झाल्यासारखी वाटतात .म्हणजेच प्रत्येक नात्यातलं प्रेम . हे या दोन शब्दाच्या वाक्यातच समाविष्ट आहे की काय ?असं वाटायला लागतं.
काळजी नसावी
काळजी या शब्दातच बोलना-या,लिहीणा-या व्यक्तींचं काळीज ......काळजी हा शब्द शोधून आणतो.बोलतांना,लिहीतांना अगदीच साधं वाटणारं वाक्य .....वाचल्याबरोबर किंवा ऐकल्याबरोबर काळजाचा ठाव घेतं.आणी आपसूकचं हेच साधसं वाक्य पून्हा पून्हा वाचत किंवा ऐकत रहावसं वाटतं.
या एका दोन शब्दी वाक्याचा प्रत्येकाने वापर केला तर किती मानसिक आधार मिळतो. हे ज्याला खरंच मानसिक आधार हवा आहे .त्या व्यक्तीपेक्षा कोण चांगलं समजू शकेल.
चला तर मग करूया सुरूवात ........काळजी नसावी😊
©वर्षा पतके-थोटे
12-12-2018
अस्तित्व
माझ्याच शहराकड़े पाहतांना
फक्त रात्रीच्याच प्रकाशात
इतक्या कालावधीनंतरही 
एक अनोळखीपण जाणवतंय
माझ्याच शहराकड़े पाहतांना
दिवसा मात्र सगळे संदर्भ जुळतात
प्रत्येक खूण ओळखीची
ना वाट हरवण्याची भिती
ना हरवण्याची चिंता.
कारण,
प्रकाशाचे अस्तित्व सोबत असतं सौम्यपणे
कायम.
माझ्याच शहराकड़े पाहतांना
भासत असावं का हे अनोळखीपण?
आपल्याच शहरातलं
रात्रीच्या झगमगाटी
अस्तित्वहिन प्रकाशामुळे
की फक्त मलाच..?
रात्रीच्या झगमगाटी प्रकाशात
कसलं अनोळखीपण वाट्याला आलयं..
की,
माझीच मुळे रूजायचीच
आहेत माझ्याच शहरात ,अजूनही ...??
©वर्षा पतके थोटे
24-01-2018
मराठी भाषा दिनाच्या खूप खूप शुभेच्छा
"माय-मराठी"
सम्राज्ञी असे पसायदानाची
ज्ञानोबाची वाचा तू
महाराष्ट्राची असे लेक
ज्योती-सावित्रीची शाळा तू
शिवबाची असे तलवार
भिमाची मशाल तू
शिरोमणी असे ज्ञानगंगेची
अभंगातील साज तू
राज्याची असे राजभाषा
आमच्या ह्रदयाची शान तू
शोभा असे अंगणाची
घराघरातील संवाद तू
श्वासाचा असे हुंकार
माझ्या लेखणीचा आत्मा तू
©वर्षा पतके-थोटे
27-02-2019
आजन्म
आपली नाळ स्वतःच्या गावापासून
तुटतांना ती किती कष्टी होते.
दुस-या नाळेशी जुळतांना
सैरभैर होते, तुटते,पड़ते-झगड़ते, ठेचकाळते
तरिही ठेच लागलेला अंगठा लपवू पाहते
अनोळखी नजरेपासून.....
कारण तिला मायेच्या फुंकरीची शाश्वती नसते.
बरेच दिवस कायम उराशी बाळगून असते ती
एक अनोळखीपण.....
खरंतरं तीची नाळ जाणिवपूर्वक तोडली जाते
पण तरिही ती शांतपणे स्वःताची लढाई स्वताःशीच मात्र करत असते एकटीनेच........
तेव्हा अस्तित्वाच्या खूणा शोधत असते ती
जन्माच्या आधिपासूनच्या, आपल्याच पदरात
प्रत्येक पावलागणिक आशावते
पून्हा नव्याने उठून उभीही राहते....सतत
अश्वत्थामाही तिला रोज नव्याने तेल मागत येतो
तिच्या जखमेवर लावायचं राहून गेलेलं तेलंही ती
त्याला दानात देते. तरिही एक शापित दुस-या शापितेला हसतो.
कारण त्याला माहित असतं ही जखम न भरणारी आहे.....
पण, तरिही
तीला मात्र ती जखम मिरवायला नाही
आवडलं कधिचं......काल...आज...आणि उद्याही
हो... कारण तिचं बिच्चारेपण तिलाच नाही आवडलं कधिचं......
पण ती हरवलेल्या गावाची नाळ मात्र कायम
शोधत रहाते पावलागणिक
..आजपर्यंत कुठेच....कसलाच संदर्भ लागला नाही तिला अजून तरी........
शेवटी....थकून मनालाच समजावून सांगते ती एखाद्या बाळासारखी.....
आणि मग तिचं मनच त्या परक्या गावाशी आपली
नाळ जुळवून घेतं ....हसत...हसत
आजन्म....

©वर्षा पतके-थोटे
15-3-2019
अचानक काल एका ठिकाणी "चिमणी" या मैत्रीणीशी भेट झाली. आणि मग तिचे फोटो काढल्याशिवाय काहि राहवलं नाही. तीनेही छान फोटो काढून घेतलेत. कदाचित तिलाही माहिती असावं माणसे तसे जरी आपले संवर्धन करित नसले म्हणून काय झाले? फोटोत तर दिसणार असू आपण. तिचा आज हक्काचा दिवस आहे. हे तिलाही कदाचित माहिती नसावं........पण प्रत्येकच दिवस तिचा किंबहूना प्रत्येकाचाचं असावा ...असो
पण मी मात्र माझ्या लिखाणातून आधिच तिच्याबद्दल लिहून ठेवलेलं.कदाचित म्हणूनच काल इतक्या प्रेमाने भेटली असावी. खूप खूप सुंदर भेट......
माझ्या या मैत्रिणी बद्दल तसेच सगळ्याच रानातल्या माझ्या-तुमच्या मित्र-मैत्रिणी बद्दल काय लिहिलंय जरूर वाचा या लेखात.
लेख
-----
"रानपाखरं "
उड़त्या पाखरांना
परतीची तमा नसावी
नजरेत सदा नवी दिशा असावी
घरट्याचे काय आहे
बांधता येईल केंव्हाही
नजरेत सदा क्षितीज्यांच्याही
पलिकडे झेप घेण्याची
जिद्द असावी.
माणसांसारखीच दोन पायांवर चालणारी ही पाखरं त्यांच्या उडण्याच्या क्षमतेमूळे पक्षी म्हणून ओळखली जातात. पेंग्विन ,शहामृग यासारखी काही अपवाद वगळता बाकी सगळ्याच पक्षांना उड़ता येतचं. पिसांच्या व चोचीच्या रचनेमूळे पक्षी वजनाने अतिशय हलके असतात म्हणूनच ते उंच भरारी घेऊ शकतात. आणी हेच पिसे थंडी,गर्मीपासूनही संरक्षण करतात.
भारतीय संस्कृती मध्ये रामायण ,महाभारत यासारख्या काळांपासूनच पक्षांना खूप महत्व आहे. वेगवेगळ्या देवतांचे वाहन म्हणून पक्षांना महत्वाचे स्थान अधोरेखित करण्यात आले आहे.
या सुंदर ,रंगीबेरंगी पक्षांच्या सुरेल आवाजाने सूर्य किरणांसोबत वसुंधरा जागी होते आणी प्रफूल्लित अशा दिवसाची सुरूवात होते. ही पाखरं निसर्गाशी खूप एकरूप असतात. निसर्गाच्या वातावरणातील बदलाची चाहूल सगळ्यात आधी यांनाच जाणवते म्हणून मग मेघराजाच्या आगमनापूर्वीच यांचे जंगलात,झाडावर घरटी तयार असतात. पण दृष्ट माणूस त्यांच्या साम्राराज्यावर अतिक्रमण करतोय ...म्हणून मग तिही माणसांच्या घरात येऊन घरटी बांधू पहातायेत.
या पाखरांना माणसासारखं सीमारेषा हे बंधन माहीतीच नाही. ते थंडीच्या दिवसांमध्ये खूप दूर भटकत भटकत दूस-या देशातही जाऊन पोहचतात. यांना मायग्रेशन बर्ड़ किंवा प्रवासी पक्षी म्हणतात. भारतामध्ये बरेच पक्षी हिवाळ्यात मायग्रेशन करत येतात. पूण्याजवळ एका ठिकाणी यांना पहायला special tour arrange केले जातात.
कोकणातील गिरिच या गावाला पक्ष्यांचे नंदनवन म्हणतात. पहाटेलाच पक्ष्यांचा किलबिलाट सूर्य किरणांबरोबर सुरू होतो. इथे सर्व जातीची ,आगळ्या रंगाची ,अनोख्या ढंगाची अनेक पक्षी पहावयास मिळतात. काही न ऐकलेली नावे जसे की,रानभाई,जंगलभाई,जंगली सातबहिनी,केंकाट्या इत्यादी अनेक पाखरं बघावयास मिळतात.
या पाखरांमूळे पर्यावरणाचा समतोल राखला जातो. बीजप्रसार होतो. निसर्गाची सुंदरता वाढते. सकाळी सकाळी पक्ष्यांचे सुमधूर आवाजाने आपण ताजे तवाने होतो. तसेच निसर्गातील कीड़ नियंत्रण आणी सरपटणा-या प्राण्यांचे संतुलन राखण्याचे काम होते. इतका फायदा या पाखरांमूळे होतो.
पण येत्या काही वर्षात चिमणी सारखा पक्षी जो आपल्या अवतीभवती सतत दिसायचा तो आजकाल माणसानी लावलेल्या नवीन शोधांमूळे दिसेनासा झालाय. यासारखी अनेक पाखरं जी आपल्याला माहीती ही नाहीत. यांच्या जाती नष्ट झाल्या तरी समजलेही नसेल किंवा समजणार ही नाही. मग अशावेळी आपण मानव जातीने यांचे संवर्धन करणे खरचं खूप गरजेचे आहे. नाहीतर निसर्गाचा ड़ोलारा कोलमड़तोच आहे. तो संपायला वेळ ही नाही लागणार . पक्षीमित्र संमेलन या सारख्या संमेलनातून शक्य होईल तेवढे उपाय आणी योजना राबवल्या जाव्यात. आणी अधिक माहीती साठी विदर्भाचे पक्षीमित्र मारूती चित्तमपल्ली यांच्या पूस्तकांचे संदर्भ जरूर घ्यावेत.
जसे की ,पक्षीकोश,निळावंती,सूवर्णगरूड़,पाखरमाया इत्यादी त्यांची नावाजलेली पूस्तके आहेत. या व्यतिरिक्त भारतातील पक्षी निरीक्षकासाठी ड़ाॅ.सालीम अली यांनी "दि बुक ऑफ इंडियन बर्ड़"
हे पुस्तक लिहीलेय.
चला तर मग लागू यात अभ्यासपूर्ण संवर्धनाला .
©वर्षा पतके -थोटे
24-01-2019
Varsha Thote
कविते💕
तू आता आमच्या सोबत कायमच असतेस
खातांना,पिंताना,जगतांना..
इतकंच काय मरतांनाही.
शाळेत असतांना फार कठीण वगैरे वाटायचीस
बाईंनी,सरांनी समजून दिल्या शिवाय समजायची नाहीस.
तेव्हा वाटायचं ही आणी हिला लिहीणारे वेगळ्याच जगातले लोक की काय
तेव्हा फार न कळणारी,दूर्बोध वगैरे..
आताशा का इतकी सहज ग..?
तुलाही माणसांसारखी नाव वगैरे कमवायची हौस लागलेली दिसते
आधी आम्हाला वाटायचं यमकाने
टाळीवर टाळी द्यायला हवी
तरच कवितां तयार होईल
ते काम कुणीही सहजरित्या नव्हतं ग करू शकत..
पण हल्ली तू बोलता बोलता ही तयार होतेस..मुक्तछंदात वगैरे
आणि आजकाल यमकाची टाळीही अशी असते की ती वाजतही नाही
मग लगेच तू आणि कवी वगैरे नावारूपास येता
पण नेमकं कोण कूणामुळे नावारूपास येतं काही कळतच नाही अग
काहीही असो आमच्यासारख्या साध्या लोकांनाही तू कळायला लागलीस..
भावलीस हे जास्त महत्वाचं.
आधी तू राजघराण्यातली वगैरे वाटायचीस
आता आमच्यातलीच वाटतेस..
आम्हाला जसे स्वांतत्र्य मिळाले तसेच तूलाही मिळाले का ग?
पण सांगू का..
स्वातंत्र्य मिळणे महत्त्वाचे
मग आपण ते कसे का वापरत असू
काय फरक पडणार असतो..
नाही का?
(ते कसे वापरतो हा प्रश्नच आहे म्हणा)
काय म्हणालीस..
मी तूझ्याशी बोलता बोलता तयारही झालीस मुक्तछंदात !
व्वा भारी बयो
किती सहज ग तू!
©वर्षा पतके-थोटे

बघ तुला सगळं जमायलाच हवं..


घरातल्या प्रत्येकाचं मन तू जपायलाच हवं.
तुझं मन दुखलं तर काय फरक पडतोय ?
दुख-या मनाला समजवायलाच हवं
बघ ! हे सगळं तुला जमायलाच हवं!
युगानूयुगे हे शिकावच लागेल
अगदी निष्णात वगैरे व्हायला लागेल !
प्रयत्न कुठेही कमी पडता कामा नये बरं का?
बघ! हे सगळं तुला जमायलाच हवं !
तुझ्यावर जबाबदारी आहे सगळ्या घराची
असा आभास का असेना तो जपावाच लागेल!
निदान तसं तुला भासवलं तरी .. बरं म्हणून आपलं मानावं लागेल ?
बघ! हे सगळं तुला जमायलाच हवं !
कन्हत तुझं झोपणं चालणार नाहीये बरं..
तुझ्यामुळे अख्खं घर झोपायला नको !
असशील आजारी म्हणून काय झालं ?
बघ! हे सगळं तुला जमायलाच हवं!
सगळं अडलं नडलं पाहाणं तुझंच काम.. आवडी निवडी विसरून रमावं लागेल
मनाला वेसण घालावीच लागेल ..
मग काय झालं तुझं चित्त था-यावर नसेल
बघ! हे सगळं तुला जमायलाच हवं!
प्रत्येकाशी अदबशीर वागावच लागेल
प्रत्येकाचं मन सांभाळून घ्यावंच लागेल !
तुलाही जिव्हाळा मिळो न मिळो
बघ! हे तुला सगळं जमायलाच हवं!
ऐन सांजेला का ग रड़तेस बाई भरल्या घराला भकास करतेस बाई
कुटूंबाला हसवायचं म्हणून हसावच लागेल
बघ! हे तुला सगळं जमायलाच हवं!
का असा चेहरा पाड़तेस आये
घरादाराची प्रतिष्ठा जाईल ना माये
हवं तर कोप-यात ढाळ तुझे अश्रू
अन चारचौघात मात्र हसत वावर
बघ! हे तुला सगळं जमायलाचं हवं!
त्या शेवटावर ही अधिकार सांगू नकोस हं
नाहीतर आयुष्याची तपश्चर्या वाया जाईल अगं
मरेस्तोवर जगली मनाविरूध्द तर काय झालं
बघ!हे तुला सगळं जमायलाच हवं!
का म्हणून काय पुसतेस ?
बाई आहेस तू..
जगायचे सोड जगवायला शिक
बघ! हे तुला जमायलाच हवं!
बाई तुला असंच जगायला हवं .. !
©वर्षा पतके-थोटे
28-03-2019

गुरुवार, ६ जून, २०१९

पत्र अठ्ठावीस


न लिहिलेली पत्रे-Unwritten Letters
16 hrs
पुस्तके हा एक जगण्याचा धर्म असतो...ती वाचलीच पाहिजेत असा त्यांचा हट्ट नसतो..पण त्यांच्या सानिध्यात एक अपार शांतता मिळते हे मात्र खरे.
#विश्रब्ध - वर्षा पतके थोट
२८
आज जरा लायब्ररीत जावं म्हणतेय अरे! बरेच दिवसात निवांतपणा असा नाहीच मिळाला. तुला माहीत्येय ना, माझं हक्काचं आणि शांततेचं ठिकाण कुठलं असेल तर ते लायब्ररी. लहान असतांना आई सोबत गावातल्या लायब्ररीत जायचे, पण तिथल्या मोठमोठाल्या भिंती आणि पुस्तकांच्या समवेत रांगेने लागलेली मोठमोठी कपाट पाहिली की खूप धड़की भरायची मनात..पण आईच्या मागेमागे जायला मात्र प्रचंड आवडायचं.. पण ती तिथे जरा वेळ बसली तर मी मात्र अस्वस्थ व्हायचे ..
पुस्तकांमूळे नाही काही तिथल्या स्मशान शांततेमूळे. मग माझा सारखा हट्ट आई घरी चल, घरी चल. ती पुस्तक परत करेपर्यंत मी बाहेर आलेले असायचे.
पण जशी जशी मोठी होत गेले याच पुस्तकांनी आपलंसं केलं खूप भरभरून प्रेम केलं. नव्हे मी त्यांच्या प्रेमात पड़ले. पुस्तक वाचल्याशिवाय माझी रात्र होत नाही. अरे, ती लहान पणी जाणवणारी लायब्ररीतली स्मशान शांतता जीवनाच्या खाचखळग्यात कधी गुडूप झाली कळलंही नाही.
पण पुस्तकांनी मात्र जीवनाचं गणित सोडवायला फार मदत केली आणि अजूनही करताहेत आणि मला ठाम विश्वास आहे की, ती माझ्या जीवनाच्या अंतापर्यत सोबत राहतील.
तुला माहीतीय न लोक मरायच्या आधी इच्छा बोलून दाखवतात. मला असं आणि अमूक अमूक ठिकाणी मरण यावं किंवा त्या इच्छित स्थळी च मला मुठमाती द्यावी. तसचं मला जर कुणी विचारलं तर, माझी इच्छा एकचं असेल मला पुस्तकांच्या सानिध्यात मरण यावं....नव्हे पुस्तक वाचता वाचताच आपण निघून जावं. ....असो.
अर्रर्र; चिड़तोयस का? ते ही इतका? , एक दिवस जायचं असतंच रे सगळ्यांना, मग हे सहजगतीने स्विकारता यायलाचं हवं. तसंही मी माझ्या मनीची इच्छा बोलून दाखवली कारण तू मला या पुस्तकांच्या दुनियेतूनचं तर भेटलास. मग माझं जेवढं तुझ्यावर प्रेम तेवढंच पुस्तकांवर पण, हो की नाही.
बघ! तुझ्याशी बोलता बोलता पोहचली पण माझ्या आणि तुझ्या आवडत्यादुनियेत.....शांततेत.
इथे येऊन सगळी दुःख, काळजी, विवंचना अगदी सगळं विसरून कपाटातल्या पुस्तकांना बघता बघता कोणतं पुस्तक हातात घेवून वाचायला सुरूवात केलीय...हे जोपर्यंत पुस्तकांचं नाव बघत नाही तोपर्यंत कळतंही नाही. हो अरे, सगळीच पुस्तक इतक्या आपूलकीने पाहत असतात. जणू! आता ही आपल्यालाचं लहान बाळासारखी उचलून कड़ेवर घेणार आणि आपले लाड़ पूरवणार..या प्रत्येक पुस्तकाच्या चढाओढीत मी मात्र पार आनंदाने हरवून जाते......आणि सहज त्या दिवसातले तीन-चार तास जगून घेते. घरी वाचन होतचं पण लायब्ररीत आणि ते ही इतक्या सगळ्या पुस्तकांच्या दुनियेत वाचणे म्हणजे पर्वणीचं जणू! म्हणून ज्या दिवशी लायब्ररीत जायचं असतं. तो दिवस माझ्यासाठी खासचं.....अगदी तुझ्यासारखा
हो माहीत्येय रे मला, माझ्याप्रमाणेच तूही पुस्तकं वेड़ा म्हणूनचं तर आपले ऋणानूबंध जन्मोजन्मी जुळताहेत.
मग उगीच म्हणते का मी तुला " विश्रब्ध"
तुझीच,
©वर्षा
पत्र सत्तावीस


न लिहिलेली पत्रे-Unwritten Letters
विचार करा..वाचा..
विक्रम
#विश्रब्ध – वर्षा पतके थोटे
27
आज न मला तुला काहीतरी खास सांगायचंय, ऐक तर, ......
माझ्या मैत्रीणीविषयी .....बघ ना म्हणजे कसं असतं ना, माणसाचे पोट भरायला लागले की त्या माणसाच्या नजरेत दोष उत्पन्न होतो. मग त्याला त्या भरल्या ताटात काहीबाही दिसायला लागतं. तसचं काहीसं माझ्या मैत्रीणीबाबतीतही झालंय.
तिला आठवली ती संध्याकाळ. तिचा तिच्या सख्यासोबत झालेला वाद. वाद कसला एकटाच लालबुंद होऊन तिला संशयाच्या कोठडीत उभा करू पहात होता. एकदा या संशय नावाच्या वाळवीने जर का एखाद्या नात्यात घर केले तर, भले भले सिक॔दर ही चितपट होतात. संशय या शब्दासोबतचं बघ मृत्यू फिरतोय की काय असं जाणवतं आणि ते खरं ही आहेच म्हणा ! नात्याचा केव्हाच क्षय होतो म्हणजे खरंतर तो मृत्यूचं ...अरे, त्यापेक्षा स्वतःवर आधी विश्वास ठेवावा. प्रेम माणसाला जसं अंतःरंगातून बदलवतं तसचं त्यातूनच निर्माण झालेले विकार पार धुळीस मिळवतात.
मुळातचं निसर्गाने स्त्री आणि पुरूष दोन व्यक्तिमत्व शरीर आणि मनानेही वेगवेगळी बनवलीत. पण मन बनवतांना दोघांच्याही मनातला थोडाथोडा हिस्सा एकमेकांत मिसळवला, जेणेकरून त्याच्या मनाची तिला जाणीव व्हावी आणि तिच्या मनाची त्याला जाणिव व्हावी. किती सुंदररित्या दोघांनाही एकमेकांत गुंफलय. दोन्ही शक्ती एकमेकांना पुरक जणू! अर्धनारी नटेश्वराची प्रतिमा हेच सुचित करत असावी. पण हा अर्थ सोयीस्करपणे तिचा सखा विसरलाय आणि पुरुषी वर्चस्व गाजवू पहातोय.
स्त्रीने थोड्या भावना व्यक्त केल्या, थोडी मनसोक्त हसली, बोलली, मनाप्रमाणे वागली म्हणजे लगेच स्वैराचारी वगैरे ठरतेय का रे ?
तिलाही तिच्या जाणीवांची उमग असतेच. पण आताशा कुठे ती पिंज-यातून बाहेर पडून जाणिवा जगू पाहतेय. तर तिथेही कुठेतरी या संशयाची सुई सारखी तिच्या दिशेने येतेय.
मी एक स्त्री म्हणून तुला स्त्री मनाचं खास गुपित सांगते ऐक!.....स्त्री जाणिवा खूप प्रगल्भ असतात. त्या जाणिवांची संवेदनशिलता त्याची खोली सगळ्यांचा तिला एक स्त्री म्हणून आदर, सन्मान असतो. म्हणूनच या तिच्या विश्वात जो पुरूष तिचा सन्मान, आदर, विश्वास ठेवेल तो तिला लगेच उमजतो कारण हा सिक्स्थ सेन्स तिला देवाने वरदान म्हणून दिलेला असतो. तिच्या या अनमोल अशा या विश्वात त्याच पुरूषाला ती प्रेमाचे अतूटबंध ही बांधू देण्याची परवानगी देते. नाहीतर शरीरापर्यत पोहोचण्यासाठी लग्न हे बंधन पूरेसं आहे. पण मनाचं काय? असे कितीसे लग्न झालेली जोडपी एकमेकांच्या मनापर्यंत पोहचलीत?? ......खरचं नाही सांगता यायचं....
एकदा का तिच्या मनाला एखाद्या पुरूषी मनाने जिंकलं....हो ....हो जिंकणेच म्हणेन मी ते काही सोप्प काम नव्हे.....तो लाख प्रयत्न करेल, पण तिच्या मनाने त्याला स्थान द्यायला हवं.....आणि एकदा का हे स्थान तिच्या मनात पक्कं झालं की, देवांचे देव जरी पृथ्वीवर अवतरले तरी ते ढळायचे नाही.....मग अशावेळी मला सांग माझ्या मैत्रीणीचा सखा तिच्यामनातली जागा या वाईट विकांरामूळे गमवतोय की नाही.........एकदा का मनातनं उतरवलं की पुन्हा ती जागा नाहीच मिळू शकतं.
पण मी मात्र खूप नशिबवान! तू माझ्या या स्त्री विश्वात जन्मोजन्मीच कायम वास्तव्य करत आलास. तुझ्यातलं स्त्री मन आणि पुरूष मन वेगळं नाहीच करता यायचं रे! केवढा तो विश्वास, आदर आणि लाघवी सख्य असणं....एका स्त्रीला यापेक्षा सुख ते काय हवं !
भेटत राहूया जन्मोजन्मी.......असंच संशयाशिवाय .. !!! इतक्याच विश्वासानं ..
मग उगाच का म्हणते मी तुला " विश्रब्ध"
तुझीच,
©वर्षा