शुक्रवार, ७ जून, २०१९


बघ तुला सगळं जमायलाच हवं..


घरातल्या प्रत्येकाचं मन तू जपायलाच हवं.
तुझं मन दुखलं तर काय फरक पडतोय ?
दुख-या मनाला समजवायलाच हवं
बघ ! हे सगळं तुला जमायलाच हवं!
युगानूयुगे हे शिकावच लागेल
अगदी निष्णात वगैरे व्हायला लागेल !
प्रयत्न कुठेही कमी पडता कामा नये बरं का?
बघ! हे सगळं तुला जमायलाच हवं !
तुझ्यावर जबाबदारी आहे सगळ्या घराची
असा आभास का असेना तो जपावाच लागेल!
निदान तसं तुला भासवलं तरी .. बरं म्हणून आपलं मानावं लागेल ?
बघ! हे सगळं तुला जमायलाच हवं !
कन्हत तुझं झोपणं चालणार नाहीये बरं..
तुझ्यामुळे अख्खं घर झोपायला नको !
असशील आजारी म्हणून काय झालं ?
बघ! हे सगळं तुला जमायलाच हवं!
सगळं अडलं नडलं पाहाणं तुझंच काम.. आवडी निवडी विसरून रमावं लागेल
मनाला वेसण घालावीच लागेल ..
मग काय झालं तुझं चित्त था-यावर नसेल
बघ! हे सगळं तुला जमायलाच हवं!
प्रत्येकाशी अदबशीर वागावच लागेल
प्रत्येकाचं मन सांभाळून घ्यावंच लागेल !
तुलाही जिव्हाळा मिळो न मिळो
बघ! हे तुला सगळं जमायलाच हवं!
ऐन सांजेला का ग रड़तेस बाई भरल्या घराला भकास करतेस बाई
कुटूंबाला हसवायचं म्हणून हसावच लागेल
बघ! हे तुला सगळं जमायलाच हवं!
का असा चेहरा पाड़तेस आये
घरादाराची प्रतिष्ठा जाईल ना माये
हवं तर कोप-यात ढाळ तुझे अश्रू
अन चारचौघात मात्र हसत वावर
बघ! हे तुला सगळं जमायलाचं हवं!
त्या शेवटावर ही अधिकार सांगू नकोस हं
नाहीतर आयुष्याची तपश्चर्या वाया जाईल अगं
मरेस्तोवर जगली मनाविरूध्द तर काय झालं
बघ!हे तुला सगळं जमायलाच हवं!
का म्हणून काय पुसतेस ?
बाई आहेस तू..
जगायचे सोड जगवायला शिक
बघ! हे तुला जमायलाच हवं!
बाई तुला असंच जगायला हवं .. !
©वर्षा पतके-थोटे
28-03-2019

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा