शुक्रवार, ७ जून, २०१९

गुलाबी सकाळ💕
भाद्रपद संपतो आणी आश्विनाची कोवळी पावलं अंगणात पड़तात.सकाळ उगवते तीच मुळी गुलाबी थंडी पांघरून. या थंड़ीला एक बोचरी किनार असते.ती मोठीच सुखद अन् हवीहवीशी वाटणारी .
प्राजक्ताला नवा बहर येऊन केशरी सड़ा अंगणभर पसरलेला असतो.प्राजक्ताच्या सुंगधाने सारा आसमंत धुंद होतो.
सकाळी सकाळी दारासमोर सुंदरशी रांगोळी,सगळचं कसं ताजं टवटवीत अन् प्रसन्न वाटतं .वातावरणाला एका हळव्या गुलाबी कांतीचं देखणं व आल्हादकारक स्वरूप प्राप्त होतं.उत्साह मनाला नुसता गुदगुल्या करतो.
रात्रभर सुन्न पडलेलं आभाळ कसं मोकळं माकळं अन् दिलखुलास हसू लागतं आभाळ आणी सृष्टी याचं नातंही आता निःसंदिग्ध जुळलेलं असतं.
बागेतील वातावरण हिरव्याकंच रंगाने नुसतं न्हाऊन निघालेलं असतं .नानाविध फुलांच्या रंगाची उधळण झालेली असते.त्यात रंगीबेरंगी फुलपाखरही बेहोशपणे रूंजी घालू लागतात.
हे सर्व दृश्य मोठं मनोहारी असतं .अशी ही उगवत्या गुलाबी थंड़ीतील सकाळ मोठी प्रसन्न असते.तिच्या आगमनाने मन ताजतवानं होतं.अंतर्मनाच्या तारा हळुवारपणे छेड़ल्या जातात.अशी ही उगवत्या गुलाबी थंड़ीतील प्रसन्न सकाळ कधी संपूच नये असं वाटतं.
©वर्षा पतके थोटे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा