Vikram Bhagwattoनुक्कड कथा विश्व
वर्षाने अलीकडे लघुकथेच्या माध्यमावर आपले पक्कड जमवायला सुरुवात केली आहे. छान वर्षा!
वावटळ – वर्षा थोटे-पतके
अंधाऱ्या रात्री किर्रर्र किर्रर्र किड्यांच्या आवाजात चर्रर्र चर्रर्र आवाज करत एक गाडी गावातल्या चौकात येऊन थांबली त्याबरोबरच अख्ख गाव हादरून गेलं. गाव कसलं दोनशे-तीनशे लोकांची वस्ती होती. दुर्गम भागात असल्यामुळे जगाशी फारसा संबंध येत नसला तरी रमाचा बाप पोलिसांना सगळ्या खबऱ्या पुरवायचा. आपल्या भागातील, लहान्या राजाला जन्म दिल्यावर काही महिन्यातच रमाच्या आईने घरादाराच्या खटल्यातून कायमची सुटका करून घेतली होती.
बापाचाच काय तो आधार होता. तोही निकराने आपलं फाटक कुटुंब राखत होता. पण काही कळायच्या आत तो, गाडी गावात आली त्यादिवसापासून गायब झाला. या गोष्टीला आठ-एक दिवस झाले असतील. दुपारच्या स्मशानशांतता असलेल्या उन्हात पोलिसांची गाडी आली आणि कोणकोण गायब आहे विचारपूस करू लागली तेवढ्यात पोलिसांचा शर्ट मागून ओढला गेल्यामुळे तो मागे पाहू लागला.
तेलाचा स्पर्श न झालेल्या, धूळ वाऱ्याने तार-तार केसांची रमा आपल्या फ्रॉकच्या पांच कान्ज्यामध्ये कशीबशी दोन बटन अडकवून एका हाताने डोक्यावरच्या बारक्या काटक्यांची मोळी सांभाळत उभी होती. दुसऱ्या हाताने तिने अडीच-तीन वर्षाच्या फक्त मळकट फाटका शर्ट अडकवलेल्या भावाला धरलं होत. मागे तिची पाच वर्षाची बहीण नाकातला शेंबूड कोपराच्या बाहीने पुसत उभी होती. उण्या-पुऱ्या नऊ-दहा वर्षाची रमा थकलेल्या डोळ्यांनी सुकलेल्या ओठांवरून जीभ फिरवत रमा पुन्हापुन्हा पोलिसाला विचारात होती, "दाजी कव्हा येतील जी?"
तीन पोरक्या जीवांना वाऱ्यावर फिरकावणाऱ्या वावटळीत पोलीस मात्र सोंगाड्या बनून आपलाच ढोल पिटत होता .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा