महादेवा जातो गा
==================
लहानपणी शिवरात्रीच्या साधारण एखादं महिना अगोदर आमच्या गावात खूप दूरवरून शिवाचे गाणे ऐकू यायचे. तेव्हा मी मोठ्या उत्सुकतेने आईला विचारायचे. ‘आई हे शिवाचे गाणे कोण म्हणतं ग’? तेव्हा आई म्हणायची ‘ हा शिवरात्रीचा पोहा शिवाच्या दर्शनाला पायी निघाला आहे’. जसे वारकरी पंढरीला जातात तसे हे शिवभक्त महादेवाला जातात. कोणी मोठ्या महादेवाला जातात तर कोणी लहान महादेवाला जातात’, माझ्या बालबुद्धीला कळतंच नव्हतं. मोठा महादेव म्हणजे काय आणि लहान महादेव म्हणजे काय ? लहानपणापासून कुठल्याही मुळाशी जाण्याची सवय आहेच. ती अजूनही शाबूत आहे. आईला खूप विचारायचे लहान महादेव म्हणजे काय आणि मोठा महादेव म्हणजे काय ? पण आईच्या उत्तराने समाधान नाही झाले म्हणून मोर्चा बाबाकडे वळविला तर शिक्षक असणारे माझे बाबा त्यांच्या मांडीवर मला बसवून सांगू लागले. म्हणाले बघ मी तुला एक पोहा म्हणून दाखवतो. तो जर तुला कळला तर तुला खऱ्या अर्थाने मोठा महादेव म्हणजे काय आणि छोटा महादेव म्हणजे काय कळेल. मी आनंदाने मान डोलावली आणि बाबांनी त्यांच्या आवाजात पोहा म्हणायला सुरुवात केली.
‘’महादेवा जातो रडते माझी माय
नको रडू माय, पोहा खुशालीनं हाय
तुझ्या गावी येतो आजू बाजू खाया
सोडली गोताची माया लागतो चवऱ्याच्या पाया
सोडले सोडले, महेल माड्या
पाणी नाही सोड, तन्नाच्या झोपड्या”
हा पोहा मी बाबांकडून ऐकला आणि लगेच प्रश्न विचारला ‘बाबा पोहा म्हणजे काय हो’? बाबा म्हणाले पोहा म्हणजे ‘ माणसांचा जत्था जो एकत्रित महादेवाच्या जत्रेला जातो. आणि ते जे शिवाचे गुणगान करत किंवा त्याला आपलं गाऱ्हाणं सांगत गाणं गात जातात त्याला सुद्धा पोहा म्हणतात. महादेवाची यात्रा करणे त्या काळापर्यंत फार कठीण असायचे. म्हणून मग लोकं एकट्या दुकट्याने न जाता सोबतीने महादेवाच्या जत्रेला जायचे. बरं फक्त महादेवाच्याच जत्रेला का तर महादेव जंगलात आणि तेही उंच अशा पहाडावर किंवा पहाडाच्या आतमध्ये जाऊन बसलेले असत. बरं या पोह्यात सर्व जातीधर्माचे लोकं पण समाविष्ट असत. ना कुठला भेदभाव ना कुठला अहंकार. असायची ती फक्त शिवाला भेटण्याची आंतरिक ओढ. हा पोहा शिवाला आपलं गाऱ्हाणं गाण्यातून सांगत किंवा शिवस्तुती करत पुढे पुढे चालत राही. सोबतीला एक त्रिशूल असे. जे त्यांना एकप्रकारे मानसिक आधार देत असावे की त्रिशूल सोबत आहे म्हणजे महादेव आपल्या सोबत आहे हा एक अतूट विश्वास असे. दरवर्षी निघणारा हा पोहा कधी छोट्या महादेवाला म्हणजे सालबर्डीच्या शिवगुफेला जाई. इथे जाण्यासाठी मोठ्या महादेवापेक्षा कमी अंतर पार करावे लागे. कधी हा पोहा पंचमढीच्या चौरागडला जाई. या ठिकाणी घनदाट अरण्यातून रस्ता कापत पुढे जावे लागे. घनदाट अरण्यातून जाणे म्हणजे जीव वेढीस धरून चालणे. कधी हिंस्त्र प्राणी समोर येईल सांगता यायचे नाही. त्या मानाने छोटा महादेवाला जाताना जरी घनदाट अरण्य असले तरी अंतर कमी होते. म्हणून छोटा महादेव आणि मोठा महादेव अशी नावे लोकगीतातूनच पडली असावीत. आता जरी घनदाट अरण्य नसले तरी अंतर मात्र तेवढेच आहे आणि पायीच जावं लागतं. जेव्हा हा पोहा शिवाचे गाणे म्हणत गावोगावी चालत निघत असे तेव्हा दुरून त्यांचे ते गाणे ऐकू येत असे. हे गाणे ऐकू आले की मनात कुठेतरी चलबिचल सुरु होई कारण हा पोहा मनुष्याच्या अंतर्मनाचा ठाव घेऊन काळीज चिरत आतपर्यंत पोहचत असे. गावोगावी त्यांची खाण्याची बडदास्त गावकऱ्यांकडून केली जाई. सोबत शिधा आटा पण दिला जाई. पण एकदा का अरण्याची वाट सुरु झाली की त्यांना आहे त्या परिस्थितीला सामोरी जाऊन कच्च -बाभळ रांधून खावंच लागे आणि ते ही कच्च-बाभळ खातच आपला प्रवास पूर्ण करीत असत. या पोह्या मध्ये फक्त पुरुष मंडळी जात आणि ते ही बहुतेक अर्ध्या वयाचे. ज्या घरचा माणूस पोहा म्हणत घरातून यात्रेला निघे त्या घरी रडभूक सुरु होई. जशी मिल्ट्रीमध्ये जाताना सैनिकाच्या घरी रडभूक सुटत असे. आणि हे पाहायला सगळं गाव जमा होई. सुरुवातीलाच तो डोळ्यातलं पाणी लपवत म्हणत असे ‘ महादेवा जातो गाsss’ त्याचं ते महादेवा जातो गा ऐकलं की गावकऱ्यांच्या डोळ्यात आपोआप पाणी दाटून येई. आणि हाच पोहा पोह्यातील सगळेजण मिळून म्हणत तेव्हा काळीज चिरत तो आवाज महादेवापर्यंत पोहचत असावा. महादेवाच्या या जत्रेवरून हा पोहा सहीसलामत परत आल्यानंतर मावंद केलं जाई. आपल्या ऐपतीप्रमाणे चारदोन लोकांना जेवू घालणे म्हणजे मावंद केलं असं म्हणत असत. महादेवाला जाणे म्हणजे सगळं गणगोत मागे टाकून शिवाच्या भेटीला चौरागडला नाहीतर सालबर्डीला जात आणि तेथून परत येणारा तो नशीबवान असं म्हटलं जात असे. आता तो काळही राहिला नाही, त्या धारणाही राहिल्या नाही. शिवाचे दर्शनही आधी एवढे कठीण राहिले नाही म्हणून ‘पोहा’ सारखी लोकगीतेही राहिली नाही. सोबतीने चालण्याची सामाजिक रीतही राहिली नाही, तो अपार विश्वासही राहिला नाही आणि अजूनही मला पडत असलेल्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी महादेवराव नाव असलेले माझे बाबाही राहिले नाहीत.
©वर्षा पतके थोटे
७ मार्च २०२४
<script async src="https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-5032057122896847"
crossorigin="anonymous"></script>

