सोमवार, १८ ऑक्टोबर, २०२१


 शक्तिरूपेण: संस्थिता

===================


नववी माळ----कुलसुम सयानी


मी कुलसुम सयानी. माझा जन्म 1900मध्ये मुबंई येथे झाला. माझे वडील मौलाना आझाद यांचे वैयक्तिक डाॅक्टर होते. काही काळ ते महात्मा गांधीचे सुद्धा डाॅक्टर होते. एकदा मी माझ्या वडिलांसोबत गांधीजींच्या भेटीस गेले. तिथे मला जानकीदेवी बजाज भेटल्या. तेव्हा त्या बोलता बोलता म्हणाल्या पडदानशीन स्त्रियांबरोबर काम करणे अतिशय कठीण आहे. त्यांच्या या वाक्यामुळे मला जीवनाचे ध्येय गवसले.


समाजातील सर्व समस्यांचे मूळ अज्ञान असते आणि त्यातूनच गरिबी आणि रोगराई उद्भवते. देशाचा उद्धार आणि प्रगती करावयाची असेल तर, शिक्षणासारखा दुसरा कोणताही प्रभावी उपाय नाही. हे मला स्त्रियांच्या समस्येवर काम करतांना हळूहळू उमजत गेले म्हणून मी शिक्षणाचा प्रसार करण्याचे ध्येय हाती घेतले. माझा ' मुंबई शहर सामाजिक शिक्षण समितीशी ' संबंध आला आणि इथूनच मी साक्षरतेच्या कार्याला प्रारंभ केला. हे कार्य मी स्वतःजवळचे 100रू. गुंतवून आणि दोन शिक्षकांची मदत घेऊन घरीच सुरू केले. याला मी "घरगुती -वर्गयोजना "असे नाव दिले. माझ्या मार्गात अनेक अडचणी होत्या. मुख्य म्हणजे शिक्षण ध्येयवादाने प्रेरित नव्हते आणि शिकणा-यांना शिकण्याचा विशेष उत्साह नव्हता. परंतु या अडचणींनी मी निराश होणारी नव्हते. माझ्यावर भरपूर टीका झाली. परंतु त्या टिकेने मी कधीच विचलीत झाले नाही. मी या कार्याचा रात्रंदिवस ध्यास घेतला. गल्यानगल्या पालथ्या घातल्या. घरोघरी जाऊन मी स्त्रियांशी संपर्क साधला. वाचणे व लिहिणे किती महत्वाचे आहे. हे मी पडदानशीन स्त्रियांना समजावून सांगितले. ह्या कामात मी कधीही विश्रांती घेतली नाही किंवा आळस केला नाही. माझ्या या अविरत प्रयत्नाने हळूहळू आता 400बायका वर्गात येऊन शिकू लागल्या होत्या.


शिक्षणात बायकांना आस्था निर्माण झाल्यानंतर आणि बायकांनी वाचनात, लिहिण्यात क्षमता कमविल्यानंतर माझ्या आणि सहका-यांच्या एक गोष्ट लक्षात आली की नवसाक्षरांना शिक्षणात रस वाटला पाहीजे नाहीतर आपण केलेले कार्य वाया जाईल. नव- साक्षर आपले सर्व लिहिणे- वाचणे विसरून जातील. यावर उपाय म्हणून मी " राहबार " नावाचे एक पाक्षिक काढले. ' मुंबई शहर सामाजिक शिक्षण समितीतर्फे' जे साक्षरतेचे वर्ग चालविले जात होते, त्या वर्गात ह्या पाक्षिकाचा उपयोग केला जात होता. हे पाक्षिक उर्दू, देवनागरी आणि गुजराती अशी तीन लिपीतून प्रकाशित होत असे. हे पाक्षिक काही दिवसातच ' राष्ट्रीय एकतेचे प्रतीक' बनले. त्यामुळे साक्षरतेचे सर्व प्रयत्न आणि कार्यक्रम एकसुत्रात बांधणे अतिशय सोपे गेले. ' राहबारने' हा जो साक्षरतेचा प्रयत्न केला त्यासाठी आणि धर्माचा पाया तर्कनिष्ठेवरअसतो हे समजावून सांगण्याकरिता काही व्याख्याने आयोजीत करण्यात आली. या व्याख्यातून लोकांची दृष्टी विशाल व्हावी, स्त्रियांनी स्वतःचा विचार करावा, शिक्षणाचे मुल्य समजून घ्यावे या सारख्या अनेक विषय हाताळले गेले. त्यामुळे मुसलमानी समाजातील सनातनी वर्ग आणि मौलवी दुखावून गेले. पण मी माझ्या निश्चयाबात आग्रही होतेच आणि आता जास्त आग्रही बनले. या सनातनी वर्गाच्या मुळावर घाव घालून स्त्रियांना ज्ञानाने प्रकाशित झालेल्या समाजात नेऊन पोहोचवायचे हाच माझा दृढःनिश्चय होता.


साक्षरतेचा प्रसार करण्याकरिता मी आपल्या पुरातन संस्कृतीवर भर दिला. परंतु त्याचबरोबर मी पाश्चात्यांच्या आधुनिक उपायांचासुद्धा उपयोग केला. ह्या करिता कीर्तन, पोवाडा, संगीत, कथा सांगणे यांचा उपयोग करून घेतला. शिक्षकांनी शिक्षणाच्या नवीन पद्धती काढाव्यात आणि त्याकरिता  त्यांना शिकविण्याचे पूर्ण स्वातंत्र्य देण्यात यावे या विचाराला मी अंगिकारले आणि काही दिवसातच मला " नेहरू साक्षरता अवार्ड" ने अलंकृत करण्यात आले. या समारंभाच्या वेळी वेल्दि फिशर म्हणाल्या होत्या " कुलसुमबेन सयानी" यांचे कार्य हिंदुस्थानातच नव्हे तर सर्व जगात अजरामर ठरले आहे."


माझे कार्य आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू झाले होते. त्यामुळे मला फ्रान्समध्ये झालेल्या कामगारावर झालेल्या परिसंवादात  निमंत्रित केले होते. त्या दरम्यान मी ' डॅनिश फाॅक स्कूल्सला ' भेटी दिल्या आणि त्यात मिळविलेला अनुभव हिंदुस्थानला उपयोगी पडला.


त्यानंतर मला ' अखिल भारतीय स्त्रियांच्या परिषदेच्या' मानद सचिव म्हणून नेमल्या गेले, सोबतच नॅशनल कमेटी ऑन वुईमेन्स एज्युकेशन' वर सदस्य म्हणून नेमणूक झाली. " एकजण शिकल्यानंतर' दुस-याला शिकवावे या योजनानुसार आता या योजनेचा वटवृक्ष झाला होता. माझे अनेक ठिकाणी दौरे सुरू झाले होते. सहकारी हा वटवृक्ष खूप आनंदाने सांभाळत होते.  " बेसिक एज्युकेशन" अधिवेशन वर्ध्याला झाले होते. त्या कार्यक्रमाची सुरूवात माझ्या हस्ते झाली.  ही समाजाची शिक्षणाप्रती वाढत चाललेली आस्था माझ्या प्रयत्नांना मिळालेली एक प्रकारची दाद होती. ज्यांना आपला समाज ज्ञानाच्या प्रकाशाने भरलेला असावा असे वाटते, ते लोक पुढेही  माझ्या प्रयत्नांना दाद देत राहतील आणि अनुकरणही करतील हा आशावाद मी बाळगून होते. 





©वर्षा पतके थोटे

  15/010/2021

Pc--google



<script async src="https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-5032057122896847"
     crossorigin="anonymous"></script>




 शक्तिरूपेणः संस्थिता

=================


आठवी माळ ---इंदिरा जयसिंग


मी इंदिरा जयसिंग. माझा जन्म सिंधी कुटुंबात झाला. फाळणीनंतर हुंड्या सारख्या अनेक वाईट प्रथा सिंधमधील मंडळीनी हिंदुस्थानात आणल्या. परंतु माझ्या जीवनात ह्या प्रथा येणार नाहीत. असा दृढनिश्चय मी केलेला होता म्हणून मी लग्न न करण्याचा निर्णय घेतला. विवाहात मला एखाद्या वस्तुप्रमाणे विकणे मान्य नव्हते. मी विवाह न करण्याचा निर्णय घेतल्यामुळे माझ्यासमोर एकच पर्याय उरला होता तो म्हणजे करिअर करण्याचा, स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा. त्यादृष्टीने कायद्याच्या क्षेत्रात जाण्याचा निश्चय केला. आमच्या कुटुंबात कोणीच वकील नसल्याने माझ्या वकील बनण्याच्या निश्चयास बळकटी आली.


मी कायद्यात फेलोशिप मिळविली व लंडनमधल्या ' अॅडव्हाॅन्स लिगल स्टडीज ' ह्या संस्थेच्या संपर्कात आले. या संस्थेत काम करणारे लोक कायद्याचे काम एखाद्या मिशनप्रमाणे करीत असत. त्यामुळे त्यांचा व्यक्तिगत स्वार्थ बाजूला राहत असे. मी वकिली सुरू केली तेव्हा ब्रिटीश लिगल प्रॅक्टिस या जुन्याच प्रोसिजरनुसार आम्हाला वकीली करावी लागे. 


1975 मध्ये देशात आणिबाणी सुरू झाली आणि हिंदुस्थानातील समाज दोन भागात दुभंगला गेला. मी आणिबाणीला विरोध करण्याचे निश्चित केले आणि मुलकी आणि राजकीय अधिकार रद्द करण्याच्या वटहुकुमांना इतरांबरोबर विरोध करू लागले.  'ट्रेड युनियन' क्षेत्रात जास्त धरपकड आणि दडपशाही चालली असल्याने त्या क्षेत्रात वकिलांची संघटना असावी म्हणून आम्ही 'कामगारांचे कायदाकेंद्र' स्थापन केले. त्यामुळे जीवनाला एक नवीन वळण लागले आणि न्यायसंस्थेच्या जीवनात बरेच आमुलाग्र बदल घडून आले. आणिबाणीच्या कालखंडानंतर सुप्रीम कोर्टसुद्धा सामाजिक आणि आर्थीक न्यायाकडे विशेष लक्ष देऊ लागले होते.


यानंतर मी माझ्या आवडत्या विषयांकडे विशेष लक्ष देऊ लागले. स्त्रियांच्या समस्या मला नेहमीच त्रास देत असत. कौटुंबिक कायदा हा माझ्या विशेष अभ्यासाचा विषय होता. घटनेत तरतूद केलेला समतेचा अधिकार न्यायालयांनी गंभीरपणाने त्याचा विचार चालविला. कोर्टाचा इतिहास लिहिण्याचे कार्य एका दृष्टीने आम्ही आमच्या अंगावर घेतले. फार मोठ्या न्यायाधीशांसमोर आमच्या केसेस चालू होत्या. माझ्या स्त्री पक्षकार मेरी राॅय यांनी आपल्या वडिलांच्या संपत्तीत भावासारखा बरोबरीचा वाटा मिळावा म्हणून केस टाकली होती. केरळ राज्यामध्ये सिरीयन ख्रिश्चन लोकांमध्ये मुलींचा वारसा हक्क काढून घेण्यात आला होता. या विरूद्ध मी आणि माझ्या पक्षकार मेरी राॅय यांनी बराच संघर्ष करून कायदा बदल घडविण्यात यश मिळविले.


भोपाल गॅस दुर्घटना संदर्भात मला वारंवार दिल्लीला यावे लागे म्हणून मग मी दिल्लीलाच राहण्याचा निर्णय घेतला. माझे वकिली ध्येय मी अनेक केस जिंकून ज्यामध्ये अंडर ट्रायल्सचे अधिकार , वेठबिगारांचे अधिकार , बाल- मजुरांचे अधिकार , साध्य केले. या व्यवसायात मी अनेकदा एकटी पडले. त्यामुळेच त्वेषाने लढा दिला व व्यवसायात प्रतिष्ठेची जागा मिळविली. इतिहास माझ्या बाजूने होता. काही निवडक वकिलांची मदत घेऊन आम्ही ' लोकशाही वकिली ' ची परंपरा निर्माण केली. या प्रवासात मला अनेकदा सापत्नभावाने वागविण्यात आले. पण मी त्याकडे दुर्लक्ष केले. कारण ध्येय गाठणे आवश्यक होते. तिकडे दुर्लक्ष केले नसते, तर एकही केस मला लढविता आली नसती. या पुरूषप्रधान व्यवसायात मी कशी टिकून राहीले , तर याचं उत्तर मी न्यायालयात जे प्रश्न नेले , त्या प्रश्नात दडले आहे. पुरूष - प्रधान समाजात केवळ दोषैक दृष्टी असून चालणार नाही. कारण परिणामी जबाबदारीपासून पळून जाण्याची वृत्ती त्यामुळे फोफावेल. ही वृत्ती मी माझ्यात बळावू दिली नाही आणि संघर्षाला सामोरी गेले कायद्यावर श्रद्धा ठेवून.  समाजाने ज्यांचा त्याग केला त्यांची मी वकिली केली आणि एक दिवस बाॅम्बे हायकोर्टाने भारतातील पहिली सिनियर स्त्री अॅडव्होकेट म्हणून घोषीत केले. त्यानंतर ' रोटरी मानव सेवा अॅवार्ड ' ने मला सन्मानित करण्यात आले. हा सन्मान माझा नव्हता तर तो होता मी वकिलीत लढा दिलेल्या मानवी अधिकार, स्त्रियांचे हक्क, मेरी राॅय केस, रूपन देल बजाज केस, भोपाल वायूदुर्घटना, गीता हरिहरन केस, वंदना शिबा, फुटपाथवर झोपलेले गृहहीन लोक अशा कितीतरी जिंकलेल्या केस चा. मी माझ्या युक्तिवादाने परिस्थितीशी लढत राहीले आणि अविरत संघर्ष करीत राहीले.





©वर्षा पतके थोटे

  14/010/2021

Pc__google



<script async src="https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-5032057122896847"
     crossorigin="anonymous"></script>



 


शक्तिरूपेणः संस्थिता

==================


सातवी माळ---रूथ मनोरमा


मी रूथ मनोरमा. मद्रासच्या एका उपनगरात मी राहत होते. माझी आई स्त्रियांच्या शिक्षणाबाबत खूप आग्रही होती. तिने वडिलांच्या सनातनी विचारांना विरोध केला आणि ती शिक्षिका बनली. तिने यासाठी ख्रिश्चन धर्माचा स्वीकार केला होता. पंडिता रमाबाई तिच्या आदर्श होत्या म्हणून माझेही नाव पंडिता रमाबाईच्या मुलीचे जे नाव होते.  माझेही नाव तेच 'मनोरमा' ठेवण्यात आले.


माझे शिक्षण सायन्स मध्ये मद्रास येशील ख्रिश्चन काॅलेज मधून झाले होते.  त्यानंतर मी सामाजिक कार्याचे शिक्षण घेतले. स्वातंत्र्यानंतर हिंदुस्थान हळूहळू विकासाचे कधी न पाहिलेले मार्ग चोखाळू लागला होता. तरूणवर्ग नवीन राजकीय तत्वज्ञानाशी परिचित होत होता. स्त्रियांच्या चळवळीमध्ये विशेषतः शहरी स्त्रियांच्या चळवळीमध्ये वाढ झाली होती. परंतु, हा संघर्ष स्त्रियांकरिता नवीन नव्हता.  पण स्वातंत्र्यानंतर स्त्रियांच्या या वेगवेगळ्या चळवळीने जोर धरला आणि 1975 हे वर्ष ' आंतरराष्ट्रीय महिलावर्ष ' आणि आंतरराष्ट्रीय महिलादशक ' म्हणून जाहीर करण्यात आले होते. 

त्यामुळे स्त्रियांच्या प्रश्नाकडे जास्तीत जास्त राजकीय नेते, राजकीय कार्यकर्ते आणि विचारवंत जोडल्या गेले. याचबरोबर दलितांमध्ये मोठ्या प्रमाणात जागृती होण्याला प्रारंभ झालेला होता.


सामाजिक कार्यातील डिग्री मिळविल्यानंतर मी एक वर्षभर नोकरी केली. पण मन रमेना. त्याच दरम्यान मद्रासला अकस्मात मोठा पूर आला. सैदपेट येथील दहीदीर नावाची विशाल झोपडपट्टी पाण्यात बुडाली. मी माझ्या सामाजिक कामाची सुरूवात येथूनच केली. माझ्या समोर पहिले काम म्हणजे तिथल्या रहिवाशांकरिता झोपड्या तयार करणे आणि त्यांना शिक्षण देणे हे होते. आम्ही ती झोपडपट्टी नव्याने उभारली. त्यानंतर मी 'ग्रेल'नावाच्या आंतरराष्ट्रीय स्त्रियांच्या संघटनेत सामील झाले. माझी नेमणूक बंगलोरला झाली. या संस्थेत मी सलग पाच वर्षे स्त्रियांच्या अनेक समस्यांवर काम केले.

 

त्यानंतर मी स्वतंत्रपणे काम करावे असे मला वाटू लागले. समाजातल्या खालच्या तळातल्या लोकांची एक संघटना करून त्यांना त्यांच्या अधिकारांकरिता संघर्ष देता येईल, अशी माझी पक्की धारणा होती. त्यानुसार मी 'महिलांचा आवाज'ही संघटना स्थापन केली. या संस्थेमार्फत आम्ही शहरातील गरिबांच्या गरजा यावर कामे करू लागलो. सोबतच मी ' नॅशनल सेंटर फाॅर लेबर ' या संस्थेशीसुद्धा निगडीत होते. ही संस्था असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या हितसंबंधाचे रक्षण करीत असे.

 

अमेरिकेतील आफ्रो- अमेरिकन संबंध आणि हिंदुस्थानातील दलितांचे संबंध या विषयाचा मी विशेष अभ्यास करावा, असे सांगण्यात आले. माझ्या डोक्यात तसाही हा विषय होताच. त्यामुळे मी ह्या विषयाचा अभ्यास करायचे असे ठरविले. यामुळे मला तळागाळातील स्त्रियांचे प्रश्न आणि त्याची खोली कळणार होती. तसाही या दरम्यान दलित महिला, ख्रिश्चन दलित महिलांचा स्वातंत्र्याचा प्रश्न ऐरणीवर आलेला होता आणि माझा या दृष्टीने सखोल अभ्यास सुरू झाला होता. हिंदुस्थानात दलित समाजातील स्त्रियांचा दर्जा विवादास्पद होता. या महिलांना अनेक प्रकारचे अन्याय सहन करावे लागत होते. या सा-यांचा उद्धार करावयाचा म्हणजे लोकातून निर्माण झालेल्या संघटनांची आवश्यकता होती. मी बंगलोर मध्ये " दलित स्त्रियांविरूद्ध जो हिंसाचार होतो त्याचे सार्वजनिक प्रगटीकरण " ही संस्था स्थापन केली. याचा परिणाम म्हणून दक्षिण हिंदुस्थानातल्या तळागाळातील स्त्रियांचे मोठ्यात मोठे शिष्टमंडळ दिल्लीला जाऊन पोहचले. केंद्र सरकारने स्त्रियांच्या जीवनावर परिणाम करणारे निर्णय घ्यावेत आणि त्याकरिता धोरणे ठरवावीत , ह्या आणि यासारख्या अनेक प्रश्नांची उत्तरे मिळविण्याकरिता हे शिष्टमंडळ दिल्लीला गेले होते. त्यानंतर सरकारने एक सल्लागार समिती स्थापन केली.

 

दलित प्रश्न आणि जातीजातीतला भेद हे प्रश्न मी आंतरराष्ट्रीय पातळीवर आणले तेव्हा मला अनेक संकटांना , समस्यांना , विरोधांना सामोरी जावे लागले. पण मी हार मानणारी नव्हते. मी या प्रश्नांना घेवून माझी चळवळ सुरूच ठेवली आणि एक दिवस मी हे प्रश्न  आंतरराष्ट्रीय पातळीवर आणू शकले. याचे मोठे समाधान मला लाभले. या सर्व कार्यात माझा नवरा , दोन मुली कायम सोबत होत्या. माझे घर नेहमीच तळागाळातील दरिद्री लोक , कामगार , विचारवंत , मित्र , कार्यकर्ते , विकास कार्यकर्ते, चळवळीतले लोक अशांनी नेहमीच गजबजलेले असे. मी हे कार्य डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यापासून स्फूर्ती घेऊन सुरू करू शकले यात मला खूप धन्यता वाटते. दलितांचे एकमेव पुढारी बाबासाहेब आंबेडकर यांच्या शब्दानूसार आमचा संघर्ष सत्ता किंवा संपत्ती या करिता नव्हता. तर तो मानवी व्यक्तिमत्व पुन्हा प्राप्त करण्याकरिता तो अविरत चाललेला संघर्ष होता.  


त्यानंतर माझी समाजात ओळख मानवी अधिकारांकरिता संघर्ष करणा-या नेत्या अशी होऊ लागली. मी कायमच स्त्रियांचे प्रश्न , असंघटित स्त्री- कामगारांचे प्रश्न , दलित स्त्रियांचे प्रश्न अशा अनेक प्रश्नांवर काम करीत राहीले. त्यामुळे मोठमोठे लोक अचंबित व्हायचे. पण मी माझे कार्य नेटाने करीत राहीले.


 मी " राष्ट्रीय महिला आघाडी " या संस्थेची अध्यक्ष झाले. त्याचबरोबर त्या ' महिलांचा आवाज ' या संस्थेची जनरल सेक्रेटरी झाले. 'नॅशनल फेडरेशन ऑफ दलित वुमेन 'या संस्थेची मी नॅशनल कन्व्हेनर होते.


मला कायमच वाटत आले होते की तरूण पिढीने आपल्या राष्ट्राच्या चिरंतन मूल्यांकडे जावे. स्वातंत्र्य मिळविण्याकरिता जुन्या पिढीने जो त्याग केला त्याची तरूणांनी कायम आठवण ठेवावी.





©वर्षा पतके थोटे

  13/010/2021

Pc--google



<script async src="https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-5032057122896847"
     crossorigin="anonymous"></script>




 शक्तिरूपेणः संस्थिता

===================


सहावी माळ---लतिका काट


मी लतिका काट . मी डेहराडूनची. माझ्या वडिलांचे निधन होईपर्यंत चा काळ माझा तिथेच गेला. माझे वडील तिथल्या प्रसिद्ध डून स्कुलमध्ये जीवशास्त्र विषय शिकवायचे. ते निसर्गप्रेमी होते. त्यांना निसर्ग सान्निध्यात राहायला आवडत असे. मला माझ्या वडिलांच्या सहवासात राहायला आवडत असे.  माझे जीवन म्हणजे इंग्लिश जीवनपद्धती आणि परंपरागत हिंदू जीवनपद्धती यांचे मिश्रण होते. ते परस्परात असे बेमालून मिसळले होते की त्यातून मला अभिव्यक्तीचा संघर्ष, न्यायाकरिता लढा आणि माझ्या कलेला मान्यता यांचा संघर्ष करण्याकरिता प्रेरणा मिळाली.


मी वडिल गेल्यानंतर बनारस हिंदू विद्यापीठात मुर्तिकला शिकण्यासाठी प्रवेश घेतला. एक तरूण लेक्चरर बलबीर सिंग काट शिकवायला होते.  मी माझे लाकडावरचे नक्षीकाम त्यांच्या सोबत केले. त्यांचे संगमरवरी दगडावरचे नक्षीकाम पाहण्यासारखे होते. ते कोणाची मूर्ती घडवीत आहेत हे कळत नसे. परंतु त्यांची कोरण्याची शैली प्रभाव गाजवणारी होती. मी स्वतः दगडावर वेगाने कोरीत असे आणि रक्ताळलेली बोटे आणि दुखणारे हात यांची पर्वा न करता हे काम मी करत असे. मी ज्या दिवशी पं. जवाहरलाल नेहरू यांचा पुतळा बनविला आणि त्या पुतळ्याचे अनावरण दिल्ली येथे जवाहर भवन ह्या ठिकाणी झाले. त्या दिवशी माझ्या समाधानाला सीमा नव्हती.  मी हा पुतळा बनवून सर्व मुर्तिकारांना मागे टाकले होते. या क्षेत्रात पुरूषांचे वर्चस्व होते आणि माझा लढा समतेच्या संघर्षाचा होता. मुलांसारखी मुलीनांही या क्षेत्रात संधी मिळायला हवी म्हणून मी प्रयत्न करत होते. 


पहाटे पाच वाजता थंड पाण्याने आंघोळ करून माझा दिवस सुरू होई.  रात्री झोपायला काही सीमा नसे. कधी कधी तर मी रात्र-रात्रभर काम करीत असे.  माझ्या वडिलांचा विश्वास यथार्थ होता. हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करीत होते.


पाच वर्ष बनारस मध्ये वास्तव्य केल्यानंतर माझा जीवनाबद्दलचा दृष्टिकोन पार बदलून गेला.  दररोज मृत शरीरे पाहून मरणाबद्दल मला आत्मीयता वाटू लागली व काही दिवसानंतर मला मरण मित्रासारखे वाटू लागले. भोवतालचे भौतिक जीवन मला ' क्षणिक'  वाटून तीसुद्धा वस्तूस्थिती मी मान्य केली होती. मी  'मृत्यूनंतरचा प्रवास किंवा परग्रहाकडे प्रवास ' हा विषय घेऊन ब-याच मूर्ती घडविल्या. मला आठ राष्ट्रांकडून पं. नेहरूंच्या आठ प्रतिमा तयार करण्याकरिता बोलविण्यात आले त्यावेळी भारत सरकारने मला ह्या शिबिरात जाण्याची परवानगी दिली.


पुढे माझा आणि बलबीर काट यांचा विवाह झाला. आम्ही गंगेच्या काठावर राहिलो. या मुक्कामात मी अनेक मुलींना या क्षेत्राकडे वळण्यास मार्गदर्शन केले. यातून माझा मत्सर करणारे बरेच लोक तयार झाले. त्याच  मत्सर करणा-या  हिंदू विद्यापीठातील कनिष्ठ मुर्तिकारांनी माझ्या स्टुडिओला आग लावून दिली. स्टुडिओ जळून खाक झाला. या क्षेत्रात सुरूवातीपासून पुरूषी वर्चस्व होते आणि त्यावर एका स्त्रीने मात करून शिखरापर्यंत पोहचणे म्हणजे कनिष्ठ मुर्तिकारांना आपला अपमान वाटला असावा ...असं मी स्वतःलाच बजावलं आणि त्यानंतर मी जामा मिलिया इस्लामिया विद्यापीठात आले.


माझे पती बलबीर सिंग काट हे आपल्या मेहनतीने जे फाईन आर्ट्स फॅकल्टीचे डीन होते. ते अचानक गायब झाले. एकतर त्यांचे अपहरण झाले असावे किंवा कॅम्पसवरून हुसकावून देण्यात आले असावे असा माझा संशय होता. त्यांचा ठावठिकाणा कधी लागलाच नाही. मी माझी नोकरी सांभाळून जगत होते.  माझे पती परत येतील ही आस लावून रोजचा दिवस पार पडत असे. या सर्व घटनांमुळे अस्वस्थ झाले , हतबल झाले. पण मी कधीही हरले नाही. मी दिल्लीच्या इस्लामिया विद्यापीठात प्रोफेसर म्हणून नवीन नोकरी पत्करली होतीच .  तिथेच मी माझ्या मेहनतीच्या जोरावर त्याच काॅलेजची डीन झाले होते. आता मी पुन्हा नवीन स्टुडीओ उभारणीसाठी प्रारंभ केला होता.  माझ्या पतीची परतण्याची आस मनात तेवत ठेवत. 





©वर्षा पतके थोटे

  12/010/2021


 

Pc---google


<script async src="https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-5032057122896847"
     crossorigin="anonymous"></script>




 शक्तिरूपेणः संस्थिता

=====================


पाचवी माळ---सोनल मानसिंग


मी सोनल मानसिंग. माझा जन्म गुजराती कुटुंबात झाला असला तरी माझं जन्मस्थळ मात्र मुंबई.  मी अतिशय संपन्न आणि स्वातंत्र्य चळवळीत भाग घेणा-या कुटुंबाची लेक. माझ्या आईने मृदुला साराभाई बरोबर स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतला आणि तीही कुस्तुरबा गांधी सोबत खुपदा तुरूंगात गेली. माझे आजोबाही जज असूनही गांधीजी, सरदार पटेल यांच्यासोबत वकीली सोडून स्वातंत्र्य संग्रामात उतरले होते.


माझ्या आजोबांजवळ एक अतिशय मोठी लायब्ररी होती. मी जुनी पुराणे वाचण्यात दिवसदिवस घालवित असे. आमच्याकडे अनेक बुद्धिवंत लोक येत-जात राहायचे.


माझ्यावर लहानपणापासून उदारमतवादी आणि विश्वबंधुत्वाचे संस्कार करण्यात आले होते. आमच्या घरात मुलगा, मुलगी असा भेद मी कधीही पाहिला नाही. त्या काळात म्हणजे देश पारतंत्र्यात असून सुद्धा एक मुलगी म्हणून मला सर्व स्वातंत्र्य देण्यात आले होते.  मुंबईला माझे फेलोशिप शाळेतून शिक्षण झाले.  मला शिक्षणासाठी होस्टेलवर ठेवण्यात आलं होतं. सुट्यांमध्ये घरी गेल्यावर माझ्या आईने आयोजित केलेल्या स्त्रियांच्या शिबिराला मला जावे लागे. त्या ठिकाणी घोड्यावर बसणे , बंदुकीची गोळी झाडणे , कवायत करणे इत्यादी प्रशिक्षण देण्यात येई.


पण मला मात्र रस होता तो नृत्यकलेत आणि माझं संपूर्ण कुटुंब याच गोष्टीसाठी विरोध करत होते. मी नृत्याचा क्लास लावला म्हणून माझे आजोबा तीन दिवस माझ्याशी बोलले नाही. माझी जिद्द पाहून त्यांनी मला देवदासी प्रथेबद्दल सांगितले. मला ही प्रथा माहिती नव्हती. पण मग मला प्रश्न पडला की आजोबा प्रख्यात नृत्यांगणा रूक्मिनी देवीची खूप स्तुती करतात आणि दुसरीकडे नृत्याला देवदासीची प्रथा सांगून संभ्रम निर्माण करतात. मी त्यांना जरा रागातच या प्रश्नाचे उत्तर विचारले. तेव्हा त्यांनी हसून सगळी परिस्थिती , समाजाची मानसिकता , समाजाचा नृत्याप्रती असलेला दृष्टिकोण समजावून सांगितला आणि माझ्याकडून वचन घेतलं की मी नृत्यकलेचे कधीही बाजारीकरण करणार नाही. मी पटकन वचन देऊन टाकले कारण नृत्यकला शिकण्याकरिता मी वाटेल ते करायला तयार होते.


मी जर्मन वाडःमयामध्ये ग्रॅज्युएट झाल्यावर काय करावं हा प्रश्न उभा झाला. घरचे नृत्यकलेत कॅरिअर करू द्यायला तयार नव्हते म्हणून लग्न उरकून टाकायचं ठरलं. पण मला पुढे शिकायचं आणि कॅरिअर करायचं असं मी ठामपणे सांगितलं. आजोबा एल.एल. बी. कर म्हणाले. मी मात्र नृत्यकलेतच कॅरिअर करायचा निर्णय घेतला. पण घरच्यांनी माझ्या या निर्णयाला खूप विरोध केला. पण मी बंगलोरला माझ्या गुरूकडे प्रस्थान केलं आणि तिथे मी एक वर्ष नृत्यात बुडून गेले.


आता मी बाहेरचे कार्यक्रम स्वीकारू लागले होते. मग मी बंगलोर, गुलबर्गा अशा अनेक मोठ्या शहरात कार्यक्रम केले. माझा नृत्याचा प्रवास माझा मीच करत होते. कधी सुखाचा कधी दुःखाचा. राष्ट्रपतीभवनात नॅशनल फिल्म फेस्टिवल या कार्यक्रमात मला अखिल भारतीय कलाकार म्हणून मान्यता मिळाली होती. या निवडीमुळे माझी प्रतिष्ठा वाढली होती.


या नृत्याच्या कार्यक्रमातूनच माझी ओळख इंडियन फाॅरेन सर्व्हिस मध्ये उच्चपदस्थ ललित मानसिंग यांच्याशी झाली. ओळखीचे रूपांतर लग्नात झाले. मी लग्नानंतर ललित सोबत जिनेव्हा इथे गेले. तिथेही मी अडीच वर्ष नृत्याचे कार्यक्रम केले. त्या काळात मी नृत्याच्या कार्यक्रमासाठी जगभर फिरले. नृत्याचे एवढे कार्यक्रम करणारी मी एकमेव महिला नृत्यकार होते.


पण माझा विवाह फार काळ टिकला नाही आणि मी वैवाहिक जीवन संपुष्टात आल्याने फार दुःखी झाले. हे दुःख कमी की काय म्हणून माझा अपघात झाला.  साधारण एक वर्ष मी पायाचे प्लॅस्टर सांभाळत होते. या दरम्यान माझ्या वाईट परिस्थितीचे काही लोकं भांडवल करत होते. " अरे तीचा तर पाय तुटला! आता ती काय नृत्य करणार ?" पण मी नृत्यासाठी वाटेल ते करणारी एक नृत्यांगणा होते. मी बरी झाल्यावर दिल्लीला गेले. तिथे बिरजू महाराजांचे दर्शन घेऊन पुन्हा मानसिक शक्तीने नृत्य करण्यासाठी कार्यक्रमात उभी राहीले. त्या बोलणा-या लोकांना आपोआप उत्तर दिल्या गेले. या कार्यक्रमात सितारा देवी उपस्थित होत्या. कार्यक्रम झाल्यावर त्या माझ्या गळ्यात पडून रडल्या आणि त्यांनी माझी फार तारीफ केली.


सरकारने मला शास्त्रीय नृत्य सेंटर करिता अर्धा एकर जमीन ग्रॅंट म्हणून दिली , पद्मभूषण हा सन्मान भारत सरकारने देऊन सन्मानित केले. तेव्हा मी पद्मभूषण मिळविणारी सर्वात तरूण कलाकार होते.  मला अनेक प्रतिष्ठेचे पुरस्कार आणि पारितोषिके मिळाली आणि अशाप्रकारे नृत्य माझ्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला.


स्त्री असणे किती सुंदर आहे. मी जर स्त्री नसते तर जीवनाचा इतका सखोल अनुभव मला आला असता किंवा नाही हे सांगणे कठीण आहे.





©वर्षा पतके थोटे

  11/010/2021



<script async src="https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-5032057122896847"
     crossorigin="anonymous"></script>



 

शक्तिरूपेणः संस्थिता

====================


चौथी माळ---ज्योतिर्मयी देवी


मी ज्योतिर्मयी देवी. माझा जन्म संपन्न कुटूंबात 1894 झाला होता.  माझे आजोबा जयपूर संस्थानचे पंतप्रधान होते, तर वडील कॅबिनेट मंत्री होते. माझा विवाह अगदी लहान वयात हायकोर्टात वकीली करणा-या तरूणाशी करण्यात आला. पंरतू वयाच्या केवळ 25व्या वर्षी मी विधवा झाले. पतिनिधनानंतर मी दोन मुलं आणि चार मुलींसह माहेरी जयपूरला आले. त्यावेळी माझा मोठा मुलगा दहा वर्षाचा आणि लहान मुलीचे वय केवळ तीन महिने होते.


आता मला परिस्थितीला सहजासहजी शरण जाऊन चालणार नव्हते. मी जीवनाला पुन्हा नव्याने सुरूवात करण्याचा निश्चय केला. माझे शिक्षण बंगाली आणि हिंदी भाषेतून झाले होते. पण मी कठोर मेहनतीने  इंग्रजी आणि संस्कृत भाषेचे ज्ञान मिळविले.


जीवन सरळ रेषेत चालत असतांना एखादी रेषा एकाएकी तुटली तर, त्या रेषेवर इतका खोलवर घाव बसतो की, आयुष्याचे सगळै संदर्भ नाहीसे होतात. तसंच माझ्या बाबतीत पतिनिधनानंतर झालं होत. माझ्या एकूण जीवनावरच परिणाम झाला होता. दैनंदिन जीवन बदलून गेले होते. अशात-हेच्या संकटांनी माणूस फार हवालदिल होतो.   ह्या घटनेचा स्त्री जीवना एवढा पुरूष जीवनावर तितकासा सखोल परिणाम होत नाही.


माझ्यासाठी बाहेरचे जग अस्तित्वात होते आणि अस्तित्वात नव्हतेही. माझे कुटूंबीय माझ्याशी सह्दयतेने वागत. परंतू त्यामुळे माझे दुःख , माझी बैचेनी नाहिशी होत नसे. त्या भरल्या विशाल घरात माझ्यासाठी परिपूर्ण आनंद नव्हता.


मी माझे विचार , मत , भावना, कविता हळूहळू एका नोटबुकमध्ये लिहायला लागले. त्या लिखाणात माझ्या समाजाविषयी अनेक तक्रारी असत. समाजाने आम्हा स्त्रियांवर ओढलेल्या कोरड्यांमुळे माझे स्त्री मन दुःखी होई आणि हे लिखाणातून मी लिहित असे. स्त्रियांच्या संवेदनशीलतेचा तो आरसा होता. त्याला मी दोन नावं दिले होते "नारी कथा " आणि " एका स्त्रीचे मत ".


माझे धाकटे काका यांचे एक मित्र यांनी माझे नोटबुक वाचले आणि लगेच त्यांनी ते ' भारतवर्ष ' ह्या मासिकाकडे पाठवले.  माझे लिखाण लगेच प्रकाशित झाले आणि साहित्यक्षेत्रात क्षेत्रात आणि पंडित वर्गात एकच खळबळ निर्माण झाली. विशेषतः पुरूष वर्गात त्याची फारच तीव्र प्रतिक्रिया निर्माण झाली.  पुरूषवर्गाचा निषेध करणारी धीट विधाने मी लिहिली होती. समाजात स्त्रियांची स्थिती अशीच होती. स्त्रीला व्यक्ती म्हणून काही अधिकार नव्हते.  स्त्रीला समाजात आणि कुटूंबात तिरस्करणीय वागणूक मिळत असे आणि स्त्रीला त्याचा निषेध करण्याचीही संधी दिली जात नव्हती. सामाजिक बाबींमध्ये स्त्रियांना कोणतेही अधिकार दिले जात नव्हते. इतकेच नाही तर स्त्रीला संपत्ती , मालमत्ता ह्यातसुद्धा वारसा अधिकार देण्यात येत नव्हते. ह्या गोष्टी माझ्याही बाबत घडत होत्या म्हणून ही सल मी लिखाणातून मांडत गेले.  माझ्या मनात एक सल कायम घर करून होती ती ही की, स्त्रीला मन असते , ते व्यक्त करण्याची संधी तिलाही असायला हवी , स्त्रीला अंतःकरण असते पण तेही कोणी समजून घेऊन प्रतिसाद देत नाही.


सुरूवातीला माझे लिखाण हळूहळू बाहेर येत होते. परंतु लिखाण जसे जसे नाव करू लागले तसा लिखाणाने वेग पकडला. माझ्या लिखाणाची चर्चा आता सगळीकडे होऊ लागली होती. विशेषतः तरूणवर्गामध्ये माझ्या लिखाणाची जास्त चर्चा होऊ लागली होती. बंगाली साहित्य संमेलनात सुद्धा माझ्या लिखाणाने स्थान पक्कं केलं होतं. मी सतत स्त्रियांच्या शोषनाबाबत, अधिकाराबाबत लिहित राहीले. माझ्या लेखणीलाच मी शस्त्र बनवून विधवा स्त्रियांच्या प्रश्नाला वाचा फोडली. त्यासाठी मी वाराणसीला त्यांच्या वस्तीत जाऊन राहीले. वेश्यांच्या प्रश्नाला वाचा फोडली त्यासाठी त्यांच्याही वस्तीत बराच काळ राहायला गेले. मी माझ्या शेवटच्या  दिवसांपर्यंत कार्यरत राहून लेखणीतून स्त्रियांबद्दल मांडत राहीले, लिहित राहीले. मला अजूनही जगून खूप काही लेखणीतून मांडायचं होतं कारण माझी बौद्धिक शक्ती जागृत आणि तरतरीत होती पण शरीर थकलं होतं. वयाच्या 95 व्या वर्षी मी जगाचा निरोप घेतला पण मी माझ्या साहित्यातून , माझ्या विचारांमधून आजही जीवंत आहे.






©वर्षा पतके थोटे

  10/010/2021



<script async src="https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-5032057122896847"
     crossorigin="anonymous"></script>



.


 शक्तिरूपेणः संस्थिता

=====================


तिसरी माळ --नवाब फैझुन्निसा चौधराणी


मी फैझुन्निसा चौधराणी त्रिपुरा राज्यातील कौमिला जिल्ह्यातील पश्चिमगावची लेक. माझा जन्म 1834साली चौधरी घराण्यात झाला. मी माझ्या आईचे सहावे अपत्य होते. वडील जमीनदार होते पण माझ्याच दुर्दैवाने ते माझ्या लहानपणीच वारले.  मला शिक्षणासाठी शाळेत घातलेच नाही. रीवाजाप्रमाणे लहान वयात लग्न उरकून टाकले माझे. दोन मुली झाल्यावर मला लक्षात आले की  नवरा  बाहेरख्याली आहे. त्याचे अनेक बायकांशी संबंध आहेत. हे लक्षात येताच मी नव-यासोबत घटस्फोट घेतला आणि मी वडिलांच्या घरी परत आले आणि माझ्या जीवनात शिक्षणाची सुरूवात झाली. मी सर्व जबाबदारी सांभाळून माझे शिक्षण पूर्ण केले.


मी संस्कृत शिकण्याच्या उद्देशाने घरातच एक परंपरागत संस्कृत विद्यालय काढले. हे काढतांना मला अनेक अडचणींचा सामना करावा लागला पण मी कुठेही थांबले नाही. मी लिहिलेले " रूपजलाल " हे पुस्तक बंगाली भाषेत प्रकाशित झाले आणि अतिशय गाजले.


त्यानंतर " तत्व--ओ--जातिया, संगीत हे कवितांचे पुस्तके सुद्धा काही अंतरानेच प्रकाशित झालेत. याशिवाय बंगाली भाषेतील काव्यसंग्रह " संगीत -सार" आणि "संगीत लहरी "ही दोन पुस्तके सुद्धा प्रकाशित झालीत.


मी फैझुन्निसा  माझ्या मेहनतीने आता विद्वान म्हणून गणली जाऊ लागले होते.  सोबतच माझे सामाजिक कार्य जोर धरू लागले होते. वडिलांच्या इस्टेटीकडे सुद्धा मी लक्ष देत होते. पण आता मी माझा खर्च स्वतःच करू लागले. इस्लामच्या तत्वानूसार मी अगदी साधेसुधे जीवन अंगीकारले होते. मी फावल्या वेळेत लायब्ररीत अभ्यास करत असे. मी बंगाली भाषेसोबतच अरेबिक, पार्शियन, संस्कृत भाषेत प्राविण्य मिळविले होते. स्त्रियांना जर शिक्षण दिले तर स्त्रिया नरकात जातील असं म्हणणा-या लोकांचा तो काळ होता. परंतु आधुनिक शिक्षण दिल्याशिवाय कोणत्याही राष्ट्राची प्रगती होणार नाही ह्यावर माझा ठाम विश्वास होता.  राष्ट्राची जर  प्रगती करायची असेल तर पुरूषांप्रमाणेच स्त्रियानांही शिक्षण दिले गेले पाहीजे म्हणून मी खेड्यांमध्ये अकरा प्राथमिक शाळा स्थापन केल्या.  एक निशुल्क मदरसा स्थापन केला.  त्या मदरश्याचे रूपांतर आता फैझुन्निसा सरकारी डिग्री काॅलेजमध्ये झाले आहे.


वडिलांच्या जमीनीच्या पैशातून  " लेकसाम " येथे हाॅस्पीटल बांधले.  कोमिला शहरात फक्त बायकांकरिता हाॅस्पीटल काढले. जेणेकरून त्यांचे आरोग्य उत्तम स्थितीत राहावे.  माझा जाती धर्मावर कधीच विश्वास नव्हता. हा हिंदू तो मुसलमान हा भेदाभेद मी कधीच केला नाही. मी जे हाॅस्पीटल , ज्या शैक्षणिक संस्था उभारल्या त्या देशातल्या गरीब जनतेसाठी होत्या. मग ते कोणीही असू देत.  गरीब मुली शिक्षणासाठी होस्टेलमध्ये राहत असत. त्या होस्टेलचा खर्च मी जमीनदारीतून देत असे.  माझा मानवतेवर गाढ विश्वास होता आणि स्त्री-पुरूष असा भेद न करता मी सर्वांच्याच कल्याणाकरिता अविरत झटत राहिली.  माझ्या अनेक सामाजिक कार्याची दखल घेऊन सरकारने मला " नवाब " किताब देऊन सन्मानित केले.  तेव्हापासून लोक मला 'नवाब फैझुन्निसा चौधराणी 'या नावाने ओळखू लागले होते.  माझ्या मृत्यूपुर्वी मी आपली चल अचल संपत्ती राष्ट्राला अर्पण केली आणि 1903 मध्ये मी जगाचा निरोप घेतला. पण मी आजही त्या शाळांमधून , हाॅस्पीटल मधून , पुस्तकांमधून , सामाजिक कार्यातून,  मानवतेच्या विचारांमधून जीवंत आहे.






©वर्षा पतके थोटे

  9/10/2021



<script async src="https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-5032057122896847"
     crossorigin="anonymous"></script>



.


 

शक्तिरूपेणः संस्थिता

====================



दुसरी माळ----शैला संधू


अरूणा असफअल्ली यांनी वाडःमयीन प्रकाशन करण्याकरिता जी ' राजकमल प्रकाशन संस्था ' स्थापन केली होती. ती कंपनी मोठ्या संकटात सापडली होती.  हरदेव माझा नवरा त्याने जी " निर्यात कंपनी " स्थापन केली होती. ती आता फार मोठी व्यापार करणारी संस्था बनली होती. हरदेवचे नशीब फळफळले होते. त्याने जिथे हात लावला तिथे त्याला यश मिळत गेले म्हणून त्याने मला काही माहिती होण्याच्या अगोदरच अरूणा असफअलीकडून राजकमल प्रकाशनचे बहुतांशी शेअर्स विकत घेतले.  परंतु त्याचे लवकरच राजकमल प्रकाशनचे मॅनेजिंग डायरेक्टर यांच्याशी गंभीर मतभेद उद्भवले म्हणून हरदेव ने डबघाईस आलेली प्रकाशन  संस्था माझ्या नावे विकत घेतली.  आता मला बोर्ड बैठकीला उपस्थित राहावेच लागे. मी मुळची पंजाबी होते. त्यामुळे मला हिंदी येत नव्हते. मग ब-याच समस्या निर्माण व्हायला लागल्या.


त्यामुळे मी आता हिंदीतल्या लघुकथा वाचायला सुरूवात केली. मला वाचता वाचता लक्षात येऊ लागलं की हिंदी साहित्य हे गुंतागुंतीचे आहे. पण मला " नई कथाए" या कथासंग्रहाने हिंदी सोबत मैत्री करण्यास भाग पाडले. पण एवढं पुरेसं नव्हतं.  परंतु  त्या वेळेस मला काही लेखक असे भेटले की त्यांनी माझ्या डोक्यावर आशीर्वाद स्वरूप हात ठेवला. माझे हिंदी आणि हिंदी साहित्या विषयीचे अज्ञान दूर केले.  हे ऋण मला कधीही फेडता येणार नव्हते. " पीपल्स पब्लिशिंग हाऊस " मधील माझे काही मित्र ,लेखक ,  उर्दू -हिंदी कवी यांनी माझे धैर्य कायम ठेवले. या काळात राजकमलचा जो तरूण सल्लागार होता त्याने मला साहित्यक्षेत्रात बुद्धिनिष्ठ लेखांचे वैयक्तिक राजकारण , त्यांचा परिचय , साहित्यक्षेत्रातील निरनिराळे गट याचाही परिचय करून दिला. मी माझ्या परीने प्रयत्न करत होते. पण काही लोक म्हणत होते की , राजकमल प्रकाशन संस्था लवकरच बंद पडणार आहे.  मी ह्या सर्व टिकेकडे कानाडोळा केला , माझे डोळे मी उघडे ठेवले आणि मला जे येते , जे येत नाही त्यावर लक्ष केंद्रित केले. मी सर्व कार्यंयत्रणा व्यवस्थित केली, उत्पादनाला शिस्त लावली आणि जे लेखक मला प्रतिकूल नव्हते त्यांना भेटण्याला मी प्रारंभ केला.  राजकमल आपली सर्व पुस्तके आणि ग्रंथ नवीन छापखान्यात छापीत असे. तो छापखाना आमच्याच मालकीचा होता. त्या छापखान्यात मजूर विरूद्ध मालक संघर्ष निर्माण झाला. त्यात माझ्याविरूद्ध माझ्या घरासमोर निदर्शने करण्यात आली. मला संकटांनी चोहोबाजूंनी घेरून टाकले. पण मी माझे कार्य प्रामाणिकपणे चालू ठेवले.  या दरम्यान मी अनेक मान्यवर लेखकांना भेटले. त्यांना राजकमल प्रकाशन संस्थेबाबत आश्वस्थ केले. माझ्या आता अनेक लेखक , कवी यांच्या ओळखी झाल्या. माझ्या वयाचे जे लेखक , कवी होते त्यांच्यात प्रकाशन संस्थेविषयी हळूहळू विश्वास निर्माण करत गेले. त्यांच्यातून बरेच लेखक , कवी माझे मित्र बनत गेले. या सर्व लेखक , कवी मित्रांच्या सोबतीने मी "राजकमल प्रकाशन संस्था " हळूहळू उत्तम स्थितीत आणत गेले. 


हिंदी साहित्यात माझे योगदान कोणते ? तर हिंदी साहित्याला मी " राजकमलची " श्रेष्ठ परंपरा पूर्वरत करून तिला उत्कृष्ट वाडःमय कृतीची भेट अपर्ण केली. राजकमल बरोबर घालविलेली तीस वर्षे मी कधीही विसरणे शक्य नव्हते. या प्रवासात माझे जीवन अनुभवसंपन्न झाले. पंजाबी भाषा अवगत असणारी मी एक स्त्री हिंदी साहित्याच्या प्रांतात शिरली. त्यामुळे माझे व्यक्तिमत्व उजळून निघाले आणि राजकमल प्रकाशन संस्थेत योगदान देता आले. त्या काळी मी हिंदी प्रकाशन विश्वात प्रकाशन संस्थेची उत्तमरित्या जबाबदारी सांभाळणारी पहिली महिला ठरले होते.



©वर्षा पतके थोटे

      8/10/2021



<script async src="https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-5032057122896847"
     crossorigin="anonymous"></script>



गुरुवार, ७ ऑक्टोबर, २०२१

 

शक्तिरूपेण: संस्थितI

====================


पहिली माळ--- डाॅ. राणी राजवाडे


मी सर मोरोपंत जोशी यांची कन्या डाॅ. राणी लक्ष्मीबाई राजवाडे. माझा जन्म1887 मध्ये नागपूर मध्ये झाला. माझे बाबा सर्वसामान्य समाजसुधारक आणि स्त्रियांमध्ये शिक्षणाचा प्रसार व्हावा या मताचे होते. त्या काळी आम्हा तीघी बहिनींचे शिक्षण कलकत्याच्या काॅन्वेंट स्कुलमध्ये सामाजिक विरोधाला तोंड देत पूर्ण झाले.


  मी मॅट्रिकची परीक्षा पास झाल्यावर मुंबईच्या ग्रॅट मेडिकल काॅलेजमध्ये अॅडमिशन घेतली. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी मी गोपाल कृष्ण गोखले यांच्या बरोबर इंग्लंडला गेली. पुढे अनेक डिग्री मिळवित असताना युरोपभर प्रवास झाला. पण अचानक पायाला ठेच लागावी तसा घरून निरोप आला. आईला बरं नाही म्हणून मायदेशी परत यावं लागलं.


मुंबई शहरात मी 14वर्ष डाॅक्टरकीचा व्यवसाय केला. सोबतच अखिल भारतीय महिला परिषदेचे कामकाजही पाहिले. त्यानंतर माझी अखिल भारतीय महिला परिषदेच्या कार्यवाहपदावर निवड झाली. त्यानंतर मी संस्थेची अध्यक्ष झाले. जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय योजना आयोग महिला शिक्षणविभागाची मी प्रमुख झाले. तिथे स्त्रियांसंबंधी बरेच कामे केली. त्यातून जन्माला आले ते " स्त्रियांच्या मागण्या " हे पुस्तक.


स्त्रियांच्या कल्याणाच्या अनेक चळवळीत मी भाग घेतला. मला भारताच्या हस्त-कौशल्याच्या आणि निरनिराळ्या कलाकुसरी जमविण्याचा छंद होता. त्या संदर्भात मी सखोल वाचन करीत असे. आदीवासींच्या कलात्मक वस्तू , पितळेच्या दुर्मिळ वस्तू , कांग्रा , राजस्थान ,मराठा , ओरिसा विविध शैलीतील चित्रेसुद्धा मी जमा करून भिंतीवर लावीत असे.


मी त्या काळी ग्वाल्हेर राज्याचे मेजर जनरल राजा. जी. आर. राजवाडे यांच्याशी विवाह केला. त्यावेळी मेजर जनरल विधुर होते आणि त्यांना चार मुले आणि दोन मुली होत्या.


ग्वाल्हेरला मातीची कलात्मक भांडी बनविण्याचा कारखाना होता. त्याला मी योग्य मार्गदर्शन करून उपयुक्त डिझाईन्स उपलब्ध करून द्यायचे.


मी एक कधीही न थकणारी पर्यटक होते. पर्यटन करीत असतांना माझी दृष्टी  चौफेर असे. अशी सुक्ष्म दृष्टी ठेऊन मी भारतातल्या सर्व ऐतिहासिक आणि महत्वाच्या पुरातत्वीय ठिकाणांना भेटी दिल्या. या प्रवासात देवळात ठेवल्या जाणा-या 3000 प्रकारच्या दिव्यांची आणि ज्यांच्यावर सुंदर नक्षिकाम केलेले आहे , अशा पेट्यांची साठवण केली. या प्रवासात मला देवदेवतांची , प्राण्यांची, पशुपक्ष्यांची, काही डिझाईन्स मिळालीत. ती मी विणकरांना दिली. तीच आज साड्यांच्या पदरावर, काठावर अतिशय लोकप्रिय झाली आहेत.


मला ज्या विषयाचा छंद होता. त्या विषयावरची मी असंख्य पुस्तके लिहिलीत. मी मरण्याच्या काही दिवस अगोदर माझ्या छंदातून निर्माण झालेला संग्रह नवी दिल्ली येथील नॅशनल म्युझियमला देणगी स्वरूपात दिला.  मी वयाच्या 97व्या वर्षापर्यंत कार्यरत होते. पण मृत्यू कुणाला चुकलाय ? मी अखेरीस वयाच्या 97 वर्षात अखेरचा श्वास घेतला पण मी आजही माझ्या छंदातून जीवंत आहे.


©वर्षा पतके थोटे

7 /10/2021



<script async src="https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-5032057122896847"
     crossorigin="anonymous"></script>




बुधवार, ६ ऑक्टोबर, २०२१

Gulmohar......cinema lekh

 

गुलमोहर

===============


असं म्हणतात की प्रत्येकाच्या मनात एक गुलमोहर फुललेला असतो. फक्त तो योग्य वेळ आली की दिसतो. जो पर्यंत आलबेल सुरू असते तोपर्यंत आपण आपल्या आतला गुलमोहर बघतच नाही. पण जेव्हा विपरीत परिस्थिती येते तेव्हा आपण आपल्या आत डोकावायचा प्रयत्न करतो. तेव्हा आपल्या आतला गुलमोहर आपल्याला दिसतो आणि मग तो हळूह॓ळू फुलाया लागतो. देवेन विद्यावर स्वतःच्या अपयशी आयुष्यामुळे अशीच परिस्थिती निर्माण करतो. आयुष्यात प्रेमविवाह केलेल्या नव-यावर अतोनात जीव असणारी विद्या. आयुष्याची कुठलीही लढाई अगदी सहजगत्या हसत हसत पार पाडत जाते. काॅलेजमध्ये तासिका तत्वावर काम करता करता लेखणाचे अनुवाद ही यशस्वी रित्या करते. त्यामधून मिळालेल्या पैशाचा उपयोग आपल्या देवेनला एखाद्या बिझनेस उभा करतांना होईल ही असोशीही तिला प्रत्येक छोटं मोठं काम करायला अंतरंगी एक प्रकारची उर्जा देते. पण नाटकाचं वेड असलेला देवेन कुठल्याच परिस्थितीशी तडजोड करू पाहत नाही. पर्यायाने एकटा पडत जातो. अनेक वाईट विचार , व्यसने त्याची साथीदार बनतात. मग अशावेळी मर्दानगी कुणावर तर आपल्याच प्रिय व्यक्तिवर. त्यात ती व्यक्ती समझदार , प्रेमळ , शांत असेल तर काही विचारायलाच नको !! असं म्हणतात की राग कुणावर निघतो ? तर समोरचा व्यक्ती दबणारा , घाबरणारा असेल त्याच्यावर. तसंच सगळं विद्याबाबतीत घडतं. तिच्यातली प्रेयसी , बायको , मैत्रीण , एक आई.. वेळोवेळी समजून घेते. समजावून सांगते. होईल रे निट आणि मी आपल्या संसारासाठी करतेच आहे आणि शेवटच्या श्वासापर्यंत पडेल ती कष्ट करणार आहेच. इथेच देवेन मधला अहंकारी , संशयी पुरूष आक्रमक होतो. तरिही विद्या गपगुमान सहन करत आयुष्य कठंत असते. दोघांमधले ताणतणाव अगदी सहज रित्या सुलभ करता येतात. फक्त दोघांमध्ये संवाद हवा. तो संपला की सगळंच संपतं.


" जराशी मी बोलते

   जरासा तू बोल रे ।


पण काही काही व्यक्तिमत्व अशी असतात की मोडेण पण वाकणार नाही. मग परिस्थिती कितीही हातातून जाऊ दे , आपली माणसं आपल्यापासून दुरावू दे. काहिही फरक पडत नाही अशा अहंकार कुरवाळणा-या माणसांना.  विद्या प्रत्येक वेळी खूप समंजस पणे निभावून न्यायचा प्रयत्न करते नव्हे प्रेमाने नेतेच. पण म्हणतात ना कुठलीही गोष्ट फार धरून ठेवायचा प्रयत्न केला तर ती एकतर चावते किंवा हातातून सुटून जाते आणि मग आयुष्य कुठून कुठे जातं. कितिही दिवा जपून ठेव म्हटला तरी तो विझतोच आणि सांज अंधारली होते. आपली आपली असणारी परिस्थिती , माणसं कधी आपल्याला एकटं करून जातात. कळतंही नाही. मग अशावेळी मनातला  गुलमोहर ओळखावा. मान्य आहे तप्त उन्हाळा असतो तेव्हाच गुलमोहर फुलतो. हेच गुपित ओळखावं आणि विद्या सारखी जीवनाची दिशा बदलावी. सुख्या गवतासारखं पेटलेलं मन सोबतीला घेऊन आतला गुलमोहर फुलवला विद्याने. गडचिरोली सारख्या आदिवासी भागात सुरू झालेलं कथानक विद्याला आतल्या गुलमोहरामुळे एक सशक्त लेखिका , कितीतरी मुलांची आई आणि विशेष म्हणजे एका गरीब पण होतकरू मुलाला डाॅक्टर बनवून एक संपूर्ण गुलमोहराचं झाडं बनवून जाते.  हा चित्रपट पाहतांना मला नवरा - बायको , स्त्री -पुरूष या जातीपेक्षाही एक माणूस म्हणून आपण किती स्वतःला सक्षम करावं हेच जाणवलं. परिस्थिती कितिही वाईट असो , कोणी आपल्याशी कितिही वाईट वागो आपण मात्र या तप्त उन्हातही आपल्या आतला गुलमोहर फुलवत जावा आणि एके दिवशी आपणचं गुलमोहर होऊन जावं. तर आणि तरच आपण जगल्याच समाधान मिळेल आणि हसत हसत शेवटचा श्वास घेतला जाईल. मोहन आगाशे,  सोनाली कुलकर्णी , जितेंद्र जोशी , गिरीजा ओक या कलाकारांनी अतिशय ताकदीने भुमिकेशी समरसून केलेला हा चित्रपट नक्कीच मनात घर करून जातो.




©वर्षा पतके थोटे



<script async src="https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-5032057122896847"
     crossorigin="anonymous"></script>







शनिवार, २ ऑक्टोबर, २०२१




 " या कातरवेळी "

------------


 सायंकाळची वेळ झालीय . थोड़्यावेळात दिवेलागणीही करावी लागेल . पण ते सगळं नजरेआड़ करून मी पाहत बसलेय त्या निळाई ल्यालेल्या आकाशाकड़े पाहते तर काय !  आकाशात छान हलकेसे ढग दाटून आलेत.  मंद मंद वारा सुटलाय ,पक्षी घराकड़े परताहेत , अधून मधून हलकासा फुलांचा सुगंध दरवळतोय आणि मी गॅलरीत हातात चहाचा कप  घेऊन गुणगुणण्याचा प्रयत्न करतेय . तर हे काय ओठी एकदम  "गदिमा "  चं अगदी मनातलं गाणं यावं यापेक्षा सुंदर क्षण तो  कोणता !!


या कातरवेळी पाहीजेस तू जवळी


दिवस जाय बुड़ून पार

ललित नभी मेघ चार

पुसट त्यास जरीकिनार

उसवी तीच सांज खुळी


# गदिमा


सख्या खरंच तू या कातरवेळी फार आठवतोस. दिवसाचे दोन प्रहर तुझ्या आठवणीत रममाण होऊन निघून जातात . पण या तीस-या प्रहरी  एक अनामिक हुरहुर सतत अवतीभवती रूंजी घालत राहते . तुझ्या आठवणीतही मन रमता रमत नाही आणि मग मन सारखं म्हणत राहतं .  तू एखाद्या तरी सांजेला माझ्या सोबतीने असावंसं .  तर आणि तरचं ही कातरवेळ मला कस्पटासमान भासणार नाही .


ऐकतोयस ना !!


 © वर्षा पतके थोटे


.

🌝🌝🌝