सोमवार, २२ नोव्हेंबर, २०२१

 



कैवल्य ---एक अनुभव

==========================


मी आणि माझे कुटूंब एक चेंज म्हणून कुठेतरी दोन तीन दिवस प्रवासाला जाऊयात का ? असा विचार करत होतोच तर मलाच आठवलं उमाताई जोशी यांचे कैवल्य नावाचे रिसाॅर्ट अलिबागला आहे. तिथे जाऊयात का ? त्याप्रमाणे मी उमाताईंशी फोनवर संपर्क साधला. मी आणि उमाताई ''प्रतिभा" या साहित्यिक ग्रुपशी जोडलेलो आहोत. एवढीच काय ती ओळख होती. कधी बोललो नव्हतो की भेटलो नव्हतो म्हणून ताईंना मी वाॅटस् अॅपला मॅसेज टाकला की , मला तुमच्याशी बोलायचे आहे. उमाताईंनी लगेच फोन केला आणि मी अगदी थोडीशी विचारपूस करून त्यांच्या "कैवल्य "रिसाॅर्ट मध्ये थांबायचा विचार घरच्यांशी सल्लामसलत करून पक्का केला. ताईंनी पण कसलाही व्यावहारिकपणा न दाखवता. तुम्ही फक्त कैवल्य मध्ये या हे वाक्य खूप प्रेमाने म्हटले. त्याप्रमाणे आम्ही बॅग उचलून विमानाने मुंबईला पोहचलोही. तेथून अलिबागला कसे जायचे , कुठे फिरायचे ? तीन दिवसाचा हा सगळा प्लॅन विजय जोशी सर म्हणजे उमाताईंच्या मिष्टरांनी आम्हाला फार नीटनेटका आणि विशेष म्हणजे न विचारताही करून दिला. अगदी सुरूवाती पासून म्हणजे फोनवर बोलणे झाले तेव्हापासून मला आपसूकच आपण प्रवासाला न जाता , आपण आपल्याच फार जवळच्या नातेवाईकाकडे जातो आहोत असा फिल यायला लागला. जो नातेवाईक फार काळजी करणारा आहे आणि आपण तेवढेच निर्धास्त आहोत आणि खरंच उमाताईंशी बोलणं झाल्यापासून आम्ही तेवढेच निर्धास्त होतो. प्रत्येकवेळी व्यवस्थित मॅसेज, माहिती, फिरण्याचा प्लॅन , गुगल मॅप यायचा तो विजय जोशी सर यांच्याकडूनच. मी फक्त हो , नाही एवढचं उत्तर द्यायचे. आतून कसलीही अस्वस्थता नव्हती होती ती शांतता आणि एक विश्वास की आपण जिथे राहायला जातोय ती माणसं खूप चांगली वाटताहेत.


ठरल्याप्रमाणे आम्ही मुंबईला पोहचलो. तेथून क्रुझने अलिबागला समुद्री सफर करत निघालो. बरं नुसतंच क्रुझने यायचं असं न सांगता विजय जोशी सर यांनी ..हे पण आवर्जून सांगितल की कोणत्या क्रुझने समुद्री सफर एन्जाय करत येवू शकता. कोणते क्रुझ किती वाजता आहे. अगदी इंत्भुत माहिती त्यांनी फोनवर वारंवार दिली. आम्ही चौघेही म्हणजे आम्ही दोघं आणि दोन मुली मांडव्याला उतरलो तर तिथे आमच्यासाठी आधीच टॅक्सी येऊन उभी होती. जी विजय आणि उमाताई जोशी यांनी पाठवली होती. आम्ही खूप आनंदाने " कैवल्य " फाॅर्म मध्ये पोहचलो. तिथे दोघांनीही आमचं स्वागत खूप आत्मियतेने आणि प्रेमाने फुलं देऊन केलं आणि सोबत ओळखही. बरं आम्ही कधीच एकमेकांना पाहिलं नव्हतं तरी अगदी ज्या माळ्यावर ते राहतात त्याच माळ्यावरची त्यांच्या रूमच्या बाजूची रूम आम्हाला राहायला दिली. आम्ही फ्रेश होऊन जेवायला खाली गेलो तर तिथे समोरच गणपती बाप्पा प्रसन्नपणे हसत होते. मग तर आमचा चौघांचाही विश्वास आणखी पक्का झाला की आम्ही राहण्या - खाण्यासाठी योग्य जागा निवडली आणि ते लगेच खरंही ठरलं. कारण जेवणाची ताट समोर आली आणि ज्या प्रेमाने ते अन्न बनवलं असेल तो स्वभावातला गोडवा त्या अन्नातही उतरला होता आणि उमाताई , विजय सर दोघंही सोबतीला जेवायला बसले आणि आग्रहाने जेवायला वाढत होते. पहिल्याच दिवशी दोघांनीही आमची मनं जिंकली. म्हणतात ना आपलं बनण्यासाठी फक्त आणि फक्त एक क्षण पुरेसा असतो आणि तोच क्षण आम्ही अनुभवला. उमाताई आणि विजय सर यांनी त्यांच्या हौसेखातर " कैवल्य" ला उभारलंय. पण त्याला कुठेही व्यावसायिक टच नाही. आहे तो पारिवारीक टच आणि आपलेपणा तरिही राहण्याची उत्तम व्यवस्था आणि अप्रतिम असे शाकाहारी -मासांहारी कोकणी पद्धतीचे अप्रतिम जेवण. नुसते जेवणंच नाही बरं का !!आग्रहाने केलेली विचारपूस आणि आग्रहाने आपल्याला खाऊ घालणे सुद्धा. बरं इतक्यावरच न थांबता ....उमाताई सकाळ आणि संध्याकाळ जेवणात काय बनवणार हे पण आधीच सांगून ठेवतात आणि चालेल ना !! हा गोड प्रश्नही लगेच पाठोपाठ विचारतात... विशेष म्हणजे सगळं जेवण फार हायजेनिक , आॅरगॅनिक आहे. 


दोघंही पती-पत्नी अत्यंत उत्साही व्यक्तिमत्व आहेत. बरं प्रत्येक प्रवाशाला ती आपली वाटावीत एवढी सह्रद्यी आहेत. असं म्हणतात की कोणाला जिंकायच असेल तर ...त्याचा मार्ग पोटातून जातो आणि ही म्हण खरंच किती तंतोतत खरी आहे. हा अनुभव " कैवल्य " मध्ये आल्यावर येतो. इथल्या अप्रतिम जेवणासोबत आहे तो दोघांच्याही स्वभावातील गोडवा आणि हाच गोडवा आपल्याला अनुभवायला येतो तो इथल्या काम करणा-या व्यक्तींच्या बाबतीतही. ....कैवल्य च्या सुंदर परिसरात मुलांना खेळायला कॅरम , बॅटमिंटन , झोपाळा, कॅट असे वेगवेगळे गेमसुद्धा आहेत. मोठ्यांना विर॔गुळा म्हणून वाचायला पुस्तके आहेत. पण खरंतर कैवल्यमध्ये वेगवेगळ्या झाडांसमवेत आणि उमाताई विजय सर समवेत वेगळा विरंगुळा लागत नाहीच.... कैवल्य ने आणि तिथल्या माणसांनी उमाताई , विजय सर आणि बाकी काम करणा-या व्यक्तींनी आमच्या मनात घर केले ते कायमचे. माझ्या मुलींना इन फॅक्ट आम्हा चौघानांही घरी जाऊन आल्याचा फील आला. हे मात्र नक्की... असे हे कैवल्य फार्म नागाव रोडवर रोडटच आहे. अलिबागला जाल तर कैवल्यला जरूर जा आणि मग बघा माझा अनुभव तुमचाही होऊन जाईल....हाच अनुभव इथे अनेक लोकांसोबत मोठमोठ्या सेलिब्रिटींनी पण घेतला आहे...ते सुद्धा म्हणतात 'कैवल्य' म्हणजे " एक नितांत शांतीपूर्ण सुंदर अनुभव" आहे............




#वर्षा पतके थोटे

  नागपूर











गुरुवार, ११ नोव्हेंबर, २०२१

        


स्नेहमिलन

===========



मित्र-मैत्रीणीं भेटाव्यात म्हणून केलेला थाट आणि घातलेला घाट म्हणजे स्नेहमिलन.

आम्ही सर्व शाळकरी मित्र-मैत्रीणी बारावी नंतर 27-28 वर्षानंतर दिवाळीच्या तिस-या

दिवशी एकत्र गेट टुगेदरच्या निमित्ताने भेटलो आणि पुन्हा एकदा जुन्या आठवणींना

कलई करून श्वासात साठवून परत आलो. खरंच परत आलो का तर ,

सध्यातरी नाहीच हेच उत्तर.


" गुरू एक जगी त्राता " आपल्या आयुष्याचा पाया आपले गुरू कळत -

नकळत पणे रचत असतात. तेव्हा खरंतर गुरू किंवा शिक्षक आपली

नैतिक जबाबदारी पार पाडीत असावेत. पण जेव्हा भिंत बांधून तयार होते

आणि त्याच भितींचा आधार वाटू लागतो. तेव्हा आमचे सर म्हणतात आयुष्यात

मी सर्वात सुखी मनुष्य आहे. कारण माझे विद्यार्थी सर्व दुर पसरले आहेत.

एक हाक मारावी तर हजर. कोरोणा सारख्या भयंकर आजारातून आमच्याच

डाॅक्टर मित्राने जेव्हा सर , मॅडम ला सुखरूप बाहेर काढले. तेव्हा भरभरून

आशीर्वादाचे शब्द आपुसुकच बाहेर पडले आणिआपण रचलेला पाया मजबुत घातला

गेला याची शाश्वती झाली. आमचे प्रिय  सर जेव्हा आमचे सर्वांचे नाव गुंफून

आमच्यावर कविता करून वाचत होते. तेव्हा तो क्षण जगातला सर्वात सुंदर क्षण होता.

आपलं प्रकाशित झालेलं पुस्तक जेव्हा आपण आपल्या गुरूला , शिक्षकाला देतो

तेव्हा तो क्षण सोहळ्यात बदलला गेला. शिक्षकाप्रती , गुरूप्रती एक कृतज्ञ भाव मनात आम्ही अजूनही जपून आहोत. राहणार आहोत.

असं म्हणतात की , आई-वडील , आणि गुरूच्या ऋणातून कधी उतराई होऊ

शकत नाही किंवा होऊही नये.

कारण उतराई होणं म्हणजे स्वतःला सर्वश्रेष्ठ

समजायला लागणे अर्थातच परिपूर्णता आली असा त्याचा अर्थ होतो आणि तेथूनच

आपला अहं सुरू होतो आणि अधोगती सुरू होते. पण आम्ही गेट टुगेदरच्या या सोहळ्यात

आमच्या सर्व शिक्षकांचा सत्कार सोहळा अत्यंत कृतज्ञतेने आयोजीत केला आणि या कार्यक्रमाचे

मी सुत्रसंचालन करताना माझं मन कृत्यकृत्य झालं. जेव्हा सर्व शिक्षक वृंद म्हणाले

असं गेट टुगेदर लाखात एकदाच होत असावं. सर्व कसं अगदी नियोजन बद्ध.

खरंतर आम्ही सर्व खूप दुर दुर आहोत. कुणी पुणे , नागपूर , मुंबई , चेन्नई , गोवा , नासिक, 

सिडनी, अमेरिका अशा वेगवेगळ्या शहरात असणारे आम्ही कधी

एकत्र आलो असतो आणि कधी कार्यक्रम घडवून आणला असता ?

पण आमचा एक मित्र जो दर्यापूरलाच राहतो.

त्याने सर्व जबाबदारी उचलली आणि प्रत्येकाला एक एक भुमिका वठवायला लावली.

एक दिवस अख्खं रिसाॅर्ट  शिक्षक आणि विद्यार्थी मिळून प्रबोधनमय झालं होतं. 

दुपारच्याच्या सत्रात आम्ही आमच्या शाळेत गेलो. सोबतीला आमचे शिक्षक होते.

तिथे आम्ही आमच्या वर्गात बसलो आणि जुन्या आठवणी भरभर आजूबाजूला रेंगाळू लागल्या. 

आमची बॅच सर्वात बदमाश बॅच होती आणि तेवढीच हुशार पण होती. ब-याच चांगल्या वाईट

आठवणी चहा  बिस्कीटा सोबत सिपसिप करत आत आत उतरत गेल्या आणि

आम्ही मनाने आनंदी होत गेलो. शाळेची प्रार्थना म्हणताना सगळ्या आठवणी

शिस्तीत उभ्या होत्या. प्रार्थना झाल्यावर आम्ही त्यांना मनाच्या दप्तरात अलगदपणे ठेवून

अगदी एकही कोपरा न दुमडता मस्ती करायला रिसाॅर्ट मध्ये आलो. तिथे आल्यावर

एक एक मित्र - मैत्रीणीच्या मस्तीपूर्ण कलेचा आस्वाद घेताना आपण नेमकं

कोण आहोत हे विसरत गेलो.  सोबतीला संत्रा गोळ्या , पोंगा पंडीत यांच्या सोबतीला

हास्याचा खडखडाट आणि आठवणींचा धबधबा अखंडपणे सुरू होता. एकही पाय निघायला तयार होईना.

पण रात्रीच्या अंधाराने भौतिकतेचे भान दिले आणि आम्ही पुन्हा आठवणींच दफ्तर पाठीवर टाकून काही जुने-नवे ,

काही हातातून निसटलेले - सापडलेले क्षण गोळा करत आपापल्या घरी परतलो.




©वर्षा पतके थोटे



.