गुरुवार, ७ फेब्रुवारी, २०१९

ललित

रंगछटा

प्रश्न नेहमीच सोपे असतात. अवघड असतं ते उत्तर. इतरांना द्यायच्या उत्तरापेक्षा मनाला देण्याचं उत्तर जास्त अवघड!कारण सगळचं त्यातल्या मूळ रंगछटासह स्पष्ट आपल्या मनात असतं. पण तरिही

 मला माहीती आहे .तूझ्याकड़े असेलच माझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर .. माझ्या मनातील रंगछटा आणी तूझ्या मनातील रंगछटानी मिळून canvas तयार झालाय.  या canvas वरील प्रत्येक रंगावर मी भरभरून निखळ आणी निस्वार्थपणे  प्रेम करतेय .  आणी करत राहणार कारण या canvas वर  मी कूठलंही प्रतिबिंब शोधत नाहीए.

शोधूच नये अरे खरंतरं कुठंलही प्रतिबिंब ...पण हे मनाचे ड़ोळे खूप दृष्ट .....प्रश्नांशी सलगी करून पार छळतात आणी गालातल्या गालात हसतातही. जेंव्हा आपण  संभ्रमावस्थेत असतो.  मग अशावेळी खूप प्रश्नांचा गोतावळा आपल्या आजूबाजूला पसरून आपला हक्क दाखवायला लागतो. अशावेळी खूप जीव गुदमरतो.

पण मी निश्चिंत आहे  अरे कारण मला माहीत्येय उत्तर देणं कठीण असलं तरी तू ते मला देशीलच . कारण तू आहेस विश्रब्ध.

©वर्षा पतके थोटे
30-01-2019

ललित

गवाक्ष

जीवनप्रवाहात खूप काही मागे सुटतं. पूढे पूढे चालतांना जरी वाट दिसत असली तरी नियती चा मोठ्ठा धोंडा आला की प्रवाह भरकटतो. आणी जे हवंय ते मागे ,खूप मागे सुटून जातं. पण सतत प्रवाहीत असणे  हा निसर्ग नियम पाळायलाच हवा. नाहीतर थांबला तो संपला या वाक्याप्रमाणे अनपेक्षित पणे  मनातील गवाक्षाने शोधलेलं पदरात पडलेलं चांदणं वेचता आलंच नसतं. आणी त्या पदरातील चांदण्याचं तेज मिरवत जीवनाचा चेहराही उजळायचा राहून गेला असता. पण तरीही एक सल कायमच उरी राहते की हा उजळ्लेला चेहरा कुणालाही दिसत नसतो की, त्या चांदणं ल्यालेल्या चेह-याकडे सोयीस्करपणे ड़ोळेझाक केली जाते..नेमका अर्थ आपआपल्या वैचारीक कुवतीनूसार लावला जात असावा कदाचीत ..तूला जाणवलाय का ?  चांदण ल्यालेला चेहरा ....मला विश्वास आहेच.  तू नक्कीच सुखावला असणार चांदणं ल्यालेला चेहरा पाहून  कारण तू आहेसच
 विश्रब्ध

©वर्षा पतके -थोटे
31-01-2019
अंतर्मन 


शरीरात मन असतं तसं मनात अंतर्मन असतं.जसं मन दाखवता येत नाही .तर अंतर्मन कसं दाखवणार? 

अंतर्मन मुलतः निरागस असतं.प्रेम,आनंद,शांती आणी सर्वात महत्वाचे प्रचंड शक्तीने भरलेलं असतं.अंतर्मनाला जे वारंवार बजावलं जातं ते अंतर्मन स्वीकारतं. मग ते चांगलं की वाईट ,योग्य की अयोग्य ,खरं की खोटं  हे ठरविण्याची विवेकबुध्दी अंतर्मनाकड़े नसते .

जसं जमीनीत जे पेराल तेच उगवेल अगदी त्याचप्रमाणे अंतर्मनाला जे सांगाल तेच तो वापस करेल.

आपल्या सर्व अंतःप्रेरणाचा उगम अंतर्मनात असतो .काही साहित्यीक  आपल्याला स्वप्नात ,कथा,कल्पना,कविता सुचल्याच सांगतात .काही शास्त्रज्ञांनीही  एखाद्या अवघड़ प्रमेयाचं उत्तर स्वप्नात सुचल्याचं नमूद केलंय. बाह्य मन जे जे म्हणून विचार करत असेल ,समोर आलेली दृश्य टिपत असेल .अगदी ते सगळं अंतर्मन आपल्या अनेक कप्प्यात  साठवून ठेवत असतो.झोपेत असतांना त्या माहीतीच्या आधारे प्रक्रिया करीत अंतर्मन स्वप्नात येऊन अड़लेल्या प्रश्नांची उत्तर देत असतं .

अध्यात्मात संत सांगतात "मन ठेवा रे प्रसन्न ,सर्व  सिध्दीचे कारण" .....खरचं तर आहे.
बाह्य मन जर प्रसन्न असेल तर ,त्याच्याच पावलावर पाय ठेवून अंतर्मनही नेहमीच प्रसन्न राहील.

अंतर्मन संगणका सारखं असतं .त्या संगणकाचं प्रोग्राॅमिग बदलावं लागतं .कारण जुनाट,नकारात्मक संस्कारांनी ते घडलेलं किंवा  बिघड़लेलं असतं .ते बदलवून संगणकाला योग्य कमांड़ देता येते.ती कशी द्यायची तर स्वःताशीच स्वगतः करून म्हणजेच स्वतःशीच संवाद साधून.

आपण स्वःताशी कधी मोठ्याने बोलत नाही .फक्त मनोमन बोलतो.आपण विचार करतो,तेव्हा काय करतो?.....स्वःताशीच बोलतो की......
शब्दांशिवाय आपण विचार करूच शकत नाही.वेळोवेळी आपण मनाला काही बजावत असतो.,कधी मनाची समजूत काढतो.ते सर्व आपलं स्वगतःच असतं.स्वगताच्या या शब्दामध्ये अर्थाची शक्ती असते.एक प्रकारची विद्यूतलहरच असते.विचारात ऊर्जा,सामर्थ्य असतं.

स्वगतःमधून आपण मेंदूला संदेश पाठवत असतो.पण दूर्देवाने आपलं बरचसं स्वगतः हे नकारात्मकच जास्त असतं.उदाहरणार्थ.....अवघड आहे,कठीण आहे,हे जमणार नाही इत्यादी .एकप्रकारे आपण स्वतःच स्लो पाॅयझनिंग करत असतो.अशावेळी हे दृष्टचक्र थांबवायसाठी त्या समस्येकडे त्रयस्थ वृत्तीने पाहून अंतर्मनाला कमांड़ देऊन या वाईट विचारांना काढून त्या ठिकाणी प्रेरक विचार रूजवता किंवा बसवता यायला हवेत.

एखाद्या कठीण प्रसंगात बलाढ्य व्यक्ती अगदीच कमकूवत व्यक्ती समोर हार पत्करतो .का,तर त्याचं अंतर्मन फारंच कमकूवत असतं किंवा त्याच्याकडे प्रचंड नकारात्मक विचार असतात.तर मग अंतर्मनाला शक्तीशाली बनवायसाठी सतत त्याच्याशी सकारात्मक संवाद साधत राहायचं.अंतर्मन हे ह्रदया सारखंही असतं .त्याच्या आतल्या कप्प्यात अनेक कड़ू-गोड आठवणी जपलेल्या असतात.ज्या कधी कधी ड़ोळ्यावाटे अश्रूस्वरूपात बाहेर पडतात.अंतर्मनाची शक्ती प्रचंड आहे .मैलोंमैल दूर असणा-या ,कधीही न पाहीलेल्या व्यक्तीच्या प्रेमात एखादी व्यक्ती फक्त आणी फक्त विचारामूळे प्रेमात पडू शकते.याचा अर्थ काय तर अंतर्मन सतत आपल्याला काय हवंय किंवा जी कधीतरी सुप्त इच्छा मनाच्या कोप-यात दड़लेली असेल तिला पूर्ण करण्याकरिता झटत असते.अशाप्रकारे ही अंतरीची कळकळ ,आत्मीय इच्छा अंतर्मन पूर्ण करतं.

भक्तिभावाने केलेली प्रार्थना आणी आत्मीक इच्छा यामध्ये मला खूप साम्य वाटते.आपण प्रार्थना करतो तेंव्हा आणी आत्मीक इच्छा करतो तेंव्हा अंतर्मन ऐकत असतं .जशी प्रार्थना श्रद्धेने केली तर फलद्रूप होते.अगदी त्याचप्रमाणे आत्मीक इच्छा ही अंतरीची कळकळ असते.ती जर अंतर्मनाने टिपली तर नक्कीच पूर्ण होते.

अंतर्मनाच्या या शक्तीवर बरेच काही साध्य करता येण्यासोबतच आरोग्य,स्मरणशक्ती, यश,चिंता ,इत्यादी गोष्टी ही सुकर होतात.

अंतर्मनाची अमर्याद शक्ती वापरण्याचा साधा सरळ उपाय शास्त्रीय आणी मानसशास्त्रीय दृष्टीने तो म्हणजे सकारात्मकतेने स्वतःशीच संवाद साधणे आणी स्वतःलाच स्वयं सूचना देणे.आहे की नाही सोप्प ...चला तर करूया सुरूवात .


वर्षा पतके-थोटे


पोरकेपण


कधी कधी उतरत्या कठीण सांजेला मनात ओलसर धुकं दाटून येत. 

कधी वाटतं की , मनाची नाजूक कोवळी हळुवार पालवी या धुक्यात कोमेजते की काय ?  तरिही सांज होतेच . इवल्याश्या पंखांनी   दूर दूर जाणा-या  पाखरांचा निरोप अशा सायंकाळी घेतांना आत कुठेतरी खोल व्याकुळता दाटून येते. 
वृदांवनातली सांजवात काळीज  तुटत तुटत  विझतांना मन वातीसारखंच तूटत तूटत जातं.

प्रसन्न दिसणारा  प्रभाकर गरगरत लालबुंद सोनेरी भगवा होत  क्षितीजापलीकड़े एकटाच  जातांना उगाचच तो ही  शापीत वाटायला लागतो. 

झगमगती दीपमाळ  नजरेला अस्पष्ट  आणि विरळ  भासू लागते. निशब्द सळसळणा-या अंधारल्या झाड़ांकड़े पाहून त्यांचेच नव्हे तर स्वतःचेही श्वास पोरके वाटायला लागतात. 

ओसाड माळरानावरची क्षणभरासाठी जमलेली पाखरं आता उरलेली नसतात . या निष्पर्ण माळरानाचे एकटेपण अशा संध्याकाळी कसे असेल याचा विचार अगदी नाहीच करवत . 

तू का नाही येत रे फुलून बहरुन ? मग पाखरंही रेंगाळतील .. सूर्य तुझ्याआडच मावळेल .. तू असा फुललेला .. पक्षी जायचे नाहीत दूर मग .. तुझ्याच आश्रयाला राहतील.. किती छान दिसशील तिथं तू .. बहरलेला , चिमण्या पाखरांनी लगडलेला ..मी सांगते म्हणून ऐक ..माझ्यासाठी काहिही जमेल तुला .. बघ ! 

नाहितरी मी "विश्रब्ध " उगाच म्हणते का रे ! 

बघ उजळतंय इथं .. नुसत्या कल्पनेनंही ...


©वर्षा पतके -थोटे
5-01-2019