सोमवार, १८ ऑक्टोबर, २०२१


 शक्तिरूपेणः संस्थिता

=================


आठवी माळ ---इंदिरा जयसिंग


मी इंदिरा जयसिंग. माझा जन्म सिंधी कुटुंबात झाला. फाळणीनंतर हुंड्या सारख्या अनेक वाईट प्रथा सिंधमधील मंडळीनी हिंदुस्थानात आणल्या. परंतु माझ्या जीवनात ह्या प्रथा येणार नाहीत. असा दृढनिश्चय मी केलेला होता म्हणून मी लग्न न करण्याचा निर्णय घेतला. विवाहात मला एखाद्या वस्तुप्रमाणे विकणे मान्य नव्हते. मी विवाह न करण्याचा निर्णय घेतल्यामुळे माझ्यासमोर एकच पर्याय उरला होता तो म्हणजे करिअर करण्याचा, स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा. त्यादृष्टीने कायद्याच्या क्षेत्रात जाण्याचा निश्चय केला. आमच्या कुटुंबात कोणीच वकील नसल्याने माझ्या वकील बनण्याच्या निश्चयास बळकटी आली.


मी कायद्यात फेलोशिप मिळविली व लंडनमधल्या ' अॅडव्हाॅन्स लिगल स्टडीज ' ह्या संस्थेच्या संपर्कात आले. या संस्थेत काम करणारे लोक कायद्याचे काम एखाद्या मिशनप्रमाणे करीत असत. त्यामुळे त्यांचा व्यक्तिगत स्वार्थ बाजूला राहत असे. मी वकिली सुरू केली तेव्हा ब्रिटीश लिगल प्रॅक्टिस या जुन्याच प्रोसिजरनुसार आम्हाला वकीली करावी लागे. 


1975 मध्ये देशात आणिबाणी सुरू झाली आणि हिंदुस्थानातील समाज दोन भागात दुभंगला गेला. मी आणिबाणीला विरोध करण्याचे निश्चित केले आणि मुलकी आणि राजकीय अधिकार रद्द करण्याच्या वटहुकुमांना इतरांबरोबर विरोध करू लागले.  'ट्रेड युनियन' क्षेत्रात जास्त धरपकड आणि दडपशाही चालली असल्याने त्या क्षेत्रात वकिलांची संघटना असावी म्हणून आम्ही 'कामगारांचे कायदाकेंद्र' स्थापन केले. त्यामुळे जीवनाला एक नवीन वळण लागले आणि न्यायसंस्थेच्या जीवनात बरेच आमुलाग्र बदल घडून आले. आणिबाणीच्या कालखंडानंतर सुप्रीम कोर्टसुद्धा सामाजिक आणि आर्थीक न्यायाकडे विशेष लक्ष देऊ लागले होते.


यानंतर मी माझ्या आवडत्या विषयांकडे विशेष लक्ष देऊ लागले. स्त्रियांच्या समस्या मला नेहमीच त्रास देत असत. कौटुंबिक कायदा हा माझ्या विशेष अभ्यासाचा विषय होता. घटनेत तरतूद केलेला समतेचा अधिकार न्यायालयांनी गंभीरपणाने त्याचा विचार चालविला. कोर्टाचा इतिहास लिहिण्याचे कार्य एका दृष्टीने आम्ही आमच्या अंगावर घेतले. फार मोठ्या न्यायाधीशांसमोर आमच्या केसेस चालू होत्या. माझ्या स्त्री पक्षकार मेरी राॅय यांनी आपल्या वडिलांच्या संपत्तीत भावासारखा बरोबरीचा वाटा मिळावा म्हणून केस टाकली होती. केरळ राज्यामध्ये सिरीयन ख्रिश्चन लोकांमध्ये मुलींचा वारसा हक्क काढून घेण्यात आला होता. या विरूद्ध मी आणि माझ्या पक्षकार मेरी राॅय यांनी बराच संघर्ष करून कायदा बदल घडविण्यात यश मिळविले.


भोपाल गॅस दुर्घटना संदर्भात मला वारंवार दिल्लीला यावे लागे म्हणून मग मी दिल्लीलाच राहण्याचा निर्णय घेतला. माझे वकिली ध्येय मी अनेक केस जिंकून ज्यामध्ये अंडर ट्रायल्सचे अधिकार , वेठबिगारांचे अधिकार , बाल- मजुरांचे अधिकार , साध्य केले. या व्यवसायात मी अनेकदा एकटी पडले. त्यामुळेच त्वेषाने लढा दिला व व्यवसायात प्रतिष्ठेची जागा मिळविली. इतिहास माझ्या बाजूने होता. काही निवडक वकिलांची मदत घेऊन आम्ही ' लोकशाही वकिली ' ची परंपरा निर्माण केली. या प्रवासात मला अनेकदा सापत्नभावाने वागविण्यात आले. पण मी त्याकडे दुर्लक्ष केले. कारण ध्येय गाठणे आवश्यक होते. तिकडे दुर्लक्ष केले नसते, तर एकही केस मला लढविता आली नसती. या पुरूषप्रधान व्यवसायात मी कशी टिकून राहीले , तर याचं उत्तर मी न्यायालयात जे प्रश्न नेले , त्या प्रश्नात दडले आहे. पुरूष - प्रधान समाजात केवळ दोषैक दृष्टी असून चालणार नाही. कारण परिणामी जबाबदारीपासून पळून जाण्याची वृत्ती त्यामुळे फोफावेल. ही वृत्ती मी माझ्यात बळावू दिली नाही आणि संघर्षाला सामोरी गेले कायद्यावर श्रद्धा ठेवून.  समाजाने ज्यांचा त्याग केला त्यांची मी वकिली केली आणि एक दिवस बाॅम्बे हायकोर्टाने भारतातील पहिली सिनियर स्त्री अॅडव्होकेट म्हणून घोषीत केले. त्यानंतर ' रोटरी मानव सेवा अॅवार्ड ' ने मला सन्मानित करण्यात आले. हा सन्मान माझा नव्हता तर तो होता मी वकिलीत लढा दिलेल्या मानवी अधिकार, स्त्रियांचे हक्क, मेरी राॅय केस, रूपन देल बजाज केस, भोपाल वायूदुर्घटना, गीता हरिहरन केस, वंदना शिबा, फुटपाथवर झोपलेले गृहहीन लोक अशा कितीतरी जिंकलेल्या केस चा. मी माझ्या युक्तिवादाने परिस्थितीशी लढत राहीले आणि अविरत संघर्ष करीत राहीले.





©वर्षा पतके थोटे

  14/010/2021

Pc__google



<script async src="https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-5032057122896847"
     crossorigin="anonymous"></script>



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा