गुलमोहर
===============
असं म्हणतात की प्रत्येकाच्या मनात एक गुलमोहर फुललेला असतो. फक्त तो योग्य वेळ आली की दिसतो. जो पर्यंत आलबेल सुरू असते तोपर्यंत आपण आपल्या आतला गुलमोहर बघतच नाही. पण जेव्हा विपरीत परिस्थिती येते तेव्हा आपण आपल्या आत डोकावायचा प्रयत्न करतो. तेव्हा आपल्या आतला गुलमोहर आपल्याला दिसतो आणि मग तो हळूह॓ळू फुलाया लागतो. देवेन विद्यावर स्वतःच्या अपयशी आयुष्यामुळे अशीच परिस्थिती निर्माण करतो. आयुष्यात प्रेमविवाह केलेल्या नव-यावर अतोनात जीव असणारी विद्या. आयुष्याची कुठलीही लढाई अगदी सहजगत्या हसत हसत पार पाडत जाते. काॅलेजमध्ये तासिका तत्वावर काम करता करता लेखणाचे अनुवाद ही यशस्वी रित्या करते. त्यामधून मिळालेल्या पैशाचा उपयोग आपल्या देवेनला एखाद्या बिझनेस उभा करतांना होईल ही असोशीही तिला प्रत्येक छोटं मोठं काम करायला अंतरंगी एक प्रकारची उर्जा देते. पण नाटकाचं वेड असलेला देवेन कुठल्याच परिस्थितीशी तडजोड करू पाहत नाही. पर्यायाने एकटा पडत जातो. अनेक वाईट विचार , व्यसने त्याची साथीदार बनतात. मग अशावेळी मर्दानगी कुणावर तर आपल्याच प्रिय व्यक्तिवर. त्यात ती व्यक्ती समझदार , प्रेमळ , शांत असेल तर काही विचारायलाच नको !! असं म्हणतात की राग कुणावर निघतो ? तर समोरचा व्यक्ती दबणारा , घाबरणारा असेल त्याच्यावर. तसंच सगळं विद्याबाबतीत घडतं. तिच्यातली प्रेयसी , बायको , मैत्रीण , एक आई.. वेळोवेळी समजून घेते. समजावून सांगते. होईल रे निट आणि मी आपल्या संसारासाठी करतेच आहे आणि शेवटच्या श्वासापर्यंत पडेल ती कष्ट करणार आहेच. इथेच देवेन मधला अहंकारी , संशयी पुरूष आक्रमक होतो. तरिही विद्या गपगुमान सहन करत आयुष्य कठंत असते. दोघांमधले ताणतणाव अगदी सहज रित्या सुलभ करता येतात. फक्त दोघांमध्ये संवाद हवा. तो संपला की सगळंच संपतं.
" जराशी मी बोलते
जरासा तू बोल रे ।
पण काही काही व्यक्तिमत्व अशी असतात की मोडेण पण वाकणार नाही. मग परिस्थिती कितीही हातातून जाऊ दे , आपली माणसं आपल्यापासून दुरावू दे. काहिही फरक पडत नाही अशा अहंकार कुरवाळणा-या माणसांना. विद्या प्रत्येक वेळी खूप समंजस पणे निभावून न्यायचा प्रयत्न करते नव्हे प्रेमाने नेतेच. पण म्हणतात ना कुठलीही गोष्ट फार धरून ठेवायचा प्रयत्न केला तर ती एकतर चावते किंवा हातातून सुटून जाते आणि मग आयुष्य कुठून कुठे जातं. कितिही दिवा जपून ठेव म्हटला तरी तो विझतोच आणि सांज अंधारली होते. आपली आपली असणारी परिस्थिती , माणसं कधी आपल्याला एकटं करून जातात. कळतंही नाही. मग अशावेळी मनातला गुलमोहर ओळखावा. मान्य आहे तप्त उन्हाळा असतो तेव्हाच गुलमोहर फुलतो. हेच गुपित ओळखावं आणि विद्या सारखी जीवनाची दिशा बदलावी. सुख्या गवतासारखं पेटलेलं मन सोबतीला घेऊन आतला गुलमोहर फुलवला विद्याने. गडचिरोली सारख्या आदिवासी भागात सुरू झालेलं कथानक विद्याला आतल्या गुलमोहरामुळे एक सशक्त लेखिका , कितीतरी मुलांची आई आणि विशेष म्हणजे एका गरीब पण होतकरू मुलाला डाॅक्टर बनवून एक संपूर्ण गुलमोहराचं झाडं बनवून जाते. हा चित्रपट पाहतांना मला नवरा - बायको , स्त्री -पुरूष या जातीपेक्षाही एक माणूस म्हणून आपण किती स्वतःला सक्षम करावं हेच जाणवलं. परिस्थिती कितिही वाईट असो , कोणी आपल्याशी कितिही वाईट वागो आपण मात्र या तप्त उन्हातही आपल्या आतला गुलमोहर फुलवत जावा आणि एके दिवशी आपणचं गुलमोहर होऊन जावं. तर आणि तरच आपण जगल्याच समाधान मिळेल आणि हसत हसत शेवटचा श्वास घेतला जाईल. मोहन आगाशे, सोनाली कुलकर्णी , जितेंद्र जोशी , गिरीजा ओक या कलाकारांनी अतिशय ताकदीने भुमिकेशी समरसून केलेला हा चित्रपट नक्कीच मनात घर करून जातो.
©वर्षा पतके थोटे
<script async src="https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-5032057122896847"
crossorigin="anonymous"></script>.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा