शक्तिरूपेणः संस्थिता
===================
सहावी माळ---लतिका काट
मी लतिका काट . मी डेहराडूनची. माझ्या वडिलांचे निधन होईपर्यंत चा काळ माझा तिथेच गेला. माझे वडील तिथल्या प्रसिद्ध डून स्कुलमध्ये जीवशास्त्र विषय शिकवायचे. ते निसर्गप्रेमी होते. त्यांना निसर्ग सान्निध्यात राहायला आवडत असे. मला माझ्या वडिलांच्या सहवासात राहायला आवडत असे. माझे जीवन म्हणजे इंग्लिश जीवनपद्धती आणि परंपरागत हिंदू जीवनपद्धती यांचे मिश्रण होते. ते परस्परात असे बेमालून मिसळले होते की त्यातून मला अभिव्यक्तीचा संघर्ष, न्यायाकरिता लढा आणि माझ्या कलेला मान्यता यांचा संघर्ष करण्याकरिता प्रेरणा मिळाली.
मी वडिल गेल्यानंतर बनारस हिंदू विद्यापीठात मुर्तिकला शिकण्यासाठी प्रवेश घेतला. एक तरूण लेक्चरर बलबीर सिंग काट शिकवायला होते. मी माझे लाकडावरचे नक्षीकाम त्यांच्या सोबत केले. त्यांचे संगमरवरी दगडावरचे नक्षीकाम पाहण्यासारखे होते. ते कोणाची मूर्ती घडवीत आहेत हे कळत नसे. परंतु त्यांची कोरण्याची शैली प्रभाव गाजवणारी होती. मी स्वतः दगडावर वेगाने कोरीत असे आणि रक्ताळलेली बोटे आणि दुखणारे हात यांची पर्वा न करता हे काम मी करत असे. मी ज्या दिवशी पं. जवाहरलाल नेहरू यांचा पुतळा बनविला आणि त्या पुतळ्याचे अनावरण दिल्ली येथे जवाहर भवन ह्या ठिकाणी झाले. त्या दिवशी माझ्या समाधानाला सीमा नव्हती. मी हा पुतळा बनवून सर्व मुर्तिकारांना मागे टाकले होते. या क्षेत्रात पुरूषांचे वर्चस्व होते आणि माझा लढा समतेच्या संघर्षाचा होता. मुलांसारखी मुलीनांही या क्षेत्रात संधी मिळायला हवी म्हणून मी प्रयत्न करत होते.
पहाटे पाच वाजता थंड पाण्याने आंघोळ करून माझा दिवस सुरू होई. रात्री झोपायला काही सीमा नसे. कधी कधी तर मी रात्र-रात्रभर काम करीत असे. माझ्या वडिलांचा विश्वास यथार्थ होता. हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करीत होते.
पाच वर्ष बनारस मध्ये वास्तव्य केल्यानंतर माझा जीवनाबद्दलचा दृष्टिकोन पार बदलून गेला. दररोज मृत शरीरे पाहून मरणाबद्दल मला आत्मीयता वाटू लागली व काही दिवसानंतर मला मरण मित्रासारखे वाटू लागले. भोवतालचे भौतिक जीवन मला ' क्षणिक' वाटून तीसुद्धा वस्तूस्थिती मी मान्य केली होती. मी 'मृत्यूनंतरचा प्रवास किंवा परग्रहाकडे प्रवास ' हा विषय घेऊन ब-याच मूर्ती घडविल्या. मला आठ राष्ट्रांकडून पं. नेहरूंच्या आठ प्रतिमा तयार करण्याकरिता बोलविण्यात आले त्यावेळी भारत सरकारने मला ह्या शिबिरात जाण्याची परवानगी दिली.
पुढे माझा आणि बलबीर काट यांचा विवाह झाला. आम्ही गंगेच्या काठावर राहिलो. या मुक्कामात मी अनेक मुलींना या क्षेत्राकडे वळण्यास मार्गदर्शन केले. यातून माझा मत्सर करणारे बरेच लोक तयार झाले. त्याच मत्सर करणा-या हिंदू विद्यापीठातील कनिष्ठ मुर्तिकारांनी माझ्या स्टुडिओला आग लावून दिली. स्टुडिओ जळून खाक झाला. या क्षेत्रात सुरूवातीपासून पुरूषी वर्चस्व होते आणि त्यावर एका स्त्रीने मात करून शिखरापर्यंत पोहचणे म्हणजे कनिष्ठ मुर्तिकारांना आपला अपमान वाटला असावा ...असं मी स्वतःलाच बजावलं आणि त्यानंतर मी जामा मिलिया इस्लामिया विद्यापीठात आले.
माझे पती बलबीर सिंग काट हे आपल्या मेहनतीने जे फाईन आर्ट्स फॅकल्टीचे डीन होते. ते अचानक गायब झाले. एकतर त्यांचे अपहरण झाले असावे किंवा कॅम्पसवरून हुसकावून देण्यात आले असावे असा माझा संशय होता. त्यांचा ठावठिकाणा कधी लागलाच नाही. मी माझी नोकरी सांभाळून जगत होते. माझे पती परत येतील ही आस लावून रोजचा दिवस पार पडत असे. या सर्व घटनांमुळे अस्वस्थ झाले , हतबल झाले. पण मी कधीही हरले नाही. मी दिल्लीच्या इस्लामिया विद्यापीठात प्रोफेसर म्हणून नवीन नोकरी पत्करली होतीच . तिथेच मी माझ्या मेहनतीच्या जोरावर त्याच काॅलेजची डीन झाले होते. आता मी पुन्हा नवीन स्टुडीओ उभारणीसाठी प्रारंभ केला होता. माझ्या पतीची परतण्याची आस मनात तेवत ठेवत.
©वर्षा पतके थोटे
12/010/2021
Pc---google
<script async src="https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-5032057122896847"
crossorigin="anonymous"></script>
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा