शक्तिरूपेणः संस्थिता
=====================
तिसरी माळ --नवाब फैझुन्निसा चौधराणी
मी फैझुन्निसा चौधराणी त्रिपुरा राज्यातील कौमिला जिल्ह्यातील पश्चिमगावची लेक. माझा जन्म 1834साली चौधरी घराण्यात झाला. मी माझ्या आईचे सहावे अपत्य होते. वडील जमीनदार होते पण माझ्याच दुर्दैवाने ते माझ्या लहानपणीच वारले. मला शिक्षणासाठी शाळेत घातलेच नाही. रीवाजाप्रमाणे लहान वयात लग्न उरकून टाकले माझे. दोन मुली झाल्यावर मला लक्षात आले की नवरा बाहेरख्याली आहे. त्याचे अनेक बायकांशी संबंध आहेत. हे लक्षात येताच मी नव-यासोबत घटस्फोट घेतला आणि मी वडिलांच्या घरी परत आले आणि माझ्या जीवनात शिक्षणाची सुरूवात झाली. मी सर्व जबाबदारी सांभाळून माझे शिक्षण पूर्ण केले.
मी संस्कृत शिकण्याच्या उद्देशाने घरातच एक परंपरागत संस्कृत विद्यालय काढले. हे काढतांना मला अनेक अडचणींचा सामना करावा लागला पण मी कुठेही थांबले नाही. मी लिहिलेले " रूपजलाल " हे पुस्तक बंगाली भाषेत प्रकाशित झाले आणि अतिशय गाजले.
त्यानंतर " तत्व--ओ--जातिया, संगीत हे कवितांचे पुस्तके सुद्धा काही अंतरानेच प्रकाशित झालेत. याशिवाय बंगाली भाषेतील काव्यसंग्रह " संगीत -सार" आणि "संगीत लहरी "ही दोन पुस्तके सुद्धा प्रकाशित झालीत.
मी फैझुन्निसा माझ्या मेहनतीने आता विद्वान म्हणून गणली जाऊ लागले होते. सोबतच माझे सामाजिक कार्य जोर धरू लागले होते. वडिलांच्या इस्टेटीकडे सुद्धा मी लक्ष देत होते. पण आता मी माझा खर्च स्वतःच करू लागले. इस्लामच्या तत्वानूसार मी अगदी साधेसुधे जीवन अंगीकारले होते. मी फावल्या वेळेत लायब्ररीत अभ्यास करत असे. मी बंगाली भाषेसोबतच अरेबिक, पार्शियन, संस्कृत भाषेत प्राविण्य मिळविले होते. स्त्रियांना जर शिक्षण दिले तर स्त्रिया नरकात जातील असं म्हणणा-या लोकांचा तो काळ होता. परंतु आधुनिक शिक्षण दिल्याशिवाय कोणत्याही राष्ट्राची प्रगती होणार नाही ह्यावर माझा ठाम विश्वास होता. राष्ट्राची जर प्रगती करायची असेल तर पुरूषांप्रमाणेच स्त्रियानांही शिक्षण दिले गेले पाहीजे म्हणून मी खेड्यांमध्ये अकरा प्राथमिक शाळा स्थापन केल्या. एक निशुल्क मदरसा स्थापन केला. त्या मदरश्याचे रूपांतर आता फैझुन्निसा सरकारी डिग्री काॅलेजमध्ये झाले आहे.
वडिलांच्या जमीनीच्या पैशातून " लेकसाम " येथे हाॅस्पीटल बांधले. कोमिला शहरात फक्त बायकांकरिता हाॅस्पीटल काढले. जेणेकरून त्यांचे आरोग्य उत्तम स्थितीत राहावे. माझा जाती धर्मावर कधीच विश्वास नव्हता. हा हिंदू तो मुसलमान हा भेदाभेद मी कधीच केला नाही. मी जे हाॅस्पीटल , ज्या शैक्षणिक संस्था उभारल्या त्या देशातल्या गरीब जनतेसाठी होत्या. मग ते कोणीही असू देत. गरीब मुली शिक्षणासाठी होस्टेलमध्ये राहत असत. त्या होस्टेलचा खर्च मी जमीनदारीतून देत असे. माझा मानवतेवर गाढ विश्वास होता आणि स्त्री-पुरूष असा भेद न करता मी सर्वांच्याच कल्याणाकरिता अविरत झटत राहिली. माझ्या अनेक सामाजिक कार्याची दखल घेऊन सरकारने मला " नवाब " किताब देऊन सन्मानित केले. तेव्हापासून लोक मला 'नवाब फैझुन्निसा चौधराणी 'या नावाने ओळखू लागले होते. माझ्या मृत्यूपुर्वी मी आपली चल अचल संपत्ती राष्ट्राला अर्पण केली आणि 1903 मध्ये मी जगाचा निरोप घेतला. पण मी आजही त्या शाळांमधून , हाॅस्पीटल मधून , पुस्तकांमधून , सामाजिक कार्यातून, मानवतेच्या विचारांमधून जीवंत आहे.
©वर्षा पतके थोटे
9/10/2021
<script async src="https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-5032057122896847"
crossorigin="anonymous"></script>.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा