सोमवार, १८ ऑक्टोबर, २०२१


 शक्तिरूपेण: संस्थिता

===================


नववी माळ----कुलसुम सयानी


मी कुलसुम सयानी. माझा जन्म 1900मध्ये मुबंई येथे झाला. माझे वडील मौलाना आझाद यांचे वैयक्तिक डाॅक्टर होते. काही काळ ते महात्मा गांधीचे सुद्धा डाॅक्टर होते. एकदा मी माझ्या वडिलांसोबत गांधीजींच्या भेटीस गेले. तिथे मला जानकीदेवी बजाज भेटल्या. तेव्हा त्या बोलता बोलता म्हणाल्या पडदानशीन स्त्रियांबरोबर काम करणे अतिशय कठीण आहे. त्यांच्या या वाक्यामुळे मला जीवनाचे ध्येय गवसले.


समाजातील सर्व समस्यांचे मूळ अज्ञान असते आणि त्यातूनच गरिबी आणि रोगराई उद्भवते. देशाचा उद्धार आणि प्रगती करावयाची असेल तर, शिक्षणासारखा दुसरा कोणताही प्रभावी उपाय नाही. हे मला स्त्रियांच्या समस्येवर काम करतांना हळूहळू उमजत गेले म्हणून मी शिक्षणाचा प्रसार करण्याचे ध्येय हाती घेतले. माझा ' मुंबई शहर सामाजिक शिक्षण समितीशी ' संबंध आला आणि इथूनच मी साक्षरतेच्या कार्याला प्रारंभ केला. हे कार्य मी स्वतःजवळचे 100रू. गुंतवून आणि दोन शिक्षकांची मदत घेऊन घरीच सुरू केले. याला मी "घरगुती -वर्गयोजना "असे नाव दिले. माझ्या मार्गात अनेक अडचणी होत्या. मुख्य म्हणजे शिक्षण ध्येयवादाने प्रेरित नव्हते आणि शिकणा-यांना शिकण्याचा विशेष उत्साह नव्हता. परंतु या अडचणींनी मी निराश होणारी नव्हते. माझ्यावर भरपूर टीका झाली. परंतु त्या टिकेने मी कधीच विचलीत झाले नाही. मी या कार्याचा रात्रंदिवस ध्यास घेतला. गल्यानगल्या पालथ्या घातल्या. घरोघरी जाऊन मी स्त्रियांशी संपर्क साधला. वाचणे व लिहिणे किती महत्वाचे आहे. हे मी पडदानशीन स्त्रियांना समजावून सांगितले. ह्या कामात मी कधीही विश्रांती घेतली नाही किंवा आळस केला नाही. माझ्या या अविरत प्रयत्नाने हळूहळू आता 400बायका वर्गात येऊन शिकू लागल्या होत्या.


शिक्षणात बायकांना आस्था निर्माण झाल्यानंतर आणि बायकांनी वाचनात, लिहिण्यात क्षमता कमविल्यानंतर माझ्या आणि सहका-यांच्या एक गोष्ट लक्षात आली की नवसाक्षरांना शिक्षणात रस वाटला पाहीजे नाहीतर आपण केलेले कार्य वाया जाईल. नव- साक्षर आपले सर्व लिहिणे- वाचणे विसरून जातील. यावर उपाय म्हणून मी " राहबार " नावाचे एक पाक्षिक काढले. ' मुंबई शहर सामाजिक शिक्षण समितीतर्फे' जे साक्षरतेचे वर्ग चालविले जात होते, त्या वर्गात ह्या पाक्षिकाचा उपयोग केला जात होता. हे पाक्षिक उर्दू, देवनागरी आणि गुजराती अशी तीन लिपीतून प्रकाशित होत असे. हे पाक्षिक काही दिवसातच ' राष्ट्रीय एकतेचे प्रतीक' बनले. त्यामुळे साक्षरतेचे सर्व प्रयत्न आणि कार्यक्रम एकसुत्रात बांधणे अतिशय सोपे गेले. ' राहबारने' हा जो साक्षरतेचा प्रयत्न केला त्यासाठी आणि धर्माचा पाया तर्कनिष्ठेवरअसतो हे समजावून सांगण्याकरिता काही व्याख्याने आयोजीत करण्यात आली. या व्याख्यातून लोकांची दृष्टी विशाल व्हावी, स्त्रियांनी स्वतःचा विचार करावा, शिक्षणाचे मुल्य समजून घ्यावे या सारख्या अनेक विषय हाताळले गेले. त्यामुळे मुसलमानी समाजातील सनातनी वर्ग आणि मौलवी दुखावून गेले. पण मी माझ्या निश्चयाबात आग्रही होतेच आणि आता जास्त आग्रही बनले. या सनातनी वर्गाच्या मुळावर घाव घालून स्त्रियांना ज्ञानाने प्रकाशित झालेल्या समाजात नेऊन पोहोचवायचे हाच माझा दृढःनिश्चय होता.


साक्षरतेचा प्रसार करण्याकरिता मी आपल्या पुरातन संस्कृतीवर भर दिला. परंतु त्याचबरोबर मी पाश्चात्यांच्या आधुनिक उपायांचासुद्धा उपयोग केला. ह्या करिता कीर्तन, पोवाडा, संगीत, कथा सांगणे यांचा उपयोग करून घेतला. शिक्षकांनी शिक्षणाच्या नवीन पद्धती काढाव्यात आणि त्याकरिता  त्यांना शिकविण्याचे पूर्ण स्वातंत्र्य देण्यात यावे या विचाराला मी अंगिकारले आणि काही दिवसातच मला " नेहरू साक्षरता अवार्ड" ने अलंकृत करण्यात आले. या समारंभाच्या वेळी वेल्दि फिशर म्हणाल्या होत्या " कुलसुमबेन सयानी" यांचे कार्य हिंदुस्थानातच नव्हे तर सर्व जगात अजरामर ठरले आहे."


माझे कार्य आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू झाले होते. त्यामुळे मला फ्रान्समध्ये झालेल्या कामगारावर झालेल्या परिसंवादात  निमंत्रित केले होते. त्या दरम्यान मी ' डॅनिश फाॅक स्कूल्सला ' भेटी दिल्या आणि त्यात मिळविलेला अनुभव हिंदुस्थानला उपयोगी पडला.


त्यानंतर मला ' अखिल भारतीय स्त्रियांच्या परिषदेच्या' मानद सचिव म्हणून नेमल्या गेले, सोबतच नॅशनल कमेटी ऑन वुईमेन्स एज्युकेशन' वर सदस्य म्हणून नेमणूक झाली. " एकजण शिकल्यानंतर' दुस-याला शिकवावे या योजनानुसार आता या योजनेचा वटवृक्ष झाला होता. माझे अनेक ठिकाणी दौरे सुरू झाले होते. सहकारी हा वटवृक्ष खूप आनंदाने सांभाळत होते.  " बेसिक एज्युकेशन" अधिवेशन वर्ध्याला झाले होते. त्या कार्यक्रमाची सुरूवात माझ्या हस्ते झाली.  ही समाजाची शिक्षणाप्रती वाढत चाललेली आस्था माझ्या प्रयत्नांना मिळालेली एक प्रकारची दाद होती. ज्यांना आपला समाज ज्ञानाच्या प्रकाशाने भरलेला असावा असे वाटते, ते लोक पुढेही  माझ्या प्रयत्नांना दाद देत राहतील आणि अनुकरणही करतील हा आशावाद मी बाळगून होते. 





©वर्षा पतके थोटे

  15/010/2021

Pc--google



<script async src="https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-5032057122896847"
     crossorigin="anonymous"></script>



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा