लोककथेतील स्त्री प्रतिमा: परंपरेपासून आजच्या पुनर्पाठापर्यंतचा स्त्री-अध्याय
============================================================
लोककथा ही मानवाच्या सांस्कृतिक इतिहासाची, सामूहिक स्मृतीची आणि मूल्यव्यवस्थेची अत्यंत प्रभावी अभिव्यक्ती आहे. ही अभिव्यक्ती विशिष्ट समाजाच्या, काळाच्या आणि वर्गाच्या चौकटीतून विकसित झालेली असली, तरी तिचा परिणाम अनेक पिढ्यांवर, विशेषतः मुलांच्या आणि स्त्रियांच्या मानसशास्त्रीय विकासावर खोलवर होतो. लोककथा ही केवळ कल्पनाशक्तीची निर्मिती नसून ती सामाजिक नियंत्रणाचं, नैतिक चौकटींचं आणि लैंगिक भूमिकांचं प्रशिक्षक साधन देखील ठरते. यातूनच लोककथांमध्ये दाखवली जाणारी स्त्री प्रतिमा केवळ कथानकापुरती मर्यादित न राहता समाजाच्या स्त्रीकडे पाहण्याच्या दृष्टिकोनावर प्रभाव टाकणारी ठरते. या प्रतिमा म्हणजे स्त्रीच्या जगण्याचे आराखडे आहेत – कधी आदर्शाचे, कधी त्यागाचे, तर कधी संपूर्ण गूढतेने भरलेले, परंतु बहुतांश वेळा त्या वास्तव स्त्रीच्या अस्तित्वाशी विसंगतच असतात.
या कथांमध्ये स्त्रीचे एक अत्यंत आदर्शीकृत रूप दिसते. ती देवी असते – संकटात वाचवणारी, शक्तीने परिपूर्ण, सर्वांवर कृपा करणारी. ती केवळ रक्षणकर्ती नसते, तर अनेक वेळा ती विध्वंसक रूपही धारण करते. पण या दोन्ही टोकांवर ती एका 'अलौकिक' चौकटीत बंदिस्त असते. ती माणूस नसते, त्यामुळे तिचे दु:ख, इच्छा, भोग, आकांक्षा, प्रश्न आणि चुकांसाठी जागा नसते. अशा देवीची स्तुती करत करत समाजातील स्त्रियांना 'सर्व सहन करण्याची, कोणतीही तक्रार न करणारी, नेहमी दुसऱ्यांचे रक्षण करणारी आणि स्वतःसाठी काही न मागणारी' बनण्याची अघोषित आज्ञा दिली जाते. या देवीत्वाची प्रतिमा एकीकडे स्त्रीचे गौरवकरण करते, पण दुसरीकडे तिला मानवी मर्यादांपासून दूर ठेवून 'अहं' गमावलेली आणि अपत्यांचा भार वाहणारी एक पवित्र मूर्ती बनवते.
या देवीरूपासोबतच लोककथांमध्ये सती सावित्री, अनुसया, दमयंती, सीता यांसारख्या स्त्रियांचे उल्लेख मोठ्या भक्तिभावाने होतात. या सर्व स्त्रिया स्वतःचा प्रत्येक निर्णय पतीच्या किंवा घराच्या भल्यासाठी घेतात. त्यांच्या निर्णयांचा केंद्रबिंदू त्यांचे स्वतःचे अस्तित्व नसते, तर ‘कुटुंब’ हा असतो. पतीव्रता धर्माच्या नावाखाली त्यांचा संपूर्ण आत्मार्पण अपेक्षित असतो. त्यांच्या कथांमध्ये स्त्रीची अढळ भूमिका म्हणजे पतीवर प्रेम करणं, त्यासाठी कोणतीही परीक्षा द्यायला तयार असणं, आणि स्वतःच्या इच्छा, शरीर, भावना, निर्णय सर्व त्याच्या हातात सोपवणं. या कथांमध्ये स्त्रीला स्वतःसाठी जगण्याचा अधिकारच नाही. ती फक्त दुसऱ्यांसाठी जगणारी असते, तिचं जीवन इतरांच्या जीवनाची पूर्तता करणारं असतं.
अशा कथांमध्ये स्त्रीच्या मौनाला, समर्पणाला, त्यागाला आणि सहनशीलतेला अतिशय मोठं महत्त्व दिलं जातं. आणि हेच मूल्य बालवयात मनात बिंबवण्याचं काम लोककथांमधून केलं जातं. लहान मुलींना ‘चांगली मुलगी’ होण्यासाठी जे गुण शिकवले जातात ते याच स्त्रिया embody करतात – शांत, आज्ञाधारक, समर्पित, आणि कधीच प्रश्न न विचारणारी. तिच्या स्वतंत्र इच्छेला 'अहंकार' मानलं जातं आणि तिच्या आत्मभानाला 'बंडखोरी'. हीच संकल्पना पुढे जाऊन स्त्रीला एक असहाय्य, आत्मनिग्रहित अस्तित्वाकडे ढकलते.
काही लोककथांमध्ये स्त्रीचा संघर्ष, तिची बुद्धिमत्ता, तिचं धैर्यही अधोरेखित होतं. ती संकटांना तोंड देते, अनेकदा पतीला वाचवते, स्वतःचे आयुष्य संकटातून बाहेर काढते. पण या संघर्षाचं केंद्र नेहमी दुसरा कोणी तरी असतो – पती, वडील, मूल, किंवा एखादं राज्य. तिची कृती, तिचं धैर्य, तिची चातुर्य सुद्धा दुसऱ्यासाठी असते. स्वतःसाठी लढणारी स्त्री क्वचितच दिसते. स्वतःच्या इच्छेनुसार निर्णय घेणारी स्त्री जरी काही कथांमध्ये दिसत असली तरी तिचा शेवट दु:खद असतो किंवा ती खलनायिका ठरते. तिचं स्वातंत्र्य एकप्रकारे तिच्या पतनाशी जोडलेलं असतं.
या कथांमध्ये स्त्री आणि तिच्या शरीरावरही एक सूक्ष्म पद्धतीने चौकटी लादल्या जातात. सुंदर स्त्री म्हणजे गोरी, नाजूक, कमनीय, गोड बोलणारी. तिचं शरीर म्हणजे सौंदर्याचा आणि पवित्रतेचा संगम. आणि या प्रतिमेला जो साजेसे वागणं देत नाही, ती स्त्री 'दुश्चरित्र', 'भटक्या', 'अविवेकी' ठरवली जाते. शरीराला समाजाने स्वतःच्या नियमांनुसार मूल्य दिलं आहे. लोककथांमध्ये काळी, स्थूल, बोलकी, मतप्रदर्शन करणारी स्त्री हास्याचा किंवा नकारात्मकतेचा विषय होते. सौंदर्याच्या सामाजिक चौकटी इथूनच निर्माण होतात, आणि त्याचा थेट परिणाम मुलींच्या आत्ममूल्यांवर होतो.
लोककथांमधील स्त्रियांना अनेकदा परीकथांमध्ये परीकडून किंवा जादूने भेट मिळते, तिचं रूप बदलतं, तिचं नशीब उजळतं, किंवा राजकुमार येऊन तिला वाचवतो. ही कल्पना देखील एक प्रकारची कल्पनारम्य गुलामी आहे. स्त्री स्वतःचं नशीब स्वतः घडवत नाही, तिचं आयुष्य कोणीतरी 'बाहेरील शक्ती' ठरवतं. राजकुमाराशी लग्न हे शेवटचं उद्दिष्ट असतं, आणि त्याचं मिळणं म्हणजे तिचं संपूर्ण जीवनसिद्धी आहे, असा संदेश या कथांमधून दिला जातो. इथे स्त्रीला स्वतःच्या केंद्रबिंदूत ठेवण्याऐवजी, तिचं पूर्ण आयुष्य इतरांच्या उपस्थितीत अर्थ प्राप्त करतं.
सावत्र आई, दुसरी पत्नी, बहिणी, सासवा या नात्यांमधील स्त्री प्रतिमा सहसा वाईट, द्वेषमूलक, आणि दुजाभाव करणाऱ्या म्हणून रेखाटल्या जातात. या प्रतिमांचा उद्देश स्त्रीला स्त्रीपासूनच अलग ठेवण्याचा असतो. स्त्रियांमध्ये एकोपा न घडवता त्यांच्यात वैरभाव निर्माण करून पुरुषसत्ताक यंत्रणेला बळकट करणं ही योजना सूक्ष्म पातळीवर राबवली जाते. यामुळे स्त्रियांमध्ये सहकार्य, सामंजस्य, सामूहिक चळवळ यांना अडथळे निर्माण होतात. स्त्री ही इतर स्त्रीची शत्रू असावी, हे चित्र अतिशय नीटपणे पोसले जाते.
ज्या काही लोककथांमध्ये स्त्रीला आपले निर्णय स्वतः घ्यायला मिळतात, जिथे ती विवाह नाकारते, राजकुमाराच्या मागे न धावताही स्वतःचे आयुष्य जगते, तिथे त्या कथा फारशा प्रसिद्ध होत नाहीत. त्या अनेकदा दुर्लक्षित राहतात. याचा अर्थ समाजाने कोणत्या कथा पुढे नेल्या, कोणत्या पात्रांना 'मॉडेल' म्हणून मांडलं, हे लक्षात घेतल्यास हे सामाजिक प्रशिक्षण किती पूर्वनियोजित आणि व्यवस्थित होते हे स्पष्ट होते.
समकालीन काळात या लोककथांचा पुनर्पाठ सुरू झाला आहे. स्त्रीवादी दृष्टिकोनातून या कथा नव्याने सांगितल्या जात आहेत. जुन्या स्त्री पात्रांना आधुनिक संदर्भ दिला जात आहे. द्रौपदीचा क्रोध, सीतेची प्रश्नमूलकता, अहिल्येचं मौन यांचा पुनर्विचार केला जात आहे. अनेक महिला लेखक, नाट्यकर्मी, चित्रकार आणि संशोधक या कथांमध्ये दडलेली स्त्री विरोधी चौकट उघड करत आहेत. या पुनर्पाठांमधून समोर येणारी स्त्री ही केवळ त्यागी किंवा पूजनीय नसून संवेदनशील, प्रश्न विचारणारी, समाजाच्या चौकटी मोडणारी आणि स्वतंत्र अस्तित्वाची जाणीव असलेली स्त्री आहे.
शाळांमध्ये शिकवल्या जाणाऱ्या गोष्टी, घरांमध्ये आजी-आजोबांकडून सांगितल्या जाणाऱ्या कथा, लहानग्यांच्या गोष्टीच्या पुस्तकांमधील कथा या सर्वांमध्ये स्त्रीची प्रतिमा अजूनही पारंपरिक भूमिकांमध्ये अडकलेली दिसते. म्हणूनच या कथांना नव्याने समजून घेणं, त्या पुनर्लिखित करणं, त्यांच्या सामाजिक परिणामांची चिकित्सा करणं आवश्यक आहे.
लोककथा म्हणजे केवळ गतकाळात हरवलेली सांस्कृतिक संपत्ती नाही; ती आजही समाजाच्या मानसिकतेवर परिणाम करणारी जिवंत रचना आहे. ती लहान मुलांच्या स्वप्नांची दिशाही ठरवते आणि मोठ्यांच्या विचारांची मांडणीही करते. स्त्रीला केवळ एक भुमिका देऊन तिचं संपूर्ण अस्तित्व त्या चौकटीत अडकवणं ही एक प्रकारची मानसिक हिंसा आहे, जी पिढ्यानपिढ्या लोककथांमधूनच पोसली गेली आहे.
आजच्या काळात हीच लोककथांची जागा स्त्रीच्या नव्या प्रतिमांसाठी उघडली पाहिजे. स्त्री ही असफल होऊ शकते, ती चुकू शकते, तिला स्वप्ने असू शकतात, आणि ती तिच्या निर्णयांबद्दल जबाबदार असू शकते – ही जाणीव नव्या कथांमधून उमटायला हवी.
लोककथांमधून स्त्रीला मनुष्य म्हणून मांडणे, तिच्या भावनांचा, भंगाच्या क्षणांचा, बंडाच्या क्षणांचा आणि वैयक्तिक जगण्याच्या आकांक्षांचा सन्मान करणे हीच आजची गरज आहे. लोककथांच्या पुनर्पाठातून जर स्त्री ही एक स्वतंत्र अस्तित्व म्हणून समोर आली, तर त्या कथा केवळ मनोरंजनाचे साधन न राहता, समाज बदलणारे प्रभावी साहित्य बनतील.
वर्षा पतके थोटे
१२ जुलै २०२५
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा