महाराष्ट्रात मराठी आवश्यक का आहे?
==================================
माणसाच्या सामाजिक अस्तित्वात भाषा ही केवळ संवादाचं माध्यम राहत नाही; ती त्याच्या ओळखीचा, संस्कृतीचा, भावनांचा आणि इतिहासाचा अविभाज्य भाग बनते. विशेषतः एखाद्या भूभागात हजारो वर्षांपासून नांदणारी आणि त्या भागाच्या लोकांशी नातं जपणारी भाषा ही त्या प्रदेशाची अस्मिता बनते. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांचे नाते हे अशाच प्रकारचं आहे. महाराष्ट्र आणि मराठी यांचं नातं केवळ भौगोलिक की ऐतिहासिक नाही, ते एक जीवनदृष्टीच आहे. म्हणूनच ‘महाराष्ट्रात मराठी आवश्यक का आहे’ हा प्रश्न समजून घ्यायचा झाल्यास, आपण इतिहास, समाज, अर्थव्यवस्था, प्रशासन, शिक्षण, आणि संस्कृती यामधून त्या उत्तराचा मागोवा घेतला पाहिजे.मराठी भाषेचा उगम शतकानुशतकांपूर्वीचा आहे. ११व्या शतकात लिहिलेल्या लिपीतील उल्लेख आणि संतांच्या वाणीतील बोली ही मराठीची पहिली पायरी होती. या भाषेने काळानुरूप परिवर्तन स्वीकारले तरी तिच्या मूळ गाभ्याशी तिनं कधीही बेइमानी केली नाही. संत ज्ञानेश्वरांनी वेदांचे ज्ञान ‘ओवी’मध्ये उतरवून सामान्य माणसाला अध्यात्म समजावून सांगितलं, तर संत तुकारामांनी निष्ठेची आणि समाजाच्या दोषांवर प्रहार करणारी अभंगवाणी निर्माण केली. संत एकनाथांनी विवेकाची शिकवण मराठीतून दिली आणि समाजात जातिभेद मिटवण्याचा प्रयत्न केला. छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी भाषेला प्रशासनाची भाषा बनवलं. राजकीय स्वराज्याबरोबरच भाषिक स्वराज्य हाही त्यांचा एक महत्त्वाचा संकल्प होता. त्यांनी मराठीचा वापर राज्यकारभारात केला, राजकीय पत्रव्यवहार, हुकूमनामे, आज्ञापत्रं या सर्व गोष्टी मराठीतून लिहिल्या गेल्या. त्यामुळे ही भाषा फक्त साहित्यापुरती किंवा भावनेपुरती मर्यादित राहिली नाही, तर शासन आणि व्यवहार यामधूनही तिची उपयुक्तता सिद्ध झाली.इतिहासापुरती ही गोष्ट मर्यादित राहिली नाही. महाराष्ट्रात आजही मराठी हीच सामान्य लोकांची संवादाची भाषा आहे. मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर अशा शहरांपासून ते कोकण, मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रातील गावांपर्यंत मराठीचाच गोडवा कानावर पडतो. मातृभाषा ही माणसाला लहानपणापासूनच समजत असते. त्यात विचार करण्याची आणि स्वतःला व्यक्त करण्याची ताकद असते. आपली भावना, दु:ख, आनंद, राग, प्रश्न – हे सगळं आपल्याला सहजपणे मराठीतून मांडता येतं. त्यामुळे मराठी ही नुसती भाषा नाही, ती एक मानसिक विश्रांती आहे. मातृभाषेत विचार करणं म्हणजे स्वतःशी प्रामाणिक संवाद साधणं. मग प्रश्न असा निर्माण होतो की, जर ही भाषा आपल्याला इतकी सहज, जवळची आणि उपयोगी वाटते, तर आपण तिचं जपणूक का करत नाही?आजच्या जागतिकीकरणाच्या युगात इंग्रजी भाषेचं वर्चस्व निर्माण झालेलं आहे. इंग्रजी माध्यमाच्या शाळा, इंग्रजीतून शिकलेल्या व्यक्तींना मिळणाऱ्या संधी, जागतिक रोजगाराचे दरवाजे – या सगळ्यामुळे पालक मराठीच्या जागी इंग्रजीचा आग्रह धरू लागले. इंग्रजी शिकणं चुकीचं नाही, परंतु त्याच्या आकर्षणाखातर आपण जर आपली मूळ भाषा विसरतो, तर ही आपलीच घातक चूक आहे. शिक्षणशास्त्र सांगतं की लहान वयात जर शिक्षण मातृभाषेतून झालं, तर मुलांच्या बौद्धिक विकासात आणि आत्मविश्वासात लक्षणीय वाढ होते. जर मूल पहिली ते चौथीपर्यंत मातृभाषेतून शिकत असेल, तर त्याचं संकल्पनावाचन आणि विचारशक्ती अधिक स्पष्ट होते. महाराष्ट्रात मराठी हीच मातृभाषा असल्यामुळे तिच्या माध्यमातून शिक्षण हे अधिक परिणामकारक ठरू शकतं. दुर्दैवाने, आज अनेक पालक मराठी माध्यमाच्या शाळांकडे पाठ फिरवत आहेत. त्यामुळे मराठी शाळा बंद होऊ लागल्या आहेत आणि त्यामुळे एक सांस्कृतिक संकट तयार झालं आहे.मराठी ही केवळ भावनिक, साहित्यिक किंवा शैक्षणिक बाब नाही. ती प्रशासनाचं आणि कायद्याचंही महत्त्वाचं अंग आहे. भारताच्या संविधानानुसार प्रत्येक राज्याला आपल्या राज्यभाषेचा वापर शासकीय व्यवहारात करण्याचा अधिकार आहे. महाराष्ट्र शासनाने मराठीला राज्यभाषेचा दर्जा दिला असून सर्व शासकीय कामकाज, फाइल noting, पत्रव्यवहार हे मराठीतून करता येण्यास कायदेशीर मान्यता आहे. तरीही प्रत्यक्षात अनेक सरकारी कार्यालयांमध्ये इंग्रजी किंवा हिंदीचे प्राबल्य वाढत आहे. यामुळे सामान्य मराठी माणसाला आपल्या अधिकारांविषयी किंवा प्रक्रियांविषयी समजायला अडचण निर्माण होते. म्हणूनच शासनाने २०२१ साली “मराठी भाषा अधिनियम” लागू केला, ज्यामध्ये सर्व शासकीय विभागांत मराठीचा वापर बंधनकारक केला गेला. ही एक अत्यंत स्वागतार्ह गोष्ट असली, तरीही केवळ कायद्याने भाषा वाचत नाही, ती समाजाच्या कृतीतून टिकते.मराठी भाषेचं एक महत्त्वाचं अंग म्हणजे तिचं समृद्ध साहित्य. कथा, कादंबऱ्या, कविता, नाटके, आत्मचरित्रे, ललित लेख, समीक्षात्मक साहित्य, वैज्ञानिक लेखन – अशा विविध प्रकारांत मराठी भाषेने आपला ठसा उमटवलेला आहे. पु. ल. देशपांडे, व. पु. काळे, शं. ना. नवरे,, शांता शेळके, ग्रेस, नारायण सुर्वे, नामदेव ढसाळ, आणि अनेक लेखकांनी मराठी साहित्यात नवा प्रकाश टाकलेला आहे. नाटक, ललित साहित्य, पत्रकारिता, बालसाहित्य, प्रवासवर्णने, राजकीय भाष्य – प्रत्येक क्षेत्रात मराठीने आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. हे साहित्य केवळ मनोरंजन नाही तर ते जीवनदृष्टी देतं. समाजाच्या प्रश्नांना भिडतं. हे साहित्य टिकावं, यासाठी वाचक टिकले पाहिजेत, आणि ते वाचक तयार करण्यासाठी मराठी वाचनसंस्कृती वृद्धिंगत झाली पाहिजे. यासाठी घरोघरी वाचनाची सवय निर्माण होणं गरजेचं आहे.व्यवसायिक जगतातही मराठीची उपयुक्तता कमी नाही. स्थानिक बाजारपेठेत ग्राहकांशी संवाद साधताना जर मराठीतून व्यवहार झाला, तर ग्राहक अधिक विश्वासाने वस्तू घेतो. जाहिरात, ब्रँडिंग, ग्राहकसेवा, बँक व्यवहार, विमा, वैद्यकीय सेवा अशा अनेक क्षेत्रांमध्ये मराठीचा वापर अधिक प्रभावी ठरतो. आज अनेक कंपन्या केवळ इंग्रजीतूनच सेवा देतात, त्यामुळे ग्रामीण भागात मर्यादा निर्माण होते. जर या कंपन्यांनी मराठीचा वापर केला, तर त्यांचं ग्राहकवर्गाशी नातं अधिक मजबूत होईल. शिवाय रोजगाराच्या संधींमध्येही स्थानिक भाषेचा वापर असल्यास, स्थानिक तरुणांना रोजगार उपलब्ध होतो. त्यामुळे मराठी भाषेचं संवर्धन हे स्थानिक अर्थव्यवस्थेला बळकटी देणारं आहे.आज माध्यमं हे जनमत घडवण्याचं महत्त्वाचं साधन बनले आहेत. वर्तमानपत्रं, दूरदर्शन, रेडिओ, आणि विशेषतः सोशल मिडियावर भाषेचं अस्तित्व अधिक दृश्यमान होतं. मराठी वर्तमानपत्रं आणि चॅनेल्स यांचं महत्त्व वाढलेलं असलं, तरी सोशल मिडियावर इंग्रजी किंवा हिंदीचा अतिरेक जाणवतो. आपल्या विचारांना मराठीतून मांडण्याची सवय जर आपणच लावली नाही, तर पुढच्या पिढ्यांना मराठीचे वाचन-लेखनही अवघड होईल. त्यामुळे आज गरज आहे की मराठी भाषेतून ब्लॉग, पोस्ट, व्हिडिओ, पॉडकास्ट, साहित्य अशा गोष्टी अधिक प्रमाणात तयार व्हाव्यात. इंटरनेटवर मराठीची उपस्थिती जितकी वाढेल, तितकी ती भाषा जिवंत राहील.मराठी ही केवळ शब्दांची रचना नाही. ती आपल्या आवाजाची ओळख आहे. आपल्या जगण्याची, विचारांची, आणि अनुभवांची अभिव्यक्ती आहे. ती शेतकऱ्याच्या अंगावरचा घाम, मोलकरीणीच्या डोळ्यातील आसवं, शिक्षकाच्या आवाजातील प्रेम, वडिलांच्या नजरेतला करडा आदर आणि आईच्या पदरातलं ममत्त्व — हे सगळं मराठीतूनच व्यक्त होतं. जर ही भाषा हरवली, तर केवळ एक बोली हरवणार नाही, तर आपली अस्मिता कोलमडणार आहे. म्हणूनच महाराष्ट्रात मराठी आवश्यक आहे, कारण ती या भूमीची आणि माणसांची आत्मा आहे.म्हणून आपल्या घरी, शाळेत, कार्यालयात, मित्रांमध्ये, समाजमाध्यमांवर, सर्वत्र मराठी वापरणं ही केवळ सवय नव्हे तर एक सामाजिक जबाबदारी आहे. आपण जर मराठीचा वापर जाणीवपूर्वक करत गेलो, तर ती भाषा नुसतीच वाचेल असं नाही, तर नवे क्षितिजे पेलेल. आज काळानुरूप भाषेचा आधुनिकतेकडे झुकणं आवश्यक आहे, पण त्या झुकण्याने मूळ गाभा सुटता कामा नये. मराठीला संगणकीय भाषा बनवणं, तिला डिजिटल प्लॅटफॉर्मवर स्थान मिळवून देणं, नवीन पिढीपर्यंत पोहोचवणं — हे सगळं आपणच करायचं आहे.मराठी भाषा म्हणजे महाराष्ट्राच्या हृदयाचा ठोका. ही भाषा असताना महाराष्ट्राला दुसरी कोणतीही ओळख लागणार नाही. यासाठी शासन, समाज आणि प्रत्येक व्यक्तीने पुढाकार घेणं आवश्यक आहे. आपल्या मातृभाषेबाबत आपल्याला अभिमान वाटावा ही गोष्ट वेगळी, पण तो अभिमान कृतीतून व्यक्त झाला पाहिजे. ‘मराठी जपा, मराठी वाचा, मराठीत बोला, मराठीत लिहा’ — ही ओरड नुसती भाषिक आग्रहाची नाही, तर सांस्कृतिक पुनरुत्थानाची साद आहे. मराठी केवळ आमच्या माणसांची भाषा नाही, ती आमच्या माणसांचं जगणं आहे. म्हणूनच महाराष्ट्रात मराठी आवश्यक आहे – आज, उद्या आणि सदैव.
©वर्षा पतके थोटे२ ० जून २ ० २ ५
<script async src="https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-5032057122896847"
crossorigin="anonymous"></script>
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा