शनिवार, १ मार्च, २०२५

गोधुली वेळ

 गोधुली वेळ 

==========

गोधुली  वेळ  म्हणजे काय तर  गोधुली वेळ म्हणजे सूर्यास्ताच्या थोडं आधी आणि सायंकाळच्या थोडं जवळपासचा असा एक अल्पकाळाचा काळ. या वेळी आकाशात एक सुंदर लालसर, केशरी आणि सोनेरी प्रकाश पसरलेला असतो. गायींना गोठ्याकडे परत आणण्याच्या वेळेस ही वेळ साधारणपणे जुळते, म्हणूनच हिला "गोधुली" असे म्हणतात. ही  गोधुली वेळ खऱ्याने कळते ती गावामध्ये .  अजूनही गावामध्ये या वेळेला गायी,  बैलं , वासरं. शेळ्या, मेंढ्या. गायकी सगळेच या वेळेला घराकडे परतत असतात. शाळकरी पोरं दफ्तर पाठीवर टाकून घराच्या ओढीने खेळत बागडत निघालेली असतात. आकाशी उडणारी पाखरं घरट्याच्या ओढीने परतीला निघालेली असतात. सूर्यही धरतीच्या कुशीत विसावण्यासाठी आतुर झालेला असतो. हळूहळू नदीकाठावर एक प्रकारचा निळा गहिवर नदीच्या डोहात विलीन होऊ लागतो. मागे उरते ते  नदीकाठावर एक मौन. ना पक्ष्यांची. ना प्राण्यांची, ना झाडांची , ना माणसांची जा ये. उरते ती फक्त एक अनामिक शांतता. गावात गायी- गुरांच्या पायाने आलेली शेतातील धूळ, माती. ही मंदिराच्या कलशावर विराजमान होते आणि मंदिरातील समई हलकेच स्मित करत मंदपणे देवाचा गाभारा उजळत राहते. देवालयातील घंटानाद गोधुली वेळेचे स्वागत घंटानादाने करत असते. भक्ती आणि भक्ताचे अंतरंग जणू एक झाले आहे असे या वेळी देवळात होत असलेल्या आरतीच्या वेळी प्रकर्षाने जाणवते. ही गोधुली वेळ  मनाला एक अनामिक हुरहूर लावणारी असते. कसली हुरहूर लागते कोण जाणे ?पण मन मात्र कातर कातर होते या वेळी. काळी माती आणखी काळी होते. आकाशात चमचमणाऱ्या चांदण्याची चढाओढ सुरु होते. आणि गायी गुरे गोठ्यात येऊन निवांत रवंथ करीत समाधिस्त झालेली असतात . घराघरातील आईची देवाजवळ दिवाबत्ती करून स्वैपाकासाठी चूल पेटवायची लगबग चाललेली असते . तिची शाळकरी पोरं भाकरीची वाट पाहत असतात. मायच्या चेहऱ्यावरचं तेज चुलीच्या धुरात आणखी वलयांकित होते. 

इवल्या इवल्या चोचीने नुकतेच जन्मा आलेले पक्षांची पिल्ले मायने चारलेला घास खाण्याचा प्रयत्न करीत असतात.  एका लहानशा मुलीला  अंगणात बाजेवर झोपताना  आकाशात एक बुढीचं खाटलं दिसतं आणि ती आनंदाने जोरात ओरडते. मग तिच्या प्रश्नांची सरबत्ती तिच्या आईबाबांसोबत सुरु होते . एकदाची झोपी गेली की आई निवांत श्वास घेते. तिची मोठी बहीण घरातील कोनाड्यातल्या देवाजवळ शंकराची' लवथवती विक्राळा' ही आरती म्हणत असते अर्थाशिवाय. पहाटे उमलेली ताजी ताजी फुले या गोधुली वेळेला झोपी गेलेली असतात .  असा भास लहान मुलांना होत असतो. गावाच्या एका कोपऱ्यातील मंदिरात वारकऱ्यांच्या चोपड्यांचा आवाज येत असतो .  जो कानांना हवाहवासा वाटतो. पण घराघरातील टीव्हीचा आवाज  चिपड्यांचा हवाहवासा आवाज  दाबून टाकतो .  त्यावेळी घराच्या मावदात बाजीवर बसलेली आजी जोरात ओरडत . ' ऐकू द्या रे कुणीतरी वारकरी भजनातील चिपड्यांचा आवाज. पण घर तिची दखल घेतच नाही म्हणून ती नाराज होते आणि आणखी चिडते . 
त्यावेळी बाहेरून आलेला घराचा लेक हसत हसत आजीला चिडवत म्हणतो 'आजी मेल्यावर पांडुरंगापाशी चिपड्यांचं भजनच ऐकायचं आहे .  पृथ्वीवरही तेच आणि स्वर्गातही तेच" आणि  जोरात हसतो आणि म्हणतो त्यापेक्षा 'टीव्ही वर लागलेला चित्रहार बघ'. आजी नातवाला रागवत नाही . तोडांचं बोडखं झालेल्या हसण्याने नातवाला मायेने न्याहाळीत राहते डोळाभर .... 

आजीला माहित असतं नातू मला खांदा देणार आहे, म्हणून आजी गोधुली वेळेला नातवाला न मागता भरभरून आशीर्वाद देत असते मनातल्या मनात. नातवाचाही आजीत जीव अडकलेला असतो . नातू आजीसाठी जेवणाचं ताट वाढून आणतो आणि आजीला म्हणतो 'आजी चल आपण गायी ढोरासारखं रवंथ करू' आजी डोक्यावरचा पदर नीट करत नातवाच्या बोलण्याला खळखळून हसते आणि या गोधुली वेळेला तिच्या मनात दाटलेली हुरहूर गायब होते. नातू हळूच विचारतो 'आजी आप्पाची आठवण येते काय' आजी हसून म्हणते 'तू असल्यावर कायले येईन मले आठवन' अन आजी हलकेच लाजते. ही गोधुली वेळ सगळ्या प्राणी पक्षांना, माणसांना, मुक्या बहिऱ्यांना, डोळस लोकांना सगळयांना आपल्या प्रेमात पाडणारी आहे . ही गोधुली वेळ मलाही फार आवडते , या ब्लॉग मध्ये जे गायी गुरांचे फोटो घेतले आहेत .  ते माझ्या गावातील आहेत .    


याच गोधुली वेळेने मला हे फोटो काढण्याची जणू कल्पना सुचवली असावी असा तो अनुभव आहे . मंदिराजवळची दीपमाळ मला संत चोखोबांची आठवण करून देते आणि मी या गोधुली वेळेला एका अलौकिक अशा स्वरनादात स्वतःला शोधत राहते .  जेव्हा या स्वर नादातून जाग येते तेव्हा लक्षात येते हा स्वरनाद आहे गायी गुरांच्या गळ्यातील घुंगरांचा आणि मी या गोधुली वेळेला मनोमन धन्यवाद देत मंदिराच्या पायऱ्या चढत दीपमाळ उजळली आहे हे बघत निवांत होते आणि माझ्या मनातील हुरहूर मंदिराच्या कलशावर विराजमान झालेल्या धुळीत मिसळून अभंगात नादमय होते .  


वर्षा पतके थोटे (शब्दाली )  

नागपूर 




<script async src="https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-5032057122896847"
     crossorigin="anonymous"></script>

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा