गुरुवार, ११ नोव्हेंबर, २०२१

        


स्नेहमिलन

===========



मित्र-मैत्रीणीं भेटाव्यात म्हणून केलेला थाट आणि घातलेला घाट म्हणजे स्नेहमिलन.

आम्ही सर्व शाळकरी मित्र-मैत्रीणी बारावी नंतर 27-28 वर्षानंतर दिवाळीच्या तिस-या

दिवशी एकत्र गेट टुगेदरच्या निमित्ताने भेटलो आणि पुन्हा एकदा जुन्या आठवणींना

कलई करून श्वासात साठवून परत आलो. खरंच परत आलो का तर ,

सध्यातरी नाहीच हेच उत्तर.


" गुरू एक जगी त्राता " आपल्या आयुष्याचा पाया आपले गुरू कळत -

नकळत पणे रचत असतात. तेव्हा खरंतर गुरू किंवा शिक्षक आपली

नैतिक जबाबदारी पार पाडीत असावेत. पण जेव्हा भिंत बांधून तयार होते

आणि त्याच भितींचा आधार वाटू लागतो. तेव्हा आमचे सर म्हणतात आयुष्यात

मी सर्वात सुखी मनुष्य आहे. कारण माझे विद्यार्थी सर्व दुर पसरले आहेत.

एक हाक मारावी तर हजर. कोरोणा सारख्या भयंकर आजारातून आमच्याच

डाॅक्टर मित्राने जेव्हा सर , मॅडम ला सुखरूप बाहेर काढले. तेव्हा भरभरून

आशीर्वादाचे शब्द आपुसुकच बाहेर पडले आणिआपण रचलेला पाया मजबुत घातला

गेला याची शाश्वती झाली. आमचे प्रिय  सर जेव्हा आमचे सर्वांचे नाव गुंफून

आमच्यावर कविता करून वाचत होते. तेव्हा तो क्षण जगातला सर्वात सुंदर क्षण होता.

आपलं प्रकाशित झालेलं पुस्तक जेव्हा आपण आपल्या गुरूला , शिक्षकाला देतो

तेव्हा तो क्षण सोहळ्यात बदलला गेला. शिक्षकाप्रती , गुरूप्रती एक कृतज्ञ भाव मनात आम्ही अजूनही जपून आहोत. राहणार आहोत.

असं म्हणतात की , आई-वडील , आणि गुरूच्या ऋणातून कधी उतराई होऊ

शकत नाही किंवा होऊही नये.

कारण उतराई होणं म्हणजे स्वतःला सर्वश्रेष्ठ

समजायला लागणे अर्थातच परिपूर्णता आली असा त्याचा अर्थ होतो आणि तेथूनच

आपला अहं सुरू होतो आणि अधोगती सुरू होते. पण आम्ही गेट टुगेदरच्या या सोहळ्यात

आमच्या सर्व शिक्षकांचा सत्कार सोहळा अत्यंत कृतज्ञतेने आयोजीत केला आणि या कार्यक्रमाचे

मी सुत्रसंचालन करताना माझं मन कृत्यकृत्य झालं. जेव्हा सर्व शिक्षक वृंद म्हणाले

असं गेट टुगेदर लाखात एकदाच होत असावं. सर्व कसं अगदी नियोजन बद्ध.

खरंतर आम्ही सर्व खूप दुर दुर आहोत. कुणी पुणे , नागपूर , मुंबई , चेन्नई , गोवा , नासिक, 

सिडनी, अमेरिका अशा वेगवेगळ्या शहरात असणारे आम्ही कधी

एकत्र आलो असतो आणि कधी कार्यक्रम घडवून आणला असता ?

पण आमचा एक मित्र जो दर्यापूरलाच राहतो.

त्याने सर्व जबाबदारी उचलली आणि प्रत्येकाला एक एक भुमिका वठवायला लावली.

एक दिवस अख्खं रिसाॅर्ट  शिक्षक आणि विद्यार्थी मिळून प्रबोधनमय झालं होतं. 

दुपारच्याच्या सत्रात आम्ही आमच्या शाळेत गेलो. सोबतीला आमचे शिक्षक होते.

तिथे आम्ही आमच्या वर्गात बसलो आणि जुन्या आठवणी भरभर आजूबाजूला रेंगाळू लागल्या. 

आमची बॅच सर्वात बदमाश बॅच होती आणि तेवढीच हुशार पण होती. ब-याच चांगल्या वाईट

आठवणी चहा  बिस्कीटा सोबत सिपसिप करत आत आत उतरत गेल्या आणि

आम्ही मनाने आनंदी होत गेलो. शाळेची प्रार्थना म्हणताना सगळ्या आठवणी

शिस्तीत उभ्या होत्या. प्रार्थना झाल्यावर आम्ही त्यांना मनाच्या दप्तरात अलगदपणे ठेवून

अगदी एकही कोपरा न दुमडता मस्ती करायला रिसाॅर्ट मध्ये आलो. तिथे आल्यावर

एक एक मित्र - मैत्रीणीच्या मस्तीपूर्ण कलेचा आस्वाद घेताना आपण नेमकं

कोण आहोत हे विसरत गेलो.  सोबतीला संत्रा गोळ्या , पोंगा पंडीत यांच्या सोबतीला

हास्याचा खडखडाट आणि आठवणींचा धबधबा अखंडपणे सुरू होता. एकही पाय निघायला तयार होईना.

पण रात्रीच्या अंधाराने भौतिकतेचे भान दिले आणि आम्ही पुन्हा आठवणींच दफ्तर पाठीवर टाकून काही जुने-नवे ,

काही हातातून निसटलेले - सापडलेले क्षण गोळा करत आपापल्या घरी परतलो.




©वर्षा पतके थोटे



.



























 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा