गुरुवार, ६ जून, २०१९

पत्र एकवीस


न लिहिलेली पत्रे-Unwritten Letters
वेडी स्वप्नं पुरी होतात पण त्यांची किंमत पूर्ण वसूल करून...किंमत मोजलेल दिसत नाही...सोसणे दिसत नाही इतकेच...
विक्रम
#विश्रब्ध – वर्षा पतके थोटे
२१
ऐक ना रे राजा! दचकलास का? हो..हो..बरोबरचं ऐकलंस तू, "राजाचं" म्हटलयं तुला....खूप आवडतं रे! "माझा राजा" हे असं म्हणायला मला, पण कधी कुणाला म्हणू शकले नाही. कारण माझ्या मनात या नावाविषयी किनई आपोआप एक प्रतिमा तयार झालीय.
बघ, म्हणजे अशी की, राजा म्हणजे सर्वगुणसंपन्न व्यक्ती. ज्याच्याकडे आपल्या, निदान माझ्या तरी प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळू शकेल. ज्याचा भरभक्कम आधार वाटेल. ज्याच्या खांद्यावर ड़ोक टेकवल्याबरोबर सगळी काळजी, चिंता आपसुक मिटावी आणि आपण तिथेच चिरशांती घ्यावी. एकही शब्द न बोलता. असं व्यक्तिमत्व असेल हे राजा नावाचं असं तरूण वयाने मनःपटलावर न मिटणा-या रंगाने उमटवलेलं चित्र. पण हे मनःपटलावर साकारलेलं चित्र कधीही, कुणातही गवसलं नाही अरे! म्हणून मी मग ते अजूनही मनात जपून ठेवलंय.
पण का, कोण जाणे तुझ्या बाबतीत मात्र मनपटलावरील "राजा" या प्रतिमेचे रंग जमायला लागलेत आणि अंतर्मनातून सहजनाद उमटलाय की, मी तुलाचं राजा म्हणायला हवं.
किती वेड़ी स्वप्न असतात न आम्हां मुलींची. असतात अगदी साधी. पण वेड़ी असतात. ही वेड़ी आणि साधी स्वप्नही पुर्ण होत नाहीत रे! अगदी उभ्या आयुष्यात! अर्थात प्रत्येकाचीच होत नाहीत असंही नाही. मला तर नेहमी वाटतं ज्यांची ही अशी वेड़ी स्वप्न पूर्ण होत असतील ना त्या मुली, स्त्रिया नियतीच्या खास आवडीच्या असतील. त्यांच्या भाळी असलेली ललाटरेषा नियतीने निगुतीने त्यांच्या कपाळी मांड़ली असेल. म्हणूनचं अगदी आनंदाने त्यांची ही वेड़ी स्वप्न पूर्ण होतात.
काहींच्या कपाळी करंटेपण स्पष्टपणे जाणवतं. मग अशावेळी जगाच्या लेखी असणा-या अगदी साध्या, क्षुल्लक गोष्टी ही पूर्ण होत नाहीत. ही अशी वेड़ी स्वप्न मागून किंवा कर्माने मिळत नाहीत!...त्यासाठी नियतीचा वरदहस्त लागतोच. पण मी मात्र नशीबवान! तुझ्या रूपाने मला माझी वेड़ी स्वप्न पाहण्याचा अधिकार सापडलाय. मी तूला मनातचं जपलयं म्हणून काय झालं?.... निदान मला आता वेड़ी स्वप्न तरी पाहता येतील....नाहीतर भकासलेपण उरलं असतं हातात. जन्मोजन्मी चिरशांतीच्या शोधात भटकावं लागलं असतं. कायम उपरेपण पदराच्या टोकाला बांधून.....सतत.
जपूयात रे आपणही एकमेकांची ही वेड़ी "स्वप्न"
बघ! तुलाही आवड़लचं ना, मी तुला " राजा" म्हटलेलं. हो माहित्येय मला तू ही माझ्यासारखाचं वेड़ी स्वप्न पाहून ती उराशी बाळगणारा.
हा विश्वासचं तुला मी "विश्रब्ध" म्हणावं असं सांगत असतो.
तुझीच
©वर्षा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा