पत्र बावीस
न लिहिलेली पत्रे-Unwritten Letters
बोलकेवडा...शब्दांचा घमघमाट...सुंदर कल्पना...
विक्रम
#विश्रब्ध – वर्षा पतके थोटे
पत्र बावीसावे
ऐक ना!
तुझ्या मृदुल स्वरांची लय माझ्या अस्तित्वासोबत गुरफटून गेलीय... हो खरयं रे, की आताशा मी या तुझ्या स्वरांच्या लयीच्या हिंदोळ्यावर एकसारखी झुलत असते!
आता मला या भोवतालच्या त्या जीवघेण्या मौनाचंही काहीच सोयर सुतक नसतं .....
हो खरचं....नाहीतर हे मौन मला फार जीवघेणं वाटलं असतं. बोलक्या माणसांसाठी तरी असं मौन पेलणं कठीण जात असावं....तसंच माझं.
माणूस प्राणी कसा अखंड बडबडत असतो. तर, बाकी प्राणी मात्र नाईलाजाने मौनातचं रहात असतात तरिही त्यांचे संवाद सुरुच असतात पण मला कळत नाही की, मनुष्य प्राण्याने का म्हणून मौनात रहावं रे, कारण हा एकांत तसा खूप जीवघेणा असतो..मला तर कधीच आवडला नाही हा एकांत...खूपदा हा एकांत चेह-यावर फार स्पष्टपणे जाणवतो. वाटतं, आयुष्यातल्या कुठल्या ना कुठल्या टप्प्यावर प्रत्येकालाचं सामोरं जावं लागत असेल का असल्या जीवघेण्या एकांताला?
माझा कायम विश्वास की, संयमाने, निग्रहाने आणि आस्थेने बोलण्याने गैरसमज देखील दूर होतात,...मग या मौनाचेच रामायण का होऊ द्यावं? त्यापेक्षा बोलून मोकळं व्हावं ना, ...शब्दाचं महाभारत झालं तरी चालेल, पण मौनाचा एकांत नकोच. फार त्रासदायक असतो हा अबोल एकांत.
संत महात्म्यांना मौन आवड़त असेल नाही असं नाही. पण माझ्यासारख्या अनेकांना मात्र फारच असह्य होतं हे मौन. या नकोशा असणा-या गोष्टींचं बीज कुठेतरी नकळतपणे आपल्या आत खोल खड्डा बनवतं..मग अशा नको असलेल्या गोष्टी स्वप्नात जरी पाहायच्या म्हटल्या तरी आतल्या जखमा पार चिघळतात अरे! पून्हा आपल्या मनातला खड्डा नव्याने तयार होतो. त्यापेक्षा नकोच ते.
पण तू मात्र सुदैवाने बोलघेवड़ा....पण थांब हं तू बोलघेवड़ा ऐवजी बोलकेवड़ा आहेस... हो ...हो बोलकेवड़ाचं. तू बोललेल्या शब्दांचा सुगंध .....अबब....केवढा तो घमघमाट....एवढयाश्या त्या बोलण्यावर अख्खं आयुष्य त्या रूंजी घालणा-या घमघमाटात घालवावं. अगदी त्या केवड्यासारखचं. त्याचा सुगंध कसा लांबंवरूनच येतो आणि आपलं मन रोमांचीत होतं. तुझ्याही बाबतीत तेच तर जाणवतं अरे मला........बोलण्यातूनच केवढा तो शब्दांचा घमघमाट...अगदी कुणीही प्रेमात पडावं....पड़ले असतीलही कदाचीत.....पण मी मात्र आधीच तुझ्या शब्दांचा सुगंध रोमरोमात साठवून हक्क दाखवतेय आणि तुला हे आधीच समजलयं......हो की नाही. मला माहिती आहे रे, माझ्या मनीचे गुज तू जाणतोसंच.
मग उगीच म्हणते का मी तुला, "विश्रब्ध" !
तुझीच
©वर्षा

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा