पत्र सव्वीस
न लिहिलेली पत्रे-Unwritten Letters
काव्यात्म पत्र....
विक्रम
#विश्रब्ध – वर्षा पतके थोटे
२६
आज तो अगदी पहाटेच्या सूर्यकिरणांसोबतच आला. तिलाही त्याच्या येण्याची चातकासारखी ओढ असतेच आणि हे तर अगदी ठरलेलं, लिहीलेलंच जणू! युगानूयुगे चालत आलेले.....पण तरिही हे गुपित शहाण्यांपेक्षा वेड्यांनाच जास्त उमगलेलं.........
त्याच्या अशा अवेळी येण्याने सगळ्यांचेच आणि तिचेही नुकसान होणार असतेच. पण तो मनमौजी, वेड़ा, लहरी, ना त्याला जगाची पर्वा, ना लोकांच्या दुषणांची पर्वा...त्याला फक्त एकच ध्यास तीला भेटायचा. न सांगता अचानक यायचं आणि तीला मनसोक्त अंतर्बाह्य भिजवायचं आणि न सांगताच निघूनही जायचं.......किती हा लहरीपणा..पण तिलाही तितकाच आवडतो तो आणि त्याचा लहरीपणा. लोक त्याची वेड़ात गणना करतात आणि त्याला अचानक आलेला बघून "वळीव" वगैरे म्हणतात. पण 'ती'ला तो कायमच अगदी जीवापासचा...जसा तू माझा , जीवलग, तसाच तो...
....
....
खरंतरं तिच्याकड़े तिचं असं स्वतःचं असं आकाश असल्यावरही ती त्याचीच आतुरतेने वाट पहाते. कारण तिचं मन आणि त्यातील जखमा त्याच्याच फुंकरीने ब-या होतात. हे त्याला चांगलंच ठाऊक आहे म्हणून तो जगाची पर्वा न करता तीला भेटायला येतोच. मग तीही मनावरची मरगळ झटकून नवीन वस्त्र परिधान करते त्याच्या सोबतीने. कारण तो ही आहे तिचाच " विश्रब्ध"
तुम्हां दोघांमध्ये किती हे साम्य म्हणून बघ ही कविता सुचली, आधी वाच तर खरं , ......अगदी मिळती- जुळती आहे हे जाणवेल...
तू
वळीवाचा पाऊस
भावना झंकारीत आलास
रेशमी पिसारा फुलवित गेलास।
वळीवाचा पाऊस
भावना झंकारीत आलास
रेशमी पिसारा फुलवित गेलास।
तू
गगनी कृष्णमेघ,
शामरंगी रंगातून आलास
आयुष्य चिंब भिजवूनी गेलास।
गगनी कृष्णमेघ,
शामरंगी रंगातून आलास
आयुष्य चिंब भिजवूनी गेलास।
तू,
सुर ओळखीचा
गझलेच्या गळी आलास
ह्रदयी चे स्पंदन होऊन गेलास।
सुर ओळखीचा
गझलेच्या गळी आलास
ह्रदयी चे स्पंदन होऊन गेलास।
तू
निरागस चंद्रमा
धुंद आसमंती आलास
युगानूयुगाचे बंध जोड़ूनी गेलास।
निरागस चंद्रमा
धुंद आसमंती आलास
युगानूयुगाचे बंध जोड़ूनी गेलास।
- #वर्षा
आपलेही बंध युगानूयुगाचेचं तर आहेत म्हणूनच मी तुला कायम म्हणत आलेय "विश्रब्ध"
तुझीच,
©वर्षा

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा