गुरुवार, ६ जून, २०१९

आजचं रौप्य पत्र...पंचवीस


न लिहिलेली पत्रे-Unwritten Letters
आज वर्षा थोटे ह्यांचे रौप्य मोहोत्सवी पत्र. त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन! तशी ही पत्र मालिका अमूर्त वाटावी अशीच. पण ह्या पत्रामध्ये त्यांनी आपली “विश्रब्ध”बद्दलची भूमिका स्पष्ट केली आहे. आणि लक्षात येते की प्रत्येक स्त्रीच्या मनात वसणारा हा “विश्रब्ध” अमूर्त कसा असेल? तो तर साक्षात आहे. तो कदाचित हाताशी लागत नसेल पण म्हणून त्याचे अस्तित्व नाकारता येत नाही.
त्यांच्या ह्या पत्रमालिकेला उत्तरोत्तर अनेक धुमारे फुटो आणि ती यशस्वी होवो...ह्याच शुभेच्छा.
विक्रम
#विश्रब्ध - वर्षा पतके थोटे
पत्र पंचवीस
#विश्रब्ध
तुला पण हा प्रश्न पड़लाय ना ,की मी तुला विश्रब्ध का म्हणते? बाकी जीवलग संबोधने का नाही लावत?
तर ऐक मग, "विश्रब्ध" म्हणजे ज्याच्यावर मी ड़ोळेझाकून विश्वास ठेऊ शकते असा ! ज्याची मला कसलीही भिती वाटत नाही. जो माझ्या एका हाकेसरसी कधिही , कुठेही धावून येईल असा तो विश्रब्ध ! एक सौम्य छान व्यक्तिमत्व. स्वतःला विसरून स्वतःपेक्षा अधिक विश्वास ज्याच्यावर ठेवावा असा तो विश्रब्ध ! थोडक्यात त्याच्यावर असणारा माझा शुध्द विश्वास म्हणजे " विश्रब्ध" ! आणि तू जाणतोस की नात्यात विश्वासाला किती महत्व असतं ते !
"उत्तमः क्लेशविक्षोभं क्षमः सोढुं न हीतरः।
मणिरेव महाशाणघर्षणं न तु मृत्कणः।।"
असा श्रेष्ठ पुरूषचं स्वतः न भिता, न ड़गमगता कितीही कठीण परिस्थिती समोर आली तरी जो आपल्या स्वजनांची काळजी घेतो. ज्याच्या एका नजरेत एक आश्वासन, आणि पूर्ण विश्वास असतो असा पुरूष ! असाही तो की, ज्याने तिच्या प्रेमाबरोबरचं तिच्या स्त्रीत्वाचाही आदर, सन्मान करावा असा पुरूष ! ज्याच्या खांद्यावर आपल्या अगणित काळज्या, वेदना, हुंदके सोपवून टाकून आपण सहज मोकळं व्हावं असा पुरूष, ज्याने न सांगताही आपल्या अश्रूंशी मैत्र करून आपल्याला हसवावं असा पुरूष, ज्या व्यक्तिमत्वाच्या सावलीत उन्हाच्या झळाही आपोआप शितल सुखद होत जाव्यात असा तो पुरूष, मनाला दुःखाचा लवलेशही शिवला तरी आपण मात्र कायम बिनधास्त असावं असा तो सहचर , पुरूष, कायम मी तुझ्यासोबत असेन हा विश्वासू आनंद द्विगूणीत करणारा असा पुरूष.
असा विश्रब्ध, असा विश्वास, अशी सोबत , मित्र, सखा, जोडीदार पुरूष तर आपल्या आयुष्यात प्रत्येकीलाच हवा असतो..
अरे, आणि तो तिने मनात जपलेला असतो कायमचं युगानूयुगे.......
ज्या प्रकारे काही काळानंतर पुरूषाला बायको मध्ये आईची माया, ममता दिसत असते. अगदी त्याच प्रकारे स्त्रीलाही एका विशिष्ट वयानंतर आश्वस्त करणारा विश्वासू अगदी बापाएवढचं मायेने वागवणारा पुरूष हवा असतो आणि ही प्रत्येक स्त्रीच्या मनाची भुक युगानूयुगे चालत आलेली आहे.
म्हणूनच द्रौपदीने पाच पांड़व सोबत असूनही तिच्या मनातील "विश्रब्ध" जो "कृष्ण" होता त्याचाच धावा केला. पाच पांड़वाकड़े ते बळ, सामर्थ्य नव्हतं का? जे कृष्णाकड़े होतं. नक्कीच होतं पण तिचा विश्वास अबाधित राखण्याचं सामर्थ्य फक्त आणि फक्त तिला कृष्णात सापडलं. म्हणून तिने मनातल्या पूर्ण पुरूषाचा म्हणजेच " विश्रब्ध" चा धावा केला.
मला तर नेहमीच वाटत आलंय प्रत्येकीने मनात जपलेला हा " विश्रब्ध" ज्याने "कृष्ण" हे भौतीक नाव धारण केलंय. तो प्रत्येकीच्या थोडा वाट्याला आला तर हे जग खूप सुंदर होईल. द्रौपदीसारख्या अनेक स्त्रिया कालही होत्या, आजही आहेत, उद्याही असतील.
ज्यांनी त्यांच्या मनातील पुरूषाला फक्त आणि फक्त मनात जपलयं. नाहीतर "शांता शेळके "नी ही कविता कदाचित नसतीचं रचली.
"शतदा झाला देह तरीही
अभंग राहो आतील 'तो'
त्याला जपण्यासाठीच माझा
जीव असा हळवा होतो.
कालची न मी आज, आजची----
पुन्हा उद्याला मी नाही
अंतर्यामी ' त्या' ला देते
तरीही माझी मी ग्वाही"
शांताबाईंची ही कविताही हेच तर सांगतेय त्यांना किंवा प्रत्येक स्त्रीला अभिप्रेत असणारा तो प्रत्येक युगात अभंग राहो...
म्हणजेच माझ्या देहाने जरी वेगवेगळया युगात नवीन देह जरी धारण केलेला असला तरी माझ्या मनात असलेला तू जन्मोजन्मी तूच रहा. हेच तर मागणे माझे किंबहूना प्रत्येक स्त्रीचे असते. आणि हाच विश्वास तिला " विश्रब्ध" म्हणायला भाग पाड़तो . कधीतरी एखाद्या व्यक्तिमत्वात एखादीला हा "विश्रब्ध" सापड़तोही. जसा राधेला अनय ऐवजी कान्हात, कुंतीला पांड़ू ऐवजी विदूरात सापडला.
पण मनाला अज्ञाताची इतकी भिती असते ना की, एक स्त्री सहजासहजी नाही रे व्यक्त होतं. मग अशावेळी अपरिचित सुखापेक्षा परिचित दुःखालाच ती कवटाळून राहते, या चाकोरी बध्द परिघात.
पण मी मात्र नशिबवान मला तुझ्या रूपात माझ्या मनात असलेला " विश्रब्ध" गवसला. माझीच मला दृष्ट वगैरे लागेल की काय? असा तो भास घाबरवतो....आणि मला हे ही माहीत्येय आपण प्रत्येक जन्मी भेटणार आहोत.....म्हणूनच तर मी तुला कायम " विश्रब्ध" अशी हाक देत आलेय.
तू कृष्ण नि माझा पवित्र शुध्द अलौकीक असा सखा , "विश्रब्ध"
तुझीच,
©वर्षा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा