गुरुवार, ६ जून, २०१९

पत्र तेवीस


न लिहिलेली पत्रे-Unwritten Letters
आज वर्षा थोटे ह्यांचे विश्रब्ध ह्या पत्र मालिकेतील पत्र पोस्ट व्हयला उशीर होत आहे...क्षमस्व!
सगळा प्रवास अद्वैतभावाकडे असावा...तिथेच प्रेम सापडते.
विक्रम

#विश्रब्ध – वर्षा पतके थोटे
२३
"निकले थे खूदा को ढूॅढने।
मगर रास्ते मे ही
खूदा जैसे आदमीसे
मुलाकात हो गयी।"
असं काहीसं झालंय...तुझ्याबाबतीत...तुला चांगलंच ठाऊक आहे मी त्या नियंत्याला ठायी ठायी मानते....मग अशावेळी मी त्याचा शोध घेता घेता. तुझाच शोध लागावा. केवढा हा दैवविलास.
आजपर्यंत त्या नियंत्याच्या स्मरणाशिवाय.....हो मूर्तीशिवाय असं नाहीच म्हणणार अरे मी....तो कोणत्याही रूपात असू शकतो की नाही. निर्विकार, निर्गूण असा तो...माझ्या ह्रद्यात वसलेला...पण त्याची जागा तुझ्या रूपात भरून यावी....यापेक्षा दैवविलास तो काय?
तसंही "जे. कृष्णमूर्ती" म्हणतात.
"प्रेमस्पर्श" आहे म्हणून जीवनाला अर्थ आहे.
प्रेमाचा स्पर्श हा करूणामय, प्रज्ञायुक्त, व सौंदर्यपूर्ण असतो. हे प्रेम म्हणजे विशिष्ट संवेदना नव्हे, विचारातून उराशी बाळगलेली स्मृती नव्हे अथवा दोन व्यक्तीतले लैगिंक आकर्षण नव्हे. तर हे प्रेम म्हणजे तो जीवनस्पर्श होय, जो माणसाचे सर्व जीवन बदलून टाकतो व ख-या अर्थाने सजीव बनवतो. हा प्रेमस्पर्श ज्याच्या आयुष्याला झाला त्याच्या जीवनाला अर्थ प्राप्त झाला.
कधी कधी अनपेक्षितपणे एखाद्या व्यक्तीशी जुळून येणा-या जिव्हाळ्याच्या नात्यामूळे खरे तर आत्मीक समाधान, आनंद असा काही मिळतो....तेव्हा आपलाच आपल्याला हेवा वाटू लागतो.... जशी आपण दोघं जुळली गेली आहोत. अगदी तोच आनंद आणि समाधान दोघांनाही जाणवतचं की रे, मग अशावेळी माझा देव माझ्या ह्रद्यात असला काय? किंवा तू असला काय? काय फरक पडणार असतो. नाहीच की नाही. दोघांचंही तत्व एकचं आनंद देत रहायचं....उगीच का विठ्ठलाच्या वारीत लोकं त्याला भेटण्याच्या आनंदाने वेड़ी होऊन नाचतात......
"मी, तू पण गेले वाया
पाहता पंढरीच्या राया"
तोच आनंद मलाही सापडलाय तुझ्याच रूपात.....त्या पंढरीच्या रायासारखा .....आपण ही मी, तू पण विसरून एकचं झालोत. हो की नाही.
जपूयात रे हा आनंद दोघं मिळून........"विश्रब्ध"
तुझीच
©वर्षा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा