गुरुवार, ६ जून, २०१९

सातवे पत्र


न लिहिलेली पत्रे-Unwritten Letters
March 26
आत्म्याची हाक ऐकू येणे महत्वाचे असते....
विक्रम

#विश्रब्ध – वर्षा थोटे पतके
"अस्वस्थ"
हो! बरोबर तेच ऐकतोयस तू.
जरा बघतोस का आभाळाकडे? बघ ना कसे काळे ढग जमा झाले आहेत! मला अस्वस्थ व्हायला होते असे काळे पांढरे ढग बघतांना. तू विचारू नकोस आता का ते. होतं असं कधी कधी सगळ्यांच्या बाबतीत. कसंय ना माणसाचे एक मन त्याला न विचारता कुठे तरी गुंतून पडते आणि ते सोडवून घेणे सोपे नसतेच. त्यात दुसरं मन सांगत असते असे गुंतू नये ग कुठेही.
मनाला किती अलिप्त ठेवायचे तुच सांग. अलिप्तपणा हा राजमार्ग आहे. पण त्याला हे कुठे माहित असते की हा राजमार्ग भावनांच्या स्मशानात जाऊन पोहोचतो. जसे काळे-पांढरे ढग एकाच आकाशात दाटीवाटी करतात ना...अगदी तसेच ही दोन मने आपल्याच आकाशात दाटीवाटी करतात. एक मन स्वच्छ पांढरं तर दुसरे मन काळकुट्ट. कधी स्वःताचाच घात करेल सांगता ही यायचे नाही. कधीकधी हे ढग रंगपंचमी खेळतात अरे! अन् मग रंगपंचमी खेळता खेळता स्वैर कल्पनांच्या लाटांवर सारखी इकडून तिकडे फेकली जातात आणि आपण मात्र हेलकावतं राहतो.
असं हेलकावत जरी असलं तरी माणूस मात्र ओलावा शोधत राहतो. कारण त्याचेप्रेम असते जीवनावर. अगदी प्रत्येकाचे , माझेही आहे. मग त्या जीवनाचा चेहरा कसाही असला तरीही. तसेही माणूस कधी दैवाच्या, तर कधी समाजाच्या हातचे खेळणे बनल्यामूळे आयुष्याची मनासारखी घडण करू शकलाय का?....तर सरसकट नाही हेच उत्तर येऊ शकते. हो की नाही?
तुला पटतयं ना?
पण आपण मात्र आत्म्याच्या हाका ऐकू यात आणि मनातल्या मातीच्या वासाने काही क्षण का असेना धूंद होऊयात.
होऊयात ना?
हो...हो मला माहित्येय तुझा होकार आहेच. कारण तुलाही ऐकू आलीय "आत्म्याची हाक".
हो ना?
उगीचचं नाही म्हणत रे मी तुला "विश्रब्ध"!
तुझीच

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा