गुरुवार, ६ जून, २०१९

सहावे पत्र


न लिहिलेली पत्रे-Unwritten Letters
March 21
प्रश्न पडणे आवश्यकच असते...कळीचे असते...मनाला द्यायची उत्तरे...ती खरी असायलाच लागतात.
विक्रम
विश्रब्ध – वर्षा पतके थोटे
आताशा मला खूप प्रश्न पड़तात अरे! पण मला माहीती आहे प्रश्न नेहमीच सोपे असतात. अवघड असते ते उत्तर. त्यातही मला वाटतं इतरांना द्यायच्या उत्तरापेक्षा मनाला देण्याचे उत्तर जास्त अवघड असते! कारण सगळेच त्यातल्या मूळ रंगछटांसह स्पष्ट आपल्या मनात असते. पण तरीही मला विश्वास आहेच रे...! तुझ्याकडे असेलच माझ्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर. कारण माझ्या मनातील रंगछटा आणि तुझ्या मनातील रंगछटांनी मिळूनच तर एक कॅनव्हास तयार झालाय.
तू हे ही चांगल्याप्रकारे जाणतोस की या कॅनव्हास वरील प्रत्येक रंगावर मी भरभरून,निखळ आणि निस्वार्थपणे प्रेम करतेय......करत राहणार. का एवढं निस्वार्थपणे प्रेम करते. माहीतेय तुला?
नाही ना! मग ऐक!
अरे! कारण या कॅनव्हासवर मी कुठलंही प्रतिबिंब शोधत नाहीये. खरं तर ते कुणीच शोधू नये. अगदी तू सुध्दा नाहीस......नसशीलच शोधत. हो ना? पण हे मनाचे डोळे फार दुष्ट वगैरे असतात. कसे म्हणून काय विचारतो. तर ऐक!
हे दुष्ट डोळे प्रश्नांशी सलगी करून आपल्याला पार छळतात आणि गालातल्या गालात हसतातही. जेव्हा आपण संभ्रमावस्थेत असतो ना नेमकं अशावेळीच खूप प्रश्नांचा गोतावळा आपल्या आजूबाजूला पसरून आपला हक्क दाखवायला लागतात. मग अशावेळी आपलाच जीव गुदमरायला लागतो.
पण मी मात्र निश्चिंत आहे अरे! कारण मला माहीती आहे उत्तर देणं कठीण असले तरी तू मला उत्तर देशीलच.
विश्वास आहेच!
मग उगीचच म्हणते का मी तुला 'विश्रब्ध'!
तुझीच,
©वर्षा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा