गुरुवार, ६ जून, २०१९

पाचवे पत्र


न लिहिलेली पत्रे-Unwritten Letters
March 19
आपल्या एकरूप मनाचा हा साक्षीदार कायम आपल्या मनात घर करून आहे. त्याचे खरे रूप किती किती मोहक आहे ना? अगदी कृष्णासारखे विलोभनीय आणि तुझ्यासारखे प्रेमळ.
खरे तर हे अद्वैताचे रूप....
विक्रम
विश्रब्ध – वर्षा पतके थोटे
तो हळुवार सुखाच्या सुगंधी फुलांच्या मंद मंद सुंगधाची कूपी उधळीत आलाच. अगदी तुझ्यासारखा! कोण तो? तुला माहीती आहे का?
अरे! थांब सांगते, जरा धीर धर! किती घाई करतोस. शांतपणे ऐकावं रे सगळं. केवळ ऐकणेच का? एकूणचं सगळं शांतपणे मनात साठवून घ्यावं! म्हणजे घाई झाल्याचा पस्तावा मागे आपले निशाण सोड़त नाही.....
हं, तर मी सांगत होते की, तो म्हणजे अवनीचा प्रियकर, प्रेमातल्यांचा जिवलग, कलाकारांची प्रेरणा, बळीराजाचा पोशींदा. किती किती रूपे त्याची, प्रेमार्ताची ओंजळ ज्याची त्याने भरून घ्यावी. असा हा सगळ्यांना गरजेच्या वेळी हवा असणारा तुझ्या-माझ्या मनातला पाऊस.
गरजेच्या वेळी असं म्हटलं म्हणून दचकलास का?
खरचं तर आहे...तो ही बरेच दिवस रेंगाळला किंवा थोडा जरी धसमुसळ्यासारखा वागला तर....स्वार्थी माणसांना लगेच नकोसा होतो. तसंच प्रत्येक नात्याचंही नाही का? कोण, कुठे, कुणाचं कधीतरी वर्चस्व सहन करायला तयार होतं का? पण तेच जर शांततेने आणि प्रेमाने घेतलं तर समोरचा निदान ऐकून तरी घेतो.
म्हणून ना मला कायम बुध्दाचा मार्ग आवडतो. आणि आत मधले रणांगण कायम शांत संयमानंनेनिवलेले...तुला पटते आहे ना ?
तुला आठवते का रे! अवनीचा हा प्रियकर तुझे मन आणि माझे मन. म्हणजे दोन्ही मन मिळून एक मन तयार होतानाचा एकमेव साक्षीदा ! तर असा हा अवनीला भेटायला येणारा वेड़्या जगाची पर्वा न करता धावतच येतो. आणि युगानूयुगे वाट पहात असलेली अवनी हिरवीकंच गर्भार साड़ी नेसून चक्क मिरवायलाही लागते आणि तोही अवनीचं असीम प्रेम आपल्या राजमुकूटात खोचून शांततेने परतायला लागतो. ही मिलनाची रचना कदाचित त्या जगन्नियत्यानेंच रचली असावी असे प्रत्येकाला वाटूनही जाते.
पण माणूस प्राणी मोठा स्वार्थी. स्वार्थी म्हणजे कसा असे काय तू विचारु शकतोस.
बघ म्हणजे तो हळुवार शांततेने आला तर आपापल्या सोयीने प्रत्येकजण आपापला स्वार्थ पाहणार. आणि तो जर का ,आपल्या मनाविरूध्द आला तर लोकं लगेच त्याला दुषणे देणार. अरे पण यांना कळत कसं नाही तो तर फक्त आणि फक्त तिला भेटायला येतो....हे महत्वाचे नाही का?
सुदैवाने आपले तसे नाही.
हो की नाही?
आपल्या एकरूप मनाचा हा साक्षीदार कायम आपल्या मनात घर करून आहे. त्याचे खरे रूप किती किती मोहक आहे ना? अगदी कृष्णासारखे विलोभनीय आणि तुझ्यासारखे प्रेमळ.
बघितले का? आताच अवनीला तो कसा भिजवून गेला.
तसा तू ही अगदी तसाच माझ्या मनाला अखंड भिजवतच असतोस, हो ना रे!
आताही भिजवशिलचं रे!
माहीती आहे मला!
उगीचचं म्हणत नाही मी तुला "विश्रब्ध"
तुझीच

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा