गुरुवार, ६ जून, २०१९

न लिहिलेली पत्रे-Unwritten Letters
April 4
स्वप्नात जगणे .. ह्यावरून एक चीनी म्हण आठवली....स्वप्न एक डोळा उघडा ठेवून पहावीत...म्हणजे अपेक्षाभंगाचे दुःख सोसायला लागत नाही.
विक्रम
#विश्रब्ध – वर्षा थोटे पतके
१०
अरे, बघ तर खरं!
पहाटेला मला कसल्या सुंदर फुलांच्या राशी दिसायला लागल्यात....किती किती सुंदर,प्रसन्न अन् हसरा प्राजक्त आणि टप्पोरा जास्वंद. तुला सुध्दा दिसतायेत ना........
हं.......
दिसणारचं की, कारण ही स्वप्नपहाट तूच तर घेवून आलास आणि येतांना इतक्या सुवासिक राशीही सोबत आणल्यास. या सुगंधानेच तर माझ्या मनाचा गाभारा सुगंधित झाला.
तसं तर तू पुस्तकांच्या काल्पनिक दुनियेतला. अवसेच्या अंधारात उगवलेल्या शुक्र ता-यासारखा तू मनाच्या गाभा-यात चमकलास आणि मनाचा गाभारा आंतरिक सुंगधाने दरवळून गेला. हा आंतरिक सुगंध सोबत घेऊन कधी सत्यात येशील का रे?
असो......तर मी काय म्हणत होते.
हो....आठवलं.
तर पुस्तकांच्या सुंदरशा पण स्वप्नाळू अशा जगात जगणे म्हणजे स्वप्न पाहण्याचे सार्थकच. कधी कधी जिवलग माणसांजवळ सुध्दा ज्या गोष्टी मन उघड करून बोलता येत नाहीत, त्या गोष्टी या स्वप्नातील जगात अगदी सहजच उलगडल्या जातात. मग आपण मनावरचं ओझं थोड खाली उतरवल्यामुळे आनंदी होतो.
जीवनातल्या सत्याच्या उग्र चेह-यांना सामोरं जाण्याचं मानसिक धारीष्ट्य जगण्याची इच्छा प्रबळ करतं. तेही याच पुस्तकांच्या स्वप्नाळू जगामुळे. अशा या सुंदरशा जगात भेटलेला तू कायम सोबत असशीलच माझ्या . तू आणि मी कायम या पुस्तकांच्या सुंदरशा स्वप्नाळू
जगात भेटत राहू.
हो .....माहिती आहे मला तुलाही या पुस्तकांच्या स्वप्नात रमायला आवडतं.
मग उगीचच म्हणतेय का मी तुला विश्रब्ध!
तुझीच

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा