न लिहिलेली पत्रे-Unwritten Letters
नात्यात अपेक्षा येतात...गृहीत धरले जाण्याची वृत्ती असते....
विक्रम
#विश्रब्ध – वर्ष थोटे पतके
#पत्र ९
आताशा मी रोज खूप आतुरतेने वाट पाहतेय.
कसली म्हणून नको विचारूस हं आता.
ऐक!
तू जो वसुंधरेच्या चराचरातून, आकाशाच्या कणाकणातून गोळा केलेला प्राजक्त पाठवतोस ना त्याची, खूप आतुरतेने वाट पाहते रे! तुला नसेलच माहिती म्हणून सांगते. मला न झोप खूप खूप प्रिय. अगदी दोन मिनिटात मला ती तिच्या कवेत घेते. पण आजकाल मी तिच्याशी झटापटी करून अगदी पहाटेच्या अंधारात ओंजळ धरून उभी असते. कारण तू पाठवलेल्या प्राजक्ताला ओंजळीत घेऊन दीर्घश्वासाने त्यासोबत आलेला तुझा सुगंध रोमारोमात साठवायचा असतो मला. मग दिवसाची सुरूवातच प्रसन्न आणि प्रेमाने होते. दिवसभरात कितीही आणि कुठल्याही प्रसंगाला शांततेने सामोरी जाता येत रे!
जसे आकाशाचे आणि वसुंधरेचे नाते अद्वैताचे. तसेच आपलेही नाते अद्वैताचेच. तसं तर नातं हा शब्दच मला आवड़ता नाही. कारण कसंय ना! नातं आलं तिथं अधिकार येतो. वापरण्याची प्रवृत्ती आपोआप जागृत होते जी कधीकधी खूप त्रासदायक वाटते.
आपण देवाला जे मनाने समर्पण करतो ना त्यामध्ये कुठलीही अपेक्षा राहत नाही. अगदी तसचं समर्पण आपलंही नाही का? दोघेही एकमेकांच्या मनात अढळ स्थानी. जगाच्या दृष्टिने एकमेकांसाठी आपण परकेचं. पण आपलं असणं हे फक्त आणि फक्त आपल्या दोघानांच जाणवतं असतं. कारण आपण ते सृष्टिच्या चराचरात शोधत असतो.
प्राजक्ताला फळ येत नाहीत. हो हे माहिती आहे तुला. फुलाचं अस्तित्व सुर्याच्या प्रखरतेत संपूनही जातं. पण सुगंध मात्र चराचरात साठवला जातो. हे अस्तित्व छोटं का असेना? पण किती किती मोलाचं नाही का? आपलहि अस्तित्व असचं छोटं पण सुगंधी हवं. नाही का?
पण समजा एखादे दिवशी प्राजक्त उमललाच नाही तर ..........हसतोयस काय वेड्या!
ही जीवघेणी गंमत फक्त आणि फक्त तुलाच सुचू शकते. म्हणून मी आधीच तू रोज पाठवलेला सुगंध गोळा करून ठेवलाय माझ्या ओंजळीत. पण तरीही मी रोज वाट पहाणार तुझ्या सुगंधाने भरलेल्या प्राजक्ताची.
मला माहित्ये तूही न चुकता पाठवशीलचं.
उगीच नाहीचं म्हणत रे! मी तुला "विश्रब्ध"
तुझीच
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा