पत्र तेरावे
न लिहिलेली पत्रे-Unwritten Letters
हो .....मला माहीत्येय रे......
दोन शब्दांचे दोन ध्वनी आणि त्यातली तरल भेद खूप चांगल्याप्रकारे व्यक्त झाला आहे.
विक्रम
#विश्रब्ध – वर्षा पतके थोटे
पत्र तेरावे
ऐक ना!
आज मी न मंदिरात गेले होते. कुठल्या म्हणून नको विचारूस हो, कारण माझ्या दृष्टीने सगळे देव, अल्लाह, जिजस्, वाहे गुरू, बुध्द सगळे सारखेच. सगळ्यांचे प्रेम आणि सार एकच की रे! हे तुलाही चांगलं ठाऊक आहे. मग अशावेळी अमक्या तमक्याच्या घरी गेल्यासारखं कशाला विचारतो ना आपण, कोणत्या मंदिरात गेलो होतो? असं जायचं पण नसतं आणि विचारू तर नयेच रे!
का? कोण जाणे? मला न मंदिर या शब्दापेक्षा " देऊळ" हा शब्द फार जवळचा वाटतो. देऊळ हा शब्द उच्चारल्या बरोबर ना, शांत, संयमित, विश्वासाची, हक्काची जागा प्रतिमेसह मनाच्या ड़ोळ्यात उभी राहते अरे, काहीतरी गवसणार आहे मला, जे माझं हरवलयं! पण नेमकं काहीच आठवत नाही. तरी तिथे गेल्यावर एक आत्मिक शांती मिळते. आणि मनात भरलेल्या विश्वासाला सोबत घेऊनच मी घरी परतते.
पण आज मी न मंदिरात गेले. मजेची गोष्ट अशी की ही मंदिर असतात शहरात. अती श्रीमंत, झगमगाट सगळीकडे. ज्याच्या पूढे नतमस्तक व्हायला आलेलो असतो नेमका तोच हरवलेला असतो. पण देवळाचं मात्र तसं नाही हो! मंदिर जसं शहरात असतं तसं देऊळ गावात असतं. खुपदा तेही नदी किनारी किंवा गावाच्या मध्यभागी. देऊळाच्या परिसरात पाऊल टाकल्या टाकल्या मनाची मरगळ कुठल्या कुठे पळून जाते. आपल्याला कळतही नाही........ असो
तर आज मी मंदिरात जन्मोत्सवाचा सोहळा अनुभवला. टाळ मृदूंगाच्या भजनात भक्त किती तल्लीन होऊन जातात ना त्या नियंत्याच्या प्रेमात. किती अपार आनंद आणि विश्वास ओसड़ूंन वाहत असतो भक्तांच्या चेह-यावर. खरचं खूप भारावून टाकणार वातावरण असतं ते.
तर अशा या भारावून टाकणा-या वातावरणात मी पण मंदिरात गेले..... हात जोडून नतमस्तक व्हायला. ......काय म्हणालास फुलं वगैरे नाही नेलीस का? .....नाही नेत मी फुलं ! किंवा तत्सम काहीच सोबत ....का? काय विचारतोस....तुला माहीत्येय का? बारकाईने पाहिलं तर लक्षात येतं की काही भक्त अमक्या कलरचं फुलं या देवाला तमक्या कलरचं फुल त्या देवीला वाहतील. मग मला अशावेळी प्रश्न पड़तो की, इथेही स्त्री-पुरूष हा भेदाभेद ही लोकं का सोड़त नाहीत? ते दोघंही एकच शक्ती आहेत. प्रेम या रेशीम धाग्यात गुंफलेली. मग अशावेळी आपण का भेदभाव करतो. अशासारखी अनेक प्रश्न छळतात मला म्हणून मी खूप प्रेमाने आणि विश्वासाने दोन हात जोडून नतमस्तक होते. आणि तोच विश्वास माझ्या रोमरोमात साठवला जातो. नेमकं तुझ्याही बाबतीत हेच तर जाणवतं मला अपार प्रेम आणि माझ्या रोमरोमात साठवलेला तुझा विश्वास.
तुला पण हेच जाणवतं ना माझ्या विषयी अपार प्रेम आणि तुझ्या रोमरोमात साठवलेला विश्वास.
हो .....मला माहीत्येय रे......
त्याच विश्वासानेच तर मी तुला "विश्रब्ध" म्हणतेय.
तुझीच,
©वर्षा

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा