गुरुवार, ६ जून, २०१९

पत्र बारावे


न लिहिलेली पत्रे-Unwritten Letters
April 11
आर्त भावाचे पत्र...संध्याकाळ आर्तचे करते...
विक्रम
#विश्रब्ध – वर्षा पतके थोटे
पत्र बारावे
ऐकतोस का?
आज जरा उगवती पासूनच मन अस्वस्थ आहे आणि आता तर या उतरत्या कठिण सांजेला मनात ओलसर धुकं दाटून आलंय.
असं वाटतयं की, मनाची नाजूक कोवळी पालवी या धुक्यात कोमेजते की काय? तरीही सांज झालीच. इवल्याशा पंखांनी दूरदूर जाणा-या पाखरांचा निरोप अशा सायंकाळी घेतांना आत कुठेतरी खोल व्याकुळता दाटून आलीय बघ!
वृंदावनातली सांजवात काळीज तुटत तुटत विझतांना मन वातीसारखं विझत चाललंय.
प्रसन्न दिसणारा प्रभाकर गरगरत लालबुंद सोनेरी भगवा होत क्षितिजापलिकड़े एकटाच जातांना उगाचच तो ही शापीत वाटायला लागला.
झगमगती दीपमाळ नजरेला अस्पष्ट आणि विरळ भासू लागलीय. निशब्द सळसळणा-या अंधारल्या झाड़ांकड़े पाहून त्यांचेच नव्हे तर माझेही आता श्वास पोरके वाटायला लागलेत.
ओसाड माळरानावरची क्षणभरासाठी जमलेली पाखरं आता उरलेली नाहीत. या निष्पर्ण माळरानाचे एकटेपण अशा संध्याकाळी कसे असेल याचा विचार अगदी नाहीच करवत.
तू का नाही येत रे फुलून बहरून? मग पाखरंही रेंगाळतील ...सुर्य तुझ्याआड़चं मावळेल...तू असा फुललेला. पक्षी जायचे नाहीत दूर मग...तुझ्याच आश्रयाला राहतील. किती छान दिसशील तिथं तू..
......बहरलेला, चिमण्या पाखरांनी लगड़लेला..मी सांगते म्हणून ऐक ....माझ्यासाठी काहिही जमेल तुला...बघ!
नाहीतरी मी तुला "विश्रब्ध" उगाच म्हणते का रे!
"बघ उजळतयं इथं....नुसत्या कल्पनेनही"
तुझीच
©वर्षा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा