सोमवार, १५ जुलै, २०२४



साधारण मार्च ते जून हे महिने लग्न करण्यासाठी सोयीस्कर मानले जायचे. आता चित्र वेगळं आहे. आता लग्नाला पसंती ही हिवाळ्यात जास्त दिली जात असली तरी अजूनही सुट्ट्यांमध्ये लग्न करणं जास्त सोयीचं म्हणून भर उन्हाळ्यात लग्न होतच आहेत. आमच्या वेळी सर्वात जास्त लग्न व्हायचे ते मे महिन्यात. गर्मी म्हणते 'मी आहे तर कोणी नाही', आणि व-हाडातले व-हाडी म्हणत ' तुले काय आमी घाबरतो काय, तुया सारखे लय पायले छप्पन', नाकाचा शेंबुड पुसत आंब्याच्या लूंचीवर ताव मारत असत. खरी कसोटी लागे ती नवरीची. एवढ्या गर्मीत भारी भरकम शालू घाला, त्यावर डोक्यावरून ओढणी घ्या, स्नो-पावडर तर कोणत्या पतल्या गल्लीनं पळत जाये कोण जाणे, लाल- पांढरे गंधाचे ठिपके तर कधी घामाच्या थेंबात एकजीव होऊन जात कळत नसे अन् मग नवरीचा चेहरा जेवढा वाईट करता येईल तेवढा गर्मीचा प्रयत्न असे. त्यात गावातल्या बुढया बाढ्या नवरीकडे निरा एकटक पाहत असत. काय पाहत असत ह्या म्हाता-या कोता-या नवरीकडे. तर नवरीच्या डोळ्यात येणारे अश्रू. त्या नवरीच्या डोळ्यात येणारे अश्रू दिसले की, आजीबाई खुश होऊन आपलं लग्न आठवत असत. नव्वद टक्के नवरीच्या डोळ्यात अश्रू राहायचेच. पण एखादी नवरी दहा टक्क्यांत मोडणारी असलीच म्हणजे तिच्या डोळ्यात नाहीच आलं गंगामायचं पाणी तं बुढ्या बाढ्याईची कुचकुच सुरू होत असे. ' माय पायनं केवढी हरिकली नवरी लग्नाले, आमी कितीक धायमोकलून लळलो अशीन, आमचं आमालेच मालूम? लयचं दिसते वं नवरी '. पूर्ण लग्नात बायकांची एकच कुचकुच सुरू असे. त्यात नवरी जर चार दोन बुकं शिकली असली तर मग तर विचारूच नका. शिकलेल्या पोरी बिघडतात अन् लग्नात रडत पण नाही म्हणून आमची कासाआजी नवरीच्या तोंडावर म्हणून मोकळी व्हायची. पण आता चित्र फार बदललं. आणि हा बदल खरंच खूप छान आहे. नवरी लग्नात पूर्णवेळ आनंदी, हसरा चेहरा घेवून वावरत असते. त्यामुळे त्या लग्नाला दुःखाची किनार राहत नाही. नाहीतर आधी लग्न म्हणजे दुःखाचा डोंगर. जो जन्मभर डोक्यावर उचलून चालायचा आहे असं वाटायचं..मे महिन्यात उगाच असं काहीबाही आठवत राहतं😀
*वर्षा पतके थोटे
३१/मे/२०२४
फोटो गुगलवरून

<script async src="https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-5032057122896847"
     crossorigin="anonymous"></script>



 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा