बुधवार, १० जुलै, २०२४

  गाणे जात्यावरचे

*******************

माझी आत्या चांगली ९१ वर्षांची होऊन मरण पावली. ती ९१ वर्षांपर्यंत अगदी ठणठणीत होती. फक्त मरणाच्या आठ दिवस आधी बाथरूम मध्ये पडण्याचं निमित्त झालं आणि एका अंगावरून तिला लकवा गेला. लकवा गेल्यावर ती आठ दिवसांत गेली. आत्याचा माझ्यावर खूप लोभ होता आणि माझा तिच्यावर. ती माझ्या बालपणी आमच्याकडे उन्हाळ्यात आणि दिवाळीत दरवर्षी स्वतःहून यायची. कारण तिच्यापेक्षा माझे बाबा चांगले ९-१० वर्षाने लहान होते आणि तिने त्या दोघांची आई मेल्यावर आई सारखं माझ्या बाबांना सांभाळलं होतं. म्हणून ती मोठी बहीण म्हणून आईच्या मायेने बाबांशी आणि आमच्या परिवाराशी वागत राहिली. बाबांनी पण कधी तिला अंतर दिलं नाही. कारण ही दोघचं बहीण भाऊ एकमेकांचा आधार होते. मला माझी आत्या गावाला आली की फार आवडायचं. कारण ती आली की, पहाटे पाच वाजता उठून जात्यावर गाणे म्हणत गहू दळत असे, कधी तुरीची, मुगाची, उडदाची डाळ भरडत असे. आईबाबा तिच्या सोबत उठलेले असत. पण मी मात्र तिच्या जात्यावरच्या गोड गाण्याने जाग आली तरी अंथरूणात पडून असे. ती कशी काय एवढं सुंदर गाणं गात असे कोण जाणे ? पण ती बरोबर यमकाला यमक जुळवून व-हाडी बोलीत गात असे. त्या गाण्यात कधी देवाला आळवणी असे, कधी लटका राग असे, कधी संसाराचं दुःख असे, तर कधी देवाजवळ गा-हाणं मांडलं जाई. पण या सगळ्यात मात्र ती आपलं माहेर, आपला भाऊ, भावजय, दोन्ही भाच्या उच्चकोटीला नेवून ठेवत असे. माझे बाबा शिक्षक होते आणि घरी वावराचं धनधान्य पाहून खूप आनंदी व्हायची. तेव्हा ती माहेराबद्दल गाण्यात म्हणायची....
जात्या इसवरा तू त जंगलाचा ऋषी
मानाचा फतवा गाते तुह्या पसी
मपलं माहेर कृष्ण देवाची द्वारका
वाडा भरून भावजया मेळा गवळणी सारखा
काय सांगू बाई मह्या माहेरचं सुख
पाण्यातले जाता येता दिसे मारूतीचं मुखं
इठून दिसतो मह्या माहेरचा निंब
निंबाले साखळदंड झोका खेळे पांडुरंग
वाटच्या वाटसरा काय पाह्यतू खेड्याले
सोन्याचं कुलूप मह्या बंधुच्या वाड्याले...
आई म्हणायची काय बाई केवढं तुम्हाले माहेराचं कौतुक आहे. आत्या म्हणायची 'पांडुरंगानं मले सोन्या सारखं माहेर माया भावाच्या रूपानं दिलं, मंग त्याचा गोडवा आपसुक ओठावर येतो भावजयी'. माझी आत्या मी अकरावी बारावीला जाईपर्यंत जात्यावर काही ना काही दळत असे. शेतक-याच्या घरात काही ना काही जात्यावर दळावचं लागे नाहीच काहीतर करंजी साठी लागणारे ओलवले गहू तरी ती दळायची. तिचं आणि जात्याचं एक घट्ट समीकरण तयार झालं होतं. तिच्या गाण्यातून तिने मला खूप आत्मिक आनंद दिला होता. बरं ते गाणे ती स्वतःच रचायची. जात्यावर बसली की तिला कसं काय गाणं सुचायचं कोण जाणे ? आता कळतंय ती तिची सृजनाची समाधी अवस्था असावी. पण मला समजायला फार वेळ लागला नाहीतर मी सगळं लिहून घेतलं असतं. पण तरीही काही काही मला आठवतं हाच काय तो एक आत्याला स्मरण्याचा एक आनंद असतो. तिच्या कवितेसारखे गाण्याच्या स्वरूपात ....आत्या अगदी आमच्याकडे शेवटपर्यंत आली. फक्त तिची एकच इच्छा होती की मी माझ्या भावाच्या आधी मरणाच्या दारात जावं. पण नियती आपलंच खरं करते. माझे बाबा गेल्यावर ती पार खचली पण तसं ती दाखवत नसली तरी बाबा पहिल्याच हार्ट अॅटकने अचानक गेल्यावर सहा महिन्यांत ती पण गेली. चंद्रकला नाव कसलेली माझी आत्या तिच्या गावतल्या चंद्रकला नदीत विलिन झाली. नदीचं आणि तिचं प्रवाही असणं माझ्यातही आलं आहे. बहीण भावाचं नातं कसं असावं तर माझ्या आत्या आणि बाबांसारखं असं आमचं गाव अजूनही म्हणते.........तर अशा कवी असलेल्या आत्याची मी एक कवी भाची....
©वर्षा पतके थोटे
८ जुलै २०२४





<script async src="https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-5032057122896847"
     crossorigin="anonymous"></script>





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा