शनिवार, २ ऑक्टोबर, २०२१

Lekh.....4...gavache pahuneba


 माझ्या गावातलं जागृत देवस्थान"

 ------------------------------------------


नदीच्या पाण्यासोबत वाहत वाहत थकून, भागून, माझ्या गावातील पूर्णेच्या पात्रात उबड़ा होऊन विसावला होता. पण इथे येऊनही उबड़ा  असल्यामूळे कपड़्यांचे फटकारे तुड़वीत, जखमांची भळभळ झेलून उबड़्या काळ्या देहावर जख्ख पोपड़े सांभाळून निपचीत पडून होता. कधी कूणाला ओळखू आला नाही. पण एक दिवस गावातल्या  गढीवरच्या पाटलाच्या स्वप्नात जाऊन पाटलाला साक्षात दर्शन दिले . 


दुस-या दिवशी पाटील स्वप्न विसरून गेला खरा पण त्याच  दिवशी गावातल्या उनाड़ पोरांनी नदीवर पोहायला जायचा बेत अंमलात आणला. फक्त नदीवर पोहून वापस यायचं हे गावातल्या उनाड़ पोरांच्या तत्वात बसतच नाही.  मस्ती करता करता त्यांनी त्या काळ्या चकचकीत दगडाला सरळ केलाच.  मग काय हा हा म्हणता गावभर बातमी पसरली मारूतीराया (पाहुणेबुवा) गावात पूर्णेत सापडला. गढीवरच्या पाटलालाही आपलं स्वप्न आठवलं . अख्खा गाव पाटलासमवेत पाहुणेबुवाच्या दर्शनासाठी हजर झाला.  काळीशार , रेखीव, उंच, लांब मुर्ती पाहून अख्खा गाव आनंदला. पण ज्या बायका नदीवर धूणी धूवायला यायच्या त्या मात्र अवकाळी भरलेल्या  ढगाळ  आभाळासारख्या बरसल्या. पण  मनात स्वःतालाच दोष देत त्याही पूर्ण गावासोबत पाहुणेबुवासमोर नतमस्तक झाल्यात. आणि नदीकाठीच चिंचेच्या झाडाखाली वारक-यांच्या टाळ-मृदूंगात पाहुणेबुवाची स्वारी विराजमान झाली. ज्या दिवसापासून पाहुणेबुवाची स्वारी विराजमान झाली. त्या दिवसापासून गावाचा कायापालट व्हायला सुरूवात झाली. सकाळ -संध्याकाळ हनुमान चालीसा, आरती, भजन,भागवत,आजतागायत सुरू आहे.  चिंचेच्या झाडाखाली विराजमान पाहुणेबुवा काही दिवसात पाटील आणि लोकांनी बांधलेल्या वास्तूत कायमचे वास्तव्यास आलेत. तेव्हापासून पाहुणेबुवाची कृपादृष्टी अजूनही माझ्या गावावर कायम आहे. गावातील प्रत्येक व्यक्ती मग ती कोणत्याही जाती-धर्माची असली तरी पाहुणेबुवा तिच्यासाठी आपलाच. हा जातीयवादी सलोखा आजपर्यंत कायम टिकून असल्यामूळे माझ्या गावात जात हा प्रकार कधी रूजलाच नाही. गावावर पाहुणेबुवाची दृष्टी कायम असल्यामूळे अजूनपर्यत तरी कोण्या शेतक-याने आत्महत्याही केलेली नाही.  असं नाही की कुणाला दुःख नाही. पण ती सल किंवा मनीच्या इच्छा पूर्ण करायला गावातला प्रत्येकजण लहानांपासून म्हाता-यापर्यंत फक्त आणि फक्त मारूतीरायाशी हितगुज करतो.  गावच्या लेकी माहेरी आल्या की मारूतीरायाजवळ बसून एकमेकींना बसून ख्याली , खुशाली सांगणार.  गावातली नवी नवरी पाहुणेबुवाचं दर्शन घेतल्या शिवाय आपल्या घराचा उंबरठा ओलांड़णार नाही. मग ती कुणाचीही सुन, बायको असली तरी , प्रत्येक जण आपली सुख -दुःख पाहुणेबुवाजवळ सांगणारच  आणि मारूतीराया तेव्हढाच तत्परतेने पावला हेही बिरूद लोकांच्या बोलण्यातून गावोगावी पसरतयं.  म्हणूनच आज माझ्या गावच्या पाहुणेबुवाची ख्याती  पवनपुत्र या नांवाप्रमाणेच  दुर दुर पसरलीय. खूप दूरवरून लोकं पाहुणेबुवाच्या दर्शनाला येतात. आणि गुप्त धन ठेवून जातात. त्यामूळे आज पाहूणेबुवाचं प्रशस्त कोरीव मंदीर आहे. नक्षीकाम केलेला गाभारा आहे. ज्यामध्ये पाहुणेबुवा भक्तांच्या कष्ट निवारणाकरिता सतत उभे आहेत. मंदीराच्या भोवती पाठशाळा आहे. लागूनच लग्नकार्य ,भागवत सप्ताहाकरिता प्रचंड मोठ्ठा हाॅल आहे. ज्यामध्ये आवश्यक त्या सुविधा ही उपलब्ध आहेत. गावासोबतच आजूबाजूच्या गावातील लग्न ही पाहुणेबुवाच्या उपस्थितीतच पार पडतात. पाहुणेबुवाचं मंदीर पूर्णेच्या काठावर दोन उंच दीपमाळेसमवेत हिरव्यागार निसर्गाच्या सानीध्यात भोलानाथ आणि रेणूका मातेच्या मंदीरासमवेत दिमाखात उभे आहे.  तर अशा या पाहुणेबुवाने  माझ्याही मनीची इच्छा  आशीर्वादाच्या रूपाने माझ्या ओंजळीत टाकली. आणि मी पाहुणेबुवाच्या आशीर्वादाने धन्य झाले.


मला आठवतं मी माहेरी गेली त्याच दिवशी पाहुणेबुवाच्या दर्शनाला गेली . हनुमान चालीसा, आणि आरती सुरू असतांना अचानक दुःख अनावर होऊन आपोआप ड़ोळे भरून यायला लागले. पण म्हणतात ना, की "आंतरीक इच्छेने जे काही मागाल ते तो वरचा देतोच ".  मन दुःखाने पार कोलमड़लेलं होतं.  तेवढ्यात तिथल्या सेवेक-यानी इतक्या भक्तांमधून आरतीचं ताट माझ्या हातात दिलं आणि मी दुःखाने आणि भरलेल्या ड़ोळ्याने  सगळ्या भक्तांसमवेत हनुमान चालीसा, आरती केली आणि आरतीचं ताट हातात आल्याबरोबर मनाने कौल दिला तूला या दुःखातून मारूतीरायानं काढायचं वचन  दिलं.  विश्वास बसणार नाही .पण मी सगळं दुःख पाहुणेबुवाच्या खांदयावर सोडून आलेली होते. आणि  काही दिवसातच जे काही माझ्या जीवनात दुःख होतं ...ते हळूहळू कमी झालं . तर असा हा पाहुणेबुवा  कोण्याही भक्तांच्या हाकेला ओ द्यायला तयार असतो. या पाहुणेबुवाजवळ स्त्री-पुरूष हाही भेद पूर्वीपासूनच नाही. त्यामूळे इथे कुणीही बिनधास्त पूजापाठ करू शकतं. हो पण एक मात्र आहे.  आमच्या गाववाल्यांसाठी हा पाहुणेबुवा आणि गावाबाहेरील लोकांसाठी तो काळा मारूती संस्थान शिंगणापूर असा आहे. पाहुणेबुवाचं गाव अमरावती -दर्यापूर रोडवरअसून अमरावतीपासून साधारण तीसेक किलोमिटर आहे.  अगदी रोड़वरील गाव असल्यामूळे जाणे-येणे सोयीस्कर होते.  बस स्टॅन्ड पासून गावात जायला पायदळ साधारण 15मिनीट लागतात. पण Auto सुविधा असल्यामूळे मंदिरात लवकरच पोहचल्या जाते. एकदा का आमच्या पाहुणेबुवांना पाहीलं की पाहणारा प्रत्येक जण म्हणतो ,आजपर्यंत अशी हनुमानाची मुर्ती पाहीली नाही.  मीही आजपर्यंत  पाहुणेबुवासारखी मुर्ती खरंच पाहीली नाही. आणि  दुस-या वेळेस येतांना भक्त मारूतीरायाच्या प्रेमातच पड़लेला असतो. कारण पाहुणेबुवाने भक्ताच्या मनीची ईच्छा पूर्ण केलेली असते. असा हा आमचा पाहुणेबुवा गावाची ओळख आहे. जागृत देवस्थान म्हणून ओळखल्या जात असल्यामूळे रोज बाहेरगाववरून येणा-या लोकांचा स्वयंपाक असतोच असतो. त्यामूळे मारूतीरायाच्या मंदीराच्या पायथ्याशी   रोज गाड़्यांची जत्राच असते.  आणि आम्ही गावकरी गुढीपाड़व्याच्या दिवशी नदी पात्रात सापडला म्हणून मोठ्या धूमधड़ाक्यात नवीन वर्षासोबत पाहुणेबुवाच्या आगमनाचा दिवस म्हणून त्याच्याच दरबारात एकवटून मोठ्या उत्साहाने हा दिवस साजरा करतो. 


या पाहुणेबुवा मुळेच आज माझं गाव शांततेत आणि सुखसमाधानात नांदतेय आणि पंचक्रोशीत पाहुणेबुवामूळे नाव कमवून उभं आहे. 

 

मग सांगा बरं पटकन कधी येणार आमच्या पाहुणेबुवाला आणि तूमच्या काळ्या मारूतीरायाला भेट द्यायला ......जरूर या.

.बघा नक्कीच प्रेमात पडाल ..हा पाहुणेबुवाने दिलेला विश्वास बोलतोय....


"अशा पाहुणेबुवाच्या देवळाच्या पायथ्याशी 

विसावलेल्या तळाची स्मृती

माझ्या मनात कायम आहे".




 ©वर्षा पतके -थोटे


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा