शुक्रवार, १ ऑक्टोबर, २०२१

Lekh....kshan 1

 साप्ताहीक जनमंगल मधील या सप्ताहातील माझा लेख 


"क्षण "

_____


कधी कधी आयुष्यात अनपेक्षीत आणि अनिमंत्रीत क्षण नक्कीच येतात. असे क्षण आयुष्यात आले की ,

जीवनाची सार्थकता कळते. लळा ,जिव्हाळा हे शब्द न राहता ती जगण्याची रीत होते .  मग जीवनात राग,लोभ,हेवेदावे असल्या शब्दांना फारशी किंमतही रहात नाही.


खरंतर प्रत्येकच जीवनात आनंदाचे क्षण ,दुःखाचे क्षण हे कसे अगदी पाठशिवणीचा खेळ खेळत असतात. कधी दुःखाच्या क्षणात निष्कपटता अनुभवायला येते. तर कधी भरलेली ओंजळ रिकामी कराविशी वाटते . आनंद घेता घेता तो उधळायचीच भावना जास्त तिव्र होते .


जीवनात प्रत्येक गोष्टीसाठी एक क्षण पुरेसा असतो. दोन क्षण एकाचवेळी कधिही एकत्र जगता येत नाहीत.


माणसाने जगतांना त्या एका क्षणामध्ये पूर्णपणे समरसून जगून घ्यायला हवं . कारण तोच एक क्षण तर शाश्वत असतो.  एक थेंबही खाली पडू न देता आनंदाने,उत्साहाने पूर्णपणे जगून घ्यायला हवा, कारण जीवनाचा अर्थ याच एका क्षणातच लपलेला असतो.


एका क्षणात आनंद आहे तर कुठे एखाद्या क्षणात भयावहताही आहे. सुखदुःखाचा एक क्षण असा जर चिमटीत पकडून ठेवता आला असता तर,माणसाने दुःखापेक्षा सुखाचा क्षण चिमटीत पकड़ण्याची नक्कीच चढाओढ लावली असती . पण ते शक्य नाही.  सुखाचा क्षण लगेच नाहीसा होतो .तोच दुःखाच्या क्षणाचा कालावधी फार मोठा वाटायला लागतो.


जसा जगण्यासाठी एक क्षण पुरेसा असू शकतो .  तसेच मरण्यासाठीही एक क्षण पूरेसा असतो.  कधी कधी अनावधानाने माणूस मरणाच्या खाईत लोटला जातो, अपघातही एका क्षणातच होतो,आजाराचे निदानही एका क्षणातच होते. तसेच प्रेमही एका क्षणातच होते ,तर दुरावाही एका क्षणातच होतो. मग जगणंच एका क्षणात का होऊ नये?


इवलासा हा क्षण चिमटीत ही पकड़ता येऊ नये ,तरीही त्याची करामत भारीच मोठी असते.

कुणास ठाऊक सुखदुःखाचे असेच क्षण किती अनुभवायला मिळतील.  म्हणूनच कुणीतरी म्हटलयं..........


         फिर क्यों न हम 

         हर पल को, मुठ्ठी में 

           भर के जी ले।

          हर उम्र को फिर से 

          एक बार जी ले।


जीवनात अन्नाचा कण आणी जीवनाचा क्षण खूप अनमोल आहे. सुखापेक्षाही दुःखाचा एक क्षण श्रध्देचा आणी आत्मबळाचा असतो .म्हणूनच या ओळी सहज सुचल्यात..........


       नव्याने समजत जातो 

       आपण आपल्यालाच 

       त्या एका क्षणात 


        झाले गेले विसरून जातो 

         फक्त क्षणांवर विसंबून

          जगायचं असतं 

           त्याच एका क्षणात 


           कसली ओढ अन् कसला सोस 

              सगळचं व्यर्थ असतं 

             त्या एकाकी एका क्षणात 


            भरभरून जगून घ्यावं आणी

                 भरभरून जगू द्यावं इतरांना

               येणा-या प्रत्येक क्षणात


शेवटी काय तर जीवन जगण्याची  कला आत्मसात करावी लागते . ती ही या एका क्षणातच अनुभवायची ,बस्स ! .....


©वर्षा पतके-थोटे


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा