आजपासून न लिहिलेले पत्र या पेजवर माझी पत्र मालिका सुरू झालीय. "विश्रब्ध"😊
न लिहिलेली पत्रे-Unwritten Letters
मग मी हा थकवा घालवायला किंवा तुझ्याविषयीच्या विचांराची ती अगम्य गुंतागुंत घालवायला काय करते माहीती आहे?....ऐकून दचकलास का?
हो तेच करते जे तू ऐकलेस..हो हो मी लिहीते अलीकडे, काव्य!
विश्रब्ध – वर्षा पतके थोटे
१
तूला माहीती आहे का, रेशीम धागा जेवढा ओढावा ना अरे तेवढा तो गोलाकार गुंतत जातो! या रेशीम धाग्याप्रमाणेच न तुझ्याविषयीचे विचारही माझ्या मनात खूप गुंतागुंत करतात. मग मनात विचारांची खूप ओढाताण सुरू होते. खूप थकायला होतं. कसयं ना, एकवेळ शरीराचा थकवा सहन होतो पण मनाचा थकवा?
मग मी हा थकवा घालवायला किंवा तुझ्याविषयीच्या विचांराची ती अगम्य गुंतागुंत घालवायला काय करते माहीती आहे?....ऐकून दचकलास का?
हो तेच करते जे तू ऐकलेस..हो हो मी लिहीते अलीकडे, काव्य!
काव्यलेखन करताना ना, एकप्रकारे माझी समाधीचं लागते. या समाधीत मी पार माझ्या अंतरंगात ड़ुबकी मारून मनसोक्त पोहूनही येते. तूझ्याशी छानछान गप्पागोष्टीही करते. पण हो, यावेळी फक्त मी बोलायचे असते आणि तू फक्त ऐकायचे असते. मध्ये कुणीही या समाधीत मला डिस्टर्ब केलेले चालत नाही आणि हे तूलाही चांगलं ठाऊक आहे. माझ्या सुदैवाने तूही माझ्या या शक्तीशी परिचित आहेस. म्हणून तूही मला त्रास देत नाहीस. तूलाही ठाऊक आहे काही क्षणांसाठी का होईना, पण जीवनातली सारी दुःखं आणि त्या दुःखाच्या सा-या वेदना विसरायला लावणारी तुझ्याशी गप्पा ही एक प्रभावी औषधी आहे. कदाचित याच शक्तीने आपले ऋणानुबंध जुळलेले असावेत. हो का रे?
या प्रभावी शक्तीने काव्यलेखन करतांना मनातील विचार सहजपणे उमटतात. मग मला या समाधीतचं कळते की तूझी माझ्याविषयीची प्रितीनिष्ठा तू तूझ्या कवितेच्या पाकळ्यात सुगंधासारखी, कुपीत सुरक्षित ठेवली आहेस. या कवितेच्या पाकळ्यांना तू ह्रदयाशी जपूनही ठेवशील. नक्कीच ठेवशील. विश्वास आहेच रे!
पण विचारांची गुंतागुंत वाढली की मन साशंक होते. म्हणतात ना की, "मन चिंती ते वैरी ना चिंती". या दुष्ट मनाला मग दूर झाड़ाआड़ून झगमगत्या केशरी किरणांमूळे तेजस्वी सूर्याची किनारही दिसत नाही आणि दुष्ट मन म्हणते सूर्य अस्ताला तर नाही निघाला?
समजतयं का तूला? हो हे तर फक्त तुलाच समजतयं..
उगीच नाही म्हणत मी तूला विश्रब्ध!
तूझीच,
- ©वर्षा

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा